बांगलादेश : अटक केलेल्या हिंदू नेत्याच्या वकिलाची हत्या

0
बांगलादेश
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसशी (इस्कॉन) निगडीत असणारे हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांना 26 नोव्हेंबर 2024 रोजी बांगलादेशातील चट्टोग्राम येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात पोलिस संरक्षणात आणण्यात आले. (रॉयटर्स)

बांगलादेश येथे एका धार्मिक नेत्याच्या अटकेचा निषेध करणारा हिंदू गट आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत किमान एक व्यक्ती ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बांगलादेशचा शेजारी असलेल्या भारताने बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसशी (इस्कॉन) निगडीत असलेले हिंदू नेते, चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी ढाका विमानतळावरून देशद्रोहासह अनेक आरोपांखाली अटक करण्यात आली.
त्यांच्या अटकेमुळे राजधानी ढाका आणि चितगाव शहर या दोन्ही ठिकाणी समर्थकांनी निदर्शने केली.
पोलीस अधिकारी लियाकत अली यांनी सांगितले की, (चितगाव) न्यायालयाबाहेर झालेल्या निदर्शनांमध्ये दास यांची बाजू मांडणाऱ्या एका मुस्लिम वकिलाचा मृत्यू झाला.
काळजीवाहू सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, या कथित हत्येच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी कायदा अंमलबजावणी संस्थांना शहरातील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
अंतरिम सरकार कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशात जातीय सलोखा सुनिश्चित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे सरकारने म्हटले आहे.
दास यांच्यावर ऑक्टोबरमध्ये चितगाव येथे एका मोठ्या रॅलीचे नेतृत्व केल्यानंतर देशद्रोहाच्या आरोपाबरोबरच बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी चितगाव येथील न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला.
दंगलसदृश परिस्थिती
चितगाव महानगर पोलिस आयुक्त हसीब अझीझ यांनी सांगितले की दास यांना न्यायालयातून परत तुरुंगात नेले जात असतांना 2 हजारांहून अधिक समर्थकांनी व्हॅनला वेढा घातला आणि जवळपास दोन तास ती अडवून धरली.
“त्यांनी आमच्यावर दगडफेक करत धुमाकूळ घातला. जमावाला पांगवण्यासाठी आम्हाला अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी आमचा एक हवालदार जखमी झाला,” असे अझीझ म्हणाले.
भारताने दास यांच्या अटकेचा निषेध केला आणि कठोर शब्दात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले तसेच देवतांची विटंबना, व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड आणि जाळपोळ करणारे गुन्हेगार फरार आहेत.
हिंदू बहुसंख्याक भारताचे त्याच्या शेजारी देशाशी मजबूत सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हिंदूंवरील हल्ल्यांबाबत बांगलादेशच्या सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे.
“शांततापूर्ण मेळाव्याद्वारे न्याय्य मागण्या मांडणाऱ्या धार्मिक नेत्यावर आरोप लावले जात असताना या घटनांचे गुन्हेगार अजूनही मोकळे फिरत आहेत ही दुर्दैवी बाब आहे,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला उत्तर देताना सांगितले की, सरकार न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करत नाही आणि हे प्रकरण न्यायालयाद्वारे हाताळले जात आहे.
“बांगलादेश सरकारही देशातील जातीय सलोखा राखण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स) 


Spread the love
Previous article26/11 Mumbai Attacks: India Has to Remain Vigilant Always
Next articleRussia Fired Ballistic Missile At Ukraine With Inert Warheads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here