मेक्सिको आणि अमेरिकेने व्यापाराची अंतिम मुदत पुढे ढकलली आहे: शिनबॉम

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्यासोबत आठवड्याच्या अखेरीस झालेल्या फोन कॉल नंतर, मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शिनबॉम यांनी सोमवारी घोषणा केली की, दोन्ही देशांनी आगामी व्यापाराची अंतिम मुदत काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यास सहमती दर्शवली आहे.

त्या म्हणाल्या की, “या निर्णयामुळे मेक्सिको आणि वॉशिंग्टन यांच्यातील प्रलंबित व्यापार समस्या सोडवण्यासंबंधी वाटाघाटीसाठी अतिरिक्त वेळ मिळेल.”

दोन्ही देशांमध्ये नवीन व्यापार करार करण्यासाठी चर्चा सुरू असताना, अमेरिकेने जुलैमध्ये काही विशिष्ट मेक्सिकन उत्पादनांवरील शुल्क 25% वरून 30% पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला, 90 दिवसांसाठी स्थगिती देण्यास सहमती दर्शवली होती, ज्याचा कालावधी याच आठवड्यात संपणार होता.

राष्ट्राध्यक्ष शिनबॉम यांनी, त्यांच्या सकाळच्या नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, “मला याची खात्री करायची होती की, 1 नोव्हेंबर पूर्वी आम्ही याबाबत संवाद साधला आहे आणि आमच्या टीम्स अजूनही त्यावर काम करत असल्याच्या मुद्यावर आमचे एकमत आहे,” असे. त्या म्हणाल्या की, “एकूण 54 प्रलंबित व्यापार अडथळे सोडवण्याचे देशांचे टार्गेट आहे.”

“आम्ही व्यावहारिकरित्या हा विषय संपवत आहोत,” असे त्या म्हणाल्या.

शिनबॉम यांच्या टिप्पण्यांनंतर, मेक्सिकोचे चलन ‘पेसो’ 0.29% नी वाढून, 18.38 प्रति डॉलर इतके झाले.

व्यापार करार

अमेरिका आणि कॅनडासोबतच्या USMCA मुक्त व्यापार करारामुळे, ट्रम्प प्रशासनाच्या आयात शुल्कांचा मोठा फटका मेक्सिकोला बसलेला नाही. हा करार पुढील वर्षी पुनरावलोकनासाठी येणार आहे.

ही मुदतवाढ, अमेरिकेच्या USMCA व्यापार करारातील काही कलमांमध्ये बदल करण्याच्या मागणीमुळे, निर्माण झालेल्या काही आठवड्यांच्या अनिश्चिततेनंतर करण्यात आली आहे. हा मुद्दा गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण करणारा ठरला आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला शिनबॉम यांनी सांगितले होते की, “मेक्सिको अमेरिकेसोबत अनुकूल व्यापार करार करेल, असा त्यांना विश्वास आहे.” तसेच, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर, उपग्रह, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा (AI lab) यांसारख्या प्रकल्पांमध्ये झालेल्या नव्या प्रगतीची माहिती लवकरच सादर करण्याची त्यांची योजना असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

राष्ट्राध्यक्ष शिनबॉम म्हणाल्या की, “आम्ही सातत्याने यावर काम करत असून, येत्या 1 नोव्हेंबर रोजी कोणतेही विशेष शुल्क (special tariff) लागू होण्याची शक्यता नाही.”

दरम्यान, ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात कॅनडासोबतच्या व्यापार चर्चेला पूर्णविराम दिल्याची घोषणा केली आणि व्हाईट हाऊसने चर्चेतील वाटाघाटींबद्दल नाराजी व्यक्त केली.

मेक्सिकोची यावर काय प्रतिक्रिया असेल आणि मेक्सिको कॅनडासोबत स्वतंत्रपणे चर्चा करू शकेल का? या प्रश्वाचे उत्तर देताना, “आत्ताच त्याबद्दल काही बोलणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया शिनबॉम यांनी दिली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleDefending the Future: How Network Security is Shaping Tomorrow’s Warfare
Next articleअफगाणिस्तान-पाकिस्तानमधील इस्तंबूलमध्ये सुरू असणारी चर्चा निष्फळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here