इजिप्त आणि किर्गिझस्तानसोबत भारतीय सैन्याचा लष्करी सराव

0

इजिप्तच्या अनशास येथे सोमवारपासून भारतीय आणि इजिप्शियन सैन्याने 11 दिवसांच्या लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढविणे, हा सामाईक उद्देश या सरावामागे आहे. विशेष सैन्य सरावाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी भारताने याचे आयोजन केले होते.

‘सायक्लोन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या संयुक्त सरावात भारताच्या पॅराशूट रेजिमेंटमधील (विशेष दल) 25 जवान त्याचप्रमाणे इजिप्शियन कमांडो स्क्वॉड्रन आणि इजिप्शियन एअरबोर्न प्लाटून मधील 25 जवान अशा दोन तुकड्या सहभागी झाल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रांकडून प्रकाशित झालेल्या सनदेच्या अध्याय 7मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वाळवंट किंवा अर्ध-वाळवंट भूप्रदेशातील विशेष कामगिऱ्यांची एकमेकांना ओळख करून देणे हा या सरावाचा प्राथमिक उद्देश आहे. द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी, चर्चेद्वारे आणि सामरिक लष्करी कवायतींच्या अभ्यासाद्वारे भारतीय आणि इजिप्शियन सैन्यांमधील संबंध मजबूत करण्यासाठी या सरावाची रचना केली गेली आहे.

हा प्रयत्न म्हणजे उभय दलांना त्यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि सर्वोत्तम तंत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी उत्तम संधी आहे. समान सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि या मैत्रीपूर्ण राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देणारा एक प्लॅटफॉर्म म्हणून देखील हा सराव उपयुक्त ठरेल, असे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

या संपूर्ण सरावाची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली असून त्यात विविध गोष्टींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात लष्करी प्रदर्शनांचे आयोजन आणि सामरिक संवाद वाढविणे यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हायसेस (IED), ते निष्क्रिय करणारे उपाय आणि लढाईशी संबंधित प्रथमोपचार प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात युद्धजन्य परिस्थितीत नागरी वस्तीतून ओलिसांच्या बचावासाठी केली जाणारी संयुक्त प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.

अलिकडच्या वर्षांत भारत आणि इजिप्तमधील द्विपक्षीय संबंध सातत्याने दृढ होत गेले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इजिप्शियन संरक्षणमंत्री जनरल मोहम्मद झाकी यांनी कैरो, इजिप्त येथे 2022मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारानुसार परस्परांचे हित लक्षात घेऊन विविध क्षेत्रांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी मागील वर्षी 24 ते 27 जानेवारी दरम्यान भारताच्या स्टेट व्हिजिटवर आले होते. त्यावेळी उभय देशांमध्ये विकसित होत असलेल्या या संबंधांबाबत मैलाचा दगड म्हणता येईल अशी घटना घडली. इजिप्शियन सशस्त्र दलातील 144 सैनिकांचा समावेश असलेला संयुक्त बँड आणि तीनही दलांचे प्रतिनिधित्व करणारी तुकडी यांनी पहिल्यांदाच कर्तव्य पथावर मार्चिंग केले.

भारताच्या सागरी व्यापाराच्या दृष्टीने लाल समुद्र, सुएझ कालवा आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारे इजिप्तचे अद्वितीय भौगोलिक स्थान विशेष महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारताच्या इजिप्तसोबतच्या संबंधांना भू-राजकीय आणि भू-रणनीतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतासाठी हा देश म्हणजे एक महत्त्वाची राजकीय आणि लष्करी शक्ती आहे.

भारत, किर्गिझस्तानच्या विशेष दलांचा दहशतवादविरोधी सराव

 

हिमाचल प्रदेशातील बाक्लोह येथील स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल (SFTS) येथे भारत आणि किर्गिझस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे. ‘खंजर’ या नावाने हा सराव ओळखला जातो. दहशतवाद आणि अतिरेकी कारवायांचा बिमोड हे या सरावामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या या वार्षिक सरावाचे हे 11वे वर्ष आहे. पॅराशूट रेजिमेंटच्या (स्पेशल फोर्सेस) 20 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीबरोबर किर्गिझस्तानच्या स्कॉर्पियन ब्रिगेडमधील 20 जवानांनी सहभाग घेतला आहे.

स्पेशल फोर्सेसच्या कौशल्यांचा सन्मान करण्याबरोबरच आव्हानात्मक वातावरणात इन्सर्शन आणि एक्सट्रॅक्शनशी संबंधित प्रगत तंत्रांवर प्रभुत्व मिळवण्यावर या सरावात भर दिला जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रकाशित सनदेमधील अध्याय 7 नुसार, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि नागरी तसेच डोंगराळ प्रदेशात विशेष सैन्याच्या मोहिमा आयोजित करण्याचा अनुभव आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे, हे त्यामागचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

हा सराव म्हणजे उभय देशांतील संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी उत्तम संधी असून, आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि अतिरेकी यांच्याशी संबंधित समान प्रश्न एकत्रितपणे सोडवणे शक्य असल्याचे भारतीय लष्कराकडून नमूद करण्यात आले आहे. लष्कराच्या या निवेदनानुसार, हा सराव अत्याधुनिक स्वदेशी संरक्षण उपकरणे, समान सुरक्षा उद्दिष्टे साध्य करणे आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देणे यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल.

(अनुवाद : आराधना जोशी)


Spread the love
Previous articleUNGA President Arrives In India, Pays ‘Solemn Tribute’ To Mahatma Gandhi At Rajghat
Next articleIndia Tracks Chinese Research Vessel Heading To Maldives

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here