सबस्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनचा हिथ्रो विमानतळ बंद

0

लंडनच्या हिथ्रो विमानतळाला वीजपुरवठा करणाऱ्या जवळच्या सबस्टेशन लागलेल्या भीषण आगीनंतर शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत विमानतळ बंद करण्यात आला आहे.

प्रवाशांना सावधानतेचा इशारा देत, विमानतळाने एक्सवर लिहिलेः “विमानतळाला पुरवठा करणाऱ्या विद्युत सबस्टेशनला लागलेल्या आगीमुळे, हिथ्रोची वीज मोठ्या प्रमाणात खंडित होत आहे.”

विमानतळ प्राधिकरणाने पुढे म्हटलेः “आमच्या प्रवाशांची आणि सहकाऱ्यांची सुरक्षा राखण्यासाठी, 21 मार्चपर्यंत हिथ्रो 23 वाजून 59 पर्यंत बंद राहील.

विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना सुविधा केंद्राकडे प्रवास न करण्याचे आणि त्याऐवजी त्यांच्या उड्डाणांच्या माहितीसाठी विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

समस्या निराकरणासाठी झटणारे कर्मचारी

“अग्निशमन दलाने या घटनेनंतर तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी खंडीत वीजपुरवठा  कधी पूर्ववत केला जाऊ शकतो याबद्दल आम्ही कोणतीही कल्पना देऊ शकत नाही,” असे हिथ्रोच्या प्रवक्त्याने बीबीसीला सांगितले, कर्मचारी “परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शक्य तितके कठोर परिश्रम घेत होते,” असेही त्यांनी नमूद केले.

हेस सबस्टेशनला लागली आग

पश्चिम लंडनमधील हेस शहरात असलेल्या हेस सबस्टेशनला लागलेल्या आगीमुळे हजारो घरांमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी उपकेंद्राजवळील आस्थापनांमधून 150 लोकांना बाहेर काढले आहे.

दहा फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल

अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आणि सुमारे 70 अग्निशामक कर्मचारी आग विझवण्याचे काम करत असल्याची माहिती लंडन अग्निशमन दलाने दिली.

ब्रिटीश माध्यमांच्या वृत्तानुसार, आगीच्या घटनेनंतर 16 हजार 300 हून अधिक घरांची वीज खंडित झाली आहे. ऊर्जा पुरवठादार स्कॉटिश आणि सदर्न इलेक्ट्रिसिटी नेटवर्क्स यांनी एक्स वर लिहिलेः “पश्चिम लंडनमधील नॉर्थ हायड उपकेंद्राला आग लागली असून सध्या आपत्कालीन सेवा कार्यरत आहेत.”

“घटनास्थळ त्वरित रिकामे करण्यात आले असून स्थानिक रहिवासी, आमचे सहकारी आणि आपत्कालीन पथकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर अद्ययावत माहिती देऊ,” असे वीज पुरवठादार कंपनीने सांगितले.

आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. एलएफबीचे सहाय्यक आयुक्त पॅट गॉलबर्न म्हणाले की, अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. गॉलबर्न यांनी बीबीसीला सांगितलेः “ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून, कर्मचाऱ्यांना रात्रभर घटनास्थळी काम करावे लागेल.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)

 


Spread the love
Previous articleबांगलादेशींच्या वैद्यकीय व्हिसाला भारताचा नकार चीनच्या पथ्यावर
Next articleपरदेशी तुरुंगात 10 हजार 152 भारतीय कैदी, 49 जणांना फाशीची शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here