हनियेहच्या हत्येनंतर गाझा युद्धातील अगदी अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या युद्धविराम कराराला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोलान हाइट्सवरील प्राणघातक हल्ल्यात एक हिजबुल्ला कमांडर मारल्याचा दावा इस्रायलने केल्याच्या 24 तासांच्या आतच हमास प्रमुख इस्माइल हनीयेहची देखील हत्या झाली.
एकीकडे शनिवारी ड्रुझ गावात गोलान हाइट्समध्ये झालेल्या हल्ल्यात 12 मुलांचा झालेला मृत्यू आणि या हल्ल्यामागे हात असल्याचा संशय असणाऱ्या वरिष्ठ हिजबुल्ला कमांडर फुआद शुक्र याची झालेली हत्या यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धाचा धोका वाढला आहे.
दुसरीकडे इराणच्या भूमीवरील हल्ला आणि त्याच्या जवळच्या मित्राच्या हत्येमुळे तेहरानवर इस्रायलविरुद्ध प्रतिक्रिया देण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यापासून त्याच्या नेत्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. इस्रायली आकडेवारीनुसार आतापर्यंत या युद्धात1 हजार 200 नागरिक मारले गेले असून 250 हून अधिक बंधक ताब्यात घेतले गेले आहेत.
प्रत्युत्तर म्हणून, दाट लोकवस्तीच्या किनारपट्टी भागांमध्ये इस्रायलने अथकपणे भूहल्ले तसेच हवाई हल्ल्यांना सुरूवात केली. गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यांमध्ये 39 हजार 400हून अधिक लोक मारले गेले तर 2 दशलक्षाहून अधिक लोकांना मानवनिर्मित संकटाला तोंड द्यावे लागले.
या हत्येमुळे मध्यपूर्वेतील इराणच्या प्रॉक्सींना प्रोत्साहन मिळू शकते जे हमास, लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनच्या हुथी आणि इराकमधील सशस्त्र गटांना बदला घेण्यासाठी समर्थन देतात.
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी म्हणाले, “इस्लामिक रिपब्लिकच्या सीमेत घडलेल्या या कटू दुःखद घटनेनंतर, बदला घेणे हे आमचे कर्तव्य आहे.”
तेहरानचा जवळचा मित्र असलेल्या हानिएहच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देण्याआधी पुढील रणनीती ठरवण्यासाठी इराणच्या सर्वोच्च सुरक्षा मंडळाची बैठक अपेक्षित आहे, असे या बैठकीची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले.
तेहरानमध्ये हनीहची हत्या झाल्यानंतर, ” इराण “आपल्या प्रादेशिक अखंडतेचे, सन्मानाचे आणि अभिमानाचे रक्षण करेल तसेच दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना त्यांच्या कृतीबद्दल पश्चात्ताप करायला भाग पाडले,” असे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी बुधवारी सांगितले.
पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास जे हमासचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात त्यांनी हनीहच्या हत्येचा निषेध केला. दुसरीकडे वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी व्याप्त गटांनी बंद पाळत मोठ्या प्रमाणात निदर्शने केली.
इस्माईल हनीयेहची हत्या बुधवारी पहाटे 2च्या सुमारास (2200 GMT) करण्यात आल्याचे इराणी माध्यमांनी सांगितले. हनीयेह उत्तर तेहरान येथे युद्धातील विशेष नेत्यांसाठी राखीव असणाऱ्या “विशेष निवासस्थानी” राहत होता.
“याबाबतचा पुढील तपास सुरू असून लवकर या तपासाचे निकाल जाहीर केले जातील,” असेही माध्यमांनी म्हटले आहे.
नॉरन्यूज या इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी संलग्न असणाऱ्या एका कंपनीने सांगितले की हनीयेह रहात असलेल्या निवासस्थानाला हवेत उडवलेल्या एका क्षेपणास्त्राची धडक बसली. ही हत्या “तेहरानचा प्रभाव कमी करण्यासाठी खेळला गेलेला धोकादायक जुगार” होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
इस्रायलकडून यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इस्रायली सैन्याने सांगितले की ते सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांसाठी मात्र अद्याप कोणतीही नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत.
दुसरीकडे हमासने सांगितले की गाझा युद्धात आतापर्यंत जे मार्ग त्यांनी अवलंबलेला होता त्याचेच ते यापुढेही अनुसरण करणार आहेत. “आम्हाला विजयाचा विश्वास आहे.” याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)