Tejas Mk1A फायटरची पहिली ‘विंग असेंब्ली’ HAL कडे सुपूर्द करण्यात आली

0

लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीने, भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमाला चालना देत, (LCA) Tejas Mk1A लढाऊ विमानासाठीच्या ‘विंग असेंब्ली’चा पहिला संच, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडे सुपूर्द केला. हा हस्तांतरण समारंभ तमिळनाडूमधील कोयंबतूर येथील एल अँड टीच्या ‘प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग अँड सिस्टिम्स कॉम्प्लेक्स’मध्ये पार पडला.

HAL च्या तेजस विभागाचे महाव्यवस्थापक- एम अब्दुल सलाम यांनी, कंपनीतर्फे या विंग असेंब्लीज स्विकारल्या. संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव- संजीव कुमार यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग घेतला आणि HAL व L&T यांच्यातील भागीदारीचे कौतुक करत, स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले.

HAL ने खाजगी क्षेत्रासोबतचा सहयोग दृढ केल्याविषयी त्यांचे कौतुक करत, कुमार यांनी तेजस Mk1A चे उत्पादन उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आणि परकीय पुरवठादारांवर अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

“ही भागीदारी ही भारतीय उद्योगाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील वाढत्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

HAL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक- डी. के. सुनील यांनी, हे यश HAL आणि एल अँड टी यांच्यातील सातत्यपूर्ण समन्वय आणि गुणवत्तेच्या बांधिलकीचे फलित असल्याचे सांगितले.

“आत्मनिर्भर भारत” उपक्रमांतर्गत, HAL कंपनी मोठ्या उद्योगांबरोबरच लघु व मध्यम उद्योजकांशी (SMEs)ही जवळून काम करत आहे. खाजगी क्षेत्रात समांतर विमान रचनात्मक असेंब्ली लाईनची उभारणी ही तेजस कार्यक्रमाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणारी महत्त्वाची पायरी आहे,” असे ते म्हणाले.

L&T चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ‘प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टिम्स’चे प्रमुख अरुण रामचंदानी यांनी सांगितले की, “कंपनी सुरुवातीला दरवर्षी चार विंग सेट पुरवणार असून, ऑटोमेशन आणि प्रगत असेंब्ली तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे उत्पादन दरवर्षी 12 सेट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे.”

तेजस Mk1A कार्यक्रमासाठी खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग अधिक स्पष्ट होत आहे. HAL ला आधीच अनेक भारतीय पुरवठादारांकडून महत्त्वाचे स्ट्रक्चरल मॉड्यूल्स प्राप्त झाले आहेत. यामध्ये- लक्ष्मी मशीन वर्क्सकडून एअर इनटेक असेंब्लीज, अल्फा टोकलकडून रिअर फ्युसेलाज, अँफेनॉलकडून वायर लूम्स, टाटा अ‍ॅडव्हान्सड सिस्टिम्सकडून फिन व रुडर, आणि VEM टेक्नॉलॉजीजकडून सेंटर फ्युसेलाज मिळाले आहेत.

LCA तेजस Mk1A, हे तेजसचे हलके आणि अधिक कार्यक्षम रूप असून, भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हवाई लढाऊ क्षमतांच्या आधुनिकीकरण मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous article‘आकाश प्राईम’ या क्षेपणास्त्र प्रणालीची 15,000 फूटांवर यशस्वी चाचणी
Next articleभारताने Prithvi-II आणि Agni-I बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here