मालदीव लष्करी विमान खरेदीसाठी सज्ज, पहिल्या हवाई तळाचे उद्घाटन

0

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी बुधवारी घोषणा केली की, मालदीव पुढील वर्षी आपले पहिले लष्करी विमान खरेदी करणार आहे. अद्दू सिटी येथे मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या (MNDF) पहिल्या स्वतंत्र हवाई तळाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अद्दू सिटी, मालदीवच्या सर्वात दक्षिणेकडील प्रवाळ बेटसमूह आहे.

नव्याने स्थापन झालेल्या MNDF एअर कॉर्प्सच्या अंतर्गत, कार्यान्वित झालेले हे गन एअर स्टेशन, देशाच्या संरक्षणात्मक पायाभूत सुविधांमध्ये आणि हवाई निगराणी क्षमतेमध्ये एक महत्त्वपूर्ण विस्तार मानला जात आहे. राज्य-नियंत्रित सार्वजनिक सेवा माध्यमाने (PSM न्यूज) या घटनेला “ऐतिहासिक क्षण” म्हणून संबोधले आहे, कारण यामुळे राष्ट्रीय संरक्षण धोरणातील एक महत्त्वाचा घटक औपचारिकरित्या स्थापित झाला आहे.

स्थानिक पोर्टल Adhadhu नुसार, उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती मुइझ्झू म्हणाले की, “मालदीवच्या सैन्याने सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे आणि आम्हाला आशा आहे की, आगामी वर्ष हे अधिक प्रगतीशील असेल.” तसेच, “आम्ही एअर कॉर्प्ससाठी लष्करी विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे तपशीलाच्या अधिक खोलात न जाता त्यांनी जाहीर केले.

एअर कॉर्प्स आणि निगराणी अधिकाराचा विस्तार

3 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशानंतर, या स्वतंत्र तळाची स्थापना करण्यात आली आहे. MNDF एअर कॉर्प्सने हवाई क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी, विशेष आर्थिक क्षेत्राचे (EEZ) निरीक्षण करण्यासाठी आणि विविध मोहिमा पार पाडण्यासाठी हवाई तळ स्थापन करून तो कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे, या अध्यादेशात म्हणण्यात आले होते. यामध्ये मालदीवच्या विशेष आर्थिक क्षेत्रावर, 24 तास हवाई देखरेख ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

एअर कॉर्प्सची औपचारिक स्थापना यावर्षी, 15 मार्च 2024 रोजी स्वतंत्र राष्ट्रपती अध्यादेशाद्वारे करण्यात आली होती. त्याआधी, राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू  यांनी मागील वर्षी माफारू आंतरराष्ट्रीय विमानतळावर MNDF च्या मानवरहित हवाई वाहन (UAV) सेवेचे उद्घाटन केले होते, ज्यातून त्यांच्या प्रशासनाचा स्वदेशी निगराणी क्षमतांच्या विकासावर असलेला भर दिसून आला.

“गन एअर स्टेशनच्या स्थापनेसह, मालदीवच्या हवाई क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व लष्करी हवाई कारवाया आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत,” असे PSM न्यूजने जाहीर केले.

संरक्षण खर्चात वाढ आणि तुर्कस्तानशी भागीदारी

Adhadhu पोर्टलच्या अहवालानुसार, मालदीवच्या 2026 साठीच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी, 2.8 अब्ज MVR (Maldivian Rufiyaa)  (सुमारे 180 दशलक्ष UDS) इतका निधी राखीव ठेवण्यात आला आहे, जो एकूण सरकारी खर्चाच्या सुमारे 4% आहे. सरकारने “राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांमुळे” या खर्चाचे सविस्तर तपशील सार्वजनिक केलेले नाहीत.

मुइझ्झू यांच्या प्रशासनातील सर्वात मोठी ज्ञात लष्करी खरेदी म्हणजे, तुर्कस्तानसोबत करण्यात आलेला 37 दशलक्ष USD (MVR 570 दशलक्ष) किमतीचा करार, ज्यामध्ये सहा सशस्त्र ड्रोनचा समावेश आहे. या करारातून मालदीवने आपल्या संरक्षण भागीदारीचे क्षेत्र व्यापक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. 2026 च्या अर्थसंकल्पात UAV (मानवरहित हवाई वाहन) ताफ्यासाठी खासगी विमा संरक्षणाकरिता MVR 99 दशलक्ष इतका निधीही राखीव ठेवला आहे.

तुर्की संरक्षण कंपन्यांशी वाढती भागीदारी, ही मुइझ्झू यांच्या “स्वावलंबी आणि सार्वभौम” संरक्षण धोरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. हे धोरण पूर्वी भारतावर असलेल्या संरक्षण अवलंबित्वापेक्षा वेगळे आहे. भारताने मानवीय आणि निगराणी उद्देशांसाठी दिलेल्या विमानांचे संचालन करण्यासाठी आपल्या सैन्य कर्मचाऱ्यांना मालदीवमध्ये तैनात केले होते.

2023 च्या उत्तरार्धात, मुइझ्झू यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्या प्रशासनाने द्वीपसमूहातील भारतीय सैन्याची उपस्थिती कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला, ज्यामुळे यावर्षी भारतीय कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माघार घेतली. स्वतंत्र हवाई तळाची स्थापना आणि आगामी लष्करी विमान खरेदी हे, मालदीवच्या स्थानिक संरक्षण क्षमतेतील उणीव भरून काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग मानले जात आहेत.

एअर कॉर्प्स ड्रोनची पहिली यशस्वी कारवाई

PSM न्यूजच्या अहवालानुसार, अलीकडेच मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स (MNDF) ने, मालदीवच्या समुद्रात बेकायदेशीरपणे कार्यरत असलेले एक परदेशी जहाज पकडले. ही कारवाई एअर कॉर्प्सच्या एका ड्रोनच्या सहाय्याने करण्यात आली होती. कोस्ट गार्डच्या स्पेशल बोट स्क्वॉड्रनने ही अटक केली, मात्र या प्रकरणाबाबत सविस्तर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

PSM न्यूजनुसार, MNDF चे नवीन बख्तरबंद UAV (मानवरहित हवाई वाहन) 20 तासांपर्यंत उड्डाण करू शकतात, 220 किमी/प्रतितास वेगाने कार्यरत राहू शकतात आणि रात्रीच्या वेळी शोध आणि बचाव मोहिमा पार पाडू शकतात. ही देखरेख क्षमतेतील महत्वपूर्ण सुधारणा मानली जात आहे, कारण पूर्वी मालदीवची निगराणी केवळ कोस्ट गार्डच्या गस्त नौकांवर अवलंबून होती.

प्रदेशातील संरक्षण विश्लेषकांच्या मते, या घडामोडी मालदीवच्या संरक्षण धोरणातील धोरणात्मक बदलाचे द्योतक आहेत. मुइझ्झू प्रशासन राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टांसोबतच, स्वायत्ततेचा राजकीय संदेश संतुलित ठेवत आहे आणि पारंपरिक भागीदारांच्या पलीकडे नवीन संरक्षण भागीदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleट्रम्प यांच्या नव्या संवादाच्या प्रस्तावानंतर, उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी
Next articleचीनच्या नौदलात ‘फुजियान’ या प्रगत विमानवाहू युद्धनौकेचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here