‘कालसुसंगत राहण्यासाठी नावोन्मेष आणि तंत्रज्ञानाशी मैत्री गरजेची’

0
Military Engineering Services-CME
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पदवीप्रदान सोहळ्याप्रसंगी प्रदर्शनाची पाहणी करताना लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (पीआयबी)

पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

दि. ०९ जून: भविष्यातील लष्करी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अभियांत्रिकी सेवेतील अधिकाऱ्यांनी नावोन्मेष आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. कालसुसंगत राहण्यासाठी हे अतिशय गरजेचे आहे, असे मत लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी व्यक्त केले. पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पदवीप्रदान (स्क्रोल प्रेझेन्टेशन) कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ‘एम.टेक आणि तांत्रिक प्रवेश योजना (TES) अभ्यासक्रमातील अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

Military Engineering Services-CME
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पदवीप्रदान सोहळ्याप्रसंगी मित्रदेशातील अधिकाऱ्याला पदवी प्रदान करताना लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (पीआयबी)

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातून एकूण १९ अधिकाऱ्यांनी एम.टेक अभ्यासक्रम, तर २८ अधिकाऱ्यांनी बी.टेक हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशातील चार अधिकाऱ्यांचाही समावेश होता. याच समारंभाचा एक भाग म्हणून, वैयक्तिक अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी अधिकाऱ्यांना आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल सिंग यांच्या हस्ते  विविध पुरस्कार आणि चषक प्रदान करण्यात आले.  लेफ्टनंट कर्नल सुखप्रीत सिंग सलुजा, लेफ्टनंट कर्नल आशित कुमार राणा, लेफ्टनंट निशांत तिवारी आणि लेफ्टनंट चैतन्य श्रीवास्तव या अधिकाऱ्यांनी आपापल्या अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळवले.

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर या पदवीधर अधिकाऱ्यांना मुख्यतः दुर्गम प्रदेशात राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजेमुळे वाढत्या गुंतागुंतीसह अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, यावर लेफ्टनंट जनरल सिंग यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात भर दिला. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, विद्यार्थी अधिकाऱ्यांना नवीनतम प्रगतीशी सुसंगत राहण्याचे आणि संबंधित अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सर्वोत्तम अभियांत्रिकी पद्धतींचा समावेश करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पदवी प्राप्तीनंतर, हे अधिकारी जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातील आव्हानात्मक भागात सेवा बजावण्यासाठी संबंधित युनिट्सकडे जातील. या भागात सीमा सुरक्षा, बंडखोरी तसेच दहशतवादाच्या समस्येला तोंड देण्यासाठी  लढाऊ अभियांत्रिकी कार्ये सक्रियपणे हाती घेतील. हे अधिकारी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सक्रियपणे योगदान देण्यासाठी तसेच राष्ट्र उभारणीसाठी लष्करी अभियांत्रिकी सेवा, सीमा रस्ते संघटनेद्वारे सुरू असलेले प्रतिष्ठित बांधकाम प्रकल्प देखील हाती घेतील.

विनय चाटी

(पीआयबी ‘इनपुट्स’सह)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here