सियाचीनच्या शक्सगाम खोऱ्यातील बांधकामावरून भारताने चीनला फटकारले

0
रणधीर जैस्वाल (संग्रहित छायाचित्र)

पाकव्याप्त काश्मीरमधील सियाचीन ग्लेशिअरचा भाग असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या रस्त्यांसह अनेक बांधकामे चीनने केल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनकडे अधिकृतपणे आपला निषेध नोंदवला असल्याची माहिती गुरूवारी मंत्रालयाने दिली. मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, शक्सगाम खोरे हा भारताचाच भाग असून चीनने तिथे केलेल्या बांधकामामुळे लडाखमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण झाला आहे.

अलीकडील उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्रांवरून असे दिसून आले की चीनच्या बाजूने एक रस्ता बांधला जात असून तो शक्सगाम खोऱ्याच्या खालच्या भागात आणि भारताच्या ताब्यात असलेल्या सियाचीन ग्लेशियरपासून 50 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. या रस्त्याचे काम 2023 च्या उन्हाळ्यात सुरू झाले आणि बहुतांश मूलभूत बांधकाम गेल्या वर्षी उशिरा पूर्ण झाले. चीनने या महिन्यात त्यापुढील बांधकाम सुरू केले.

1963च्या सीमा करारानुसार शक्सगाम खोरे पाकिस्तानने परस्पर चीनला देऊन टाकले. ”मात्र हा संपूर्ण परिसर भारताचा अविभाज्य भाग असून चीनकडून त्याठिकाणी केल्या जाणाऱ्या बांधकामाबद्दल निषेध नोंदवण्यात आल्याचे,” जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाकिस्तान – चीन यांच्यात झालेला सीमा करार भारताला कधीच मान्य नव्हता आणि वेळोवेळी भारताने अशा प्रकारांवर तीव्र प्रतिक्रिया दिल्याचे जैस्वाल यांनी स्पष्ट केले. आपल्या देशाचे हित जपण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात भारताला अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्दाफास या नेपाळी नियतकालिकानेही वर्षभरापूर्वी यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध केले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन अधिक आक्रमक असल्याचे या वृत्तात म्हटले होते.
गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) चीनकडून मोठी बांधकामे करून किंवा घुसखोरी करत भारतावर दबाव वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून असे निरीक्षण नोंदवले गेले आहे की, लडाखमध्ये कायमस्वरूपी आपली उपस्थिती दर्शविण्यासाठी आस्थापने उभारणी करणे ही चीनची धोरणात्मक योजना आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) लडाख सेक्टरमध्ये भारत-चीन यांच्यातील लष्करी स्टॅण्डऑफच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे भारत चीन द्विपक्षीय संबंध गेल्या सहा दशकांच्या तुलनेत सध्या प्रचंड ताणले गेले आहेत. चार वर्षांपूर्वी हा स्टॅण्डऑफ सुरू झाला. तेव्हापासूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य पुन्हा एकदा प्रस्थापित केल्याशिवाय द्विपक्षीय संबंध सामान्य होऊ शकत नाहीत ही भारताची भूमिका बनली आहे.

आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleगाझाच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 30 ते 40 अब्ज डॉलर्सचा खर्च : संयुक्त राष्ट्रसंघाचा दावा
Next articleभारत-इंडोनेशिया संरक्षण सहकार्य परिषदेचे दिल्लीत आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here