लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटकडून आयोजन; समृद्ध वारश्याचे होणार प्रदर्शन
दि. १३ जून: कारगिल विजयाचा रौप्यमहोत्सव साजरा करतानाच या युद्धातील वीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली म्हणून, भारतीय लष्कराने बुधवारी अखिल भारतीय मोटारसायकल मोहिमेला सुरुवात केली आहे. कारगिलच्या युद्धात १९९९मध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. लष्कराच्या जवानांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि वारसा यांचे दर्शन या मोहिमेतून घडणार आहे.
पूर्वेला दिनजान, पश्चिमेला द्वारका आणि दक्षिणेला धनुषकोडी-अशा प्रत्येकी आठ मोटारसायकलस्वारांच्या तीन पथकांनी देशाच्या तीन कोपऱ्यांतून या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात केली आहे. हे मोटारसायकलस्वार विविध भूप्रदेश आणि आव्हानात्मक मार्ग पार करुन आपल्या सशस्त्र दलांच्या एकता आणि लवचिकतेचे प्रदर्शन या मोहिमेदरम्यान घडवतील. हे मोटारसायकलस्वार मार्गात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कारगिल युद्धातील वीर आणि वीर महिला यांच्यापर्यंत पोहोचतील, त्याचबरोबर युद्ध स्मारकांवर श्रद्धांजली अर्पण करतील. तसेच, तरुणांना भारतीय सैन्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतील.
#IndianArmy#EasternCommand #ArmyForAdventure#NationFirst#HarKaamDeshKeNaam
Expedition commemorating 25 years of the victory in Kargil, christened ‘D5’ was flagged off from #Dinjan, #Assam by GOC #DaoDivison. The motorcyclists, from @SpearCorps who are participants of the… pic.twitter.com/5SItkJS7da
— EasternCommand_IA (@easterncomd) June 12, 2024
दिनजान ते दिल्ली हे अंतर सुमारे दोन हजार ४८९ किमी, द्वारका ते दिल्ली सुमारे एक हजार ५६५ किमी, तर धनुषकोडी ते दिल्ली मार्ग सुमारे दोन हजार ९६३ किमी आहे. २६ जून रोजी ही तिन्ही पथके दिल्लीत एकत्र येतील आणि दोन वेगवेगळ्या मार्गांनी द्रासकडे जातील. या मोहिमेचा समारोप द्रास येथील गन हिल येथे होईल. हे ठिकाण कारगिल युद्धादरम्यानच्या सामरिक महत्त्वासाठी इतिहासात कोरले गेले आहे. या मोहिमेचा शेवटचा टप्पा केवळ शौर्याच्या मार्गांचा मागोवा घेणार नाही, तर आपल्या सैनिकांच्या निःस्वार्थ वृत्ती आणि समर्पणाची आठवणही करुन देईल.
सर्व प्रमुख ठिकाणी ध्वजवंदन समारंभ प्रख्यात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केले जाणार आहेत. त्यात वरिष्ठ लष्करी अधिकारी, सन्माननीय नागरिक , वीर, वीर महिला आणि प्रतिष्ठित अतिथींचा समावेश असेल. या कार्यक्रमात मोटारसायकलस्वारांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कारगिल युद्धातील वीर त्याच बरोबर वीर महिलांनाही युद्धादरम्यान त्यांच्या त्याग आणि अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व तोफखाना रेजिमेंटकडून केले जात आहे तोफखाना रेजिमेंटने ‘ऑपरेशन विजय’मध्ये यश मिळविण्यासाठी निर्णायक भूमिका बजावली होती. हे मोटारसायकलस्वार देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करत असताना ते त्यांच्यासोबत शौर्य, त्याग आणि देशभक्तीच्या गाथा घेऊन जातील. ही मोहीम केवळ आदरांजली नसून भारतीय लष्कराच्या चिरस्थायी भावनेचे प्रतीक आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)