लूव्र दागिने चोरीमुळे फ्रान्सची प्रतिमा डागाळली: मंत्र्यांचा दावा

0
पॅरिसमधील लूव्र संग्रहालयात झालेल्या दागिन्यांच्या चोरीमुळे फ्रान्सची प्रतिमा डागाळली आहे, असे न्यायमंत्री जेरार्ड डार्मानिन यांनी सोमवारी सांगितले, तर विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत ही घटना म्हणजे राष्ट्रीय अपमान असल्याचे म्हटले.

रविवारी चोरांनी जगातील सर्वात प्रसिद्ध संग्रहालयांपैकी एक असलेल्या लूव्र संग्रहालयात क्रेनचा वापर करून वरच्या मजल्याची खिडकी फोडली, नंतर फ्रेंच राजघराण्याचे दागिने असलेल्या भागातून मौल्यवान वस्तू चोरल्या आणि नंतर ते मोटारसायकलींवरून पळून गेले.

अनेक वृत्तपत्रांनी “शतकातील चोरी” म्हणून संबोधले असून या चोरीची बातमी जागतिक स्तरावर हेडलाइनचा विषय बनली आहे.

“आम्ही अयशस्वी झालो आहोत हे निश्चित आहे,” डार्मानिन यांनी फ्रान्स इंटर रेडिओला सांगितले, की या चोरीने फ्रान्सची “नकारात्मक” आणि “दुःखद” प्रतिमा निर्माण झाली आहे. “फ्रेंच लोकांना असे वाटते की त्यांना लुटण्यात आले आहे.”

सुरक्षाविषयक आपत्कालीन बैठक

मोना लिसासारख्या कलाकृतींचे घर असलेल्या आणि 2024 मध्ये या संग्रहालयाला भेट देणाऱ्या 8.7 दशलक्ष पर्यटकांचे  स्वागत करणाऱ्या या संग्रहालयातील सुरक्षेबाबत या चोरीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. चोरी उघडकीस आल्यानंतर सोमवारी संग्रहालय बंद राहिले.

चोरीचा ही घटना सहा ते सात मिनिटांपर्यंत चालली आणि चार जणांनी नि:शस्त्रपणे ती केली परंतु त्यांनी रक्षकांना अँगल ग्राइंडरने धमकावले होते, असे पॅरिसच्या अभियोक्त्याने म्हटले आहे.

डार्मानिन म्हणाले की, अजूनही फरार असलेले दरोडेखोर अखेर सापडतीलच. परंतु त्यामुळे चोरीमुळे उफाळलेला राग शांत झालेला नाही.

ही चोरी “आपल्या देशासाठी असह्य अपमान आहे. राज्याचे विघटन किती दूर जाईल?”, असे अति-उजव्या नॅशनल रॅली पक्षाचे नेते जॉर्डन बार्डेला यांनी एक्सवर सांगितले.

रूढीवादी रिपब्लिकन पक्षाचे फ्रँकोइस-झेवियर बेलामी यांनी हे “आपल्या वारशाचे रक्षण करू शकत नसलेल्या देशाचे लक्षण” म्हटले आहे.

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील राणी मेरी-अमेली आणि राणी हॉर्टेन्स यांच्या दागिन्यांच्या सेटमधील एक मुकुट, तसेच त्याच राण्यांच्या नीलमणी दागिन्यांच्या सेटमधील एक कानातले यांचा समावेश आहे.

संग्रहालयाबाहेर महाराणी युजेनी यांचा मुकुट सापडला आहे. चोरांनी सोने, पन्ना आणि हिऱ्यांनी बनलेला तो मुकुट पळून जाताना टाकल्याचे स्पष्ट झाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, संस्कृती आणि गृह मंत्रालयांनी सोमवारी लूव्रच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक घेतली.

दरम्यान, चोरी नंतर पर्यटकांना बंद करण्यात आलेले हे संग्रहालय सोमवारी पुन्हा उघडण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र संग्रहालय बंदच राहिले. “अपवादात्मक परिस्थितीमुळे, लूव्र संग्रहालय आज बंद राहील. आजसाठी टूर बुक केलेल्या पर्यटकांचे पैसे परत केले जातील,” असे त्यांच्या वेबसाइटने म्हटले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleOperation Sindoor: Redefining India’s Deterrence and the Nuclear Threshold: Part II
Next articleपंतप्रधान मोदींनी स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांतवर केली दिवाळी साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here