हिलरी क्लिंटनबरोबर हातमिळवणी करणाऱ्या मलाला युसूफझाईला घरचा अहेर

0
स्रोत एक्स

नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पॅलेस्टिनविरोधी मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यासोबत काम केल्याबद्दल मलालाच्या मूळ पाकिस्तानमधील हजारो नेटिझन्सनी या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. 1920च्या दशकातील महिला मताधिकार चळवळीवर आधारित एका ब्रॉडवे म्युझिकल कार्यक्रमाचे संयुक्तपणे सूत्रसंचालन करण्यासाठी या दोघीजणी मार्चमध्ये एकत्र आल्या.

आपल्या एक्सवरील निवेदनात, नोबेल पारितोषिक विजेत्या मलालाने म्हटले आहे की, “गाझामधील लोकांच्या मनात माझ्या पाठिंब्याबद्दल कोणताही संभ्रम नसावा.”

“पॅलेस्टिनी लोकांवरील अविरत अत्याचार आपण सर्वजण गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ राग आणि निराशा या भावनेतून पाहत आहोत. गाझाच्या नासेर आणि अल-शिफा रुग्णालयांमध्ये सापडलेल्या सामूहिक कबरींच्या या आठवड्यातील बातम्या पॅलेस्टिनींना भेडसावणाऱ्या भयानकतेची आणखी एक आठवण करून देतात. ते दूरवरून पाहणे देखील कठीण आहे. पॅलेस्टिनीं ते कसे सहन करत आहेत हे माहित नाही. युद्धबंदी तातडीची आणि अत्यावश्यक आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी मृतदेह, बॉम्बस्फोट झालेल्या शाळा आणि उपाशी असलेली मुले पाहण्याची गरज नाही,” असे मलालाने त्यात लिहिले आहे.

“आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि युद्ध गुन्ह्यांचे उल्लंघन केल्याबद्दल मी इस्रायली सरकारचा याआधीच निषेध केला आहे आणि यानंतरही करत राहीन. या सगळ्या प्रकाराला त्यांना जबाबदार धरण्याचा निर्धार करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करते. मी जागतिक नेत्यांना युद्धबंदीसाठी आणि त्वरित मानवतावादी मदत पोहोचावी हे सुनिश्चित करण्यासाठी जाहीरपणे आणि खाजगीरित्या आवाहन करत राहीन,” या शब्दांमध्ये मलालाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इस्रायलच्या कट्टर पाठराखण करणाऱ्या म्हणून क्लिंटन यांच्याकडे पाहणाऱ्या पॅलेस्टिनी समर्थकांना मलालाची ही पोस्ट फारशी पचनी पडलेली नाही. एमएसएनबीसीला अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, हिलरी क्लिंटन यांनी सांगितले की नेतान्याहू हे “विश्वासार्ह नेते नाहीत” त्यामुळे त्यांनी पायउतार होणेच योग्य आहे, मात्र इस्रायलला आपला पाठिंबा कायम असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायलला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या हल्ल्यानंतर लगेचच क्लिंटन यांनी असे म्हटले होते. “युक्रेनप्रमाणेच इस्रायलला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.”

नोबेल पारितोषिक विजेत्या मलालाच्या विरोधात अनेक पाकिस्तानी लोकांमध्ये आधीच असलेल्या निराशा आणि तक्रारींमध्ये आता नवी भर पडली आहे. हिलरी क्लिंटन यांच्याबरोबरच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, पाश्चिमात्य देशांप्रमाणे, मलाला ही पाकिस्तानमधील राजकारणाची दिशा ठरवणारी व्यक्ती आहे. काहींनी तिच्यावर इस्लामविरोधी आणि पाश्चिमात्य देशांची कठपुतळी असल्याचा आरोप केला आहे. 2017 मध्ये तिला जीन्स घातल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला होता. त्याआधी 2013 मध्ये तिच्या ‘आय एम मलाला’ या आत्मचरित्रावर पाकिस्तानी शाळांमध्ये बंदी घालण्यात आली. यामागचे कारण असे सांगितले जाते की तिने इस्लाममधील जाचक नियमांवर टीका केली होती आणि पुस्तकातील सैतानी श्लोकांना स्पष्टपणे समर्थन दिले होते. पाकिस्तानात ‘मलाला विरोधी दिन’ देखील आयोजित करण्यात आला होता असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.

मलालाने आपली बाजू समाज माध्यमातून मांडल्यानंतरही प्रमुख पाकिस्तानी महिलांनी तिच्या या निर्णयावर टीका केली आहे. लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ निदा किरमानी यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, युसूफझाईचा क्लिंटनसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय एकाच वेळी भयावह आणि हृदयद्रावक होता. हे अत्यंत निराशाजनक आहे.”

अश्विन अहमद


Spread the love
Previous articleजागतिक अन्न संकट अधिक गहिरे, UNच्या अहवालातून उघड
Next articleCoalition for Disaster Resilient Infrastructure (CDRI) Spearheads Global Disaster Resilience Efforts

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here