रॉयल मलेशियन नेव्ही समारंभाची तयारी सुरू असताना मंगळवारी सकाळी मलेशियामध्ये नौदलाची दोन हेलिकॉप्टर्स एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात 10 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स हवेत सराव करत असताना त्यांच्यात टक्कर झाली.
मलेशियन नौदलाच्या म्हणण्यानुसार, लुमुट येथील नौदल तळावर मंगळवारी सकाळी 9.30च्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर्समधून सर्व कर्मचाऱ्यांचे मृतदेह लुमुट आर्मी बेस रुग्णालयात नेण्यात आले. तिथे मृतदेहांची ओळख पटवून त्यांचे कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील.
प्राथमिक अहवालानुसार, एका हेलिकॉप्टरच्या रोटरने (पंखा) दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडक दिली आणि ती दोन्ही हेलिकॉप्टर्स स्टेडियमवर येऊन कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
अपघाताच्या कारणाचा तपास करणार असल्याचे मलेशियन नौदलाने जाहीर केले आहे.
संरक्षण मंत्री मोहम्मद खालिद नोर्डिन यांनी सांगितले की, एक सागरी मोहीमेसाठी वापरले जाणारे हेलिकॉप्टर आणि एक फेनेक लष्करी हेलिकॉप्टर शनिवारी होणाऱ्या रॉयल मलेशियन नेव्हीच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलनासाठी सराव करत होते. त्यावेळी हा अपघात घडला.
त्यापैकी एचओएमएम 503-3, ज्यात सात कर्मचारी होते, ते मैदानातील धावण्याच्या ट्रॅकवर कोसळले असे सांगितले गेले आहे तर इतर तीन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे फेनेक एम 502-6, जवळच्या जलतरण तलावात कोसळले.
मृत्यू पावलेल्या सर्व क्रू मेंबर्सची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व कर्मचारी 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते, असे मोहम्मद खालिद यांनी पत्रकारांना सांगितले.
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी पूर्वीचे ट्विटर आणि आताचे एक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “देश या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतो”. त्यांनी सर्व पीडित कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आणि या आपत्तीचा सामना करण्यासाठी शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना केली.
मार्चमध्ये, मलेशियाच्या तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान मलेशियाच्या अंगसा बेटाजवळ समुद्रात कोसळले. त्यावेळी मच्छिमारांनी अपघातग्रस्त विमानातील पायलट, सह-पायलट आणि दोन प्रवाशांना शोधून काढून त्यांची सुटका केली होती.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)