मिनियापोलिसः डेमोक्रॅट इल्हान ओमर यांच्यावर दुर्गंधीयुक्त द्रव्याचा हल्ला

0
ओमर

डेमोक्रॅटिक पक्षाच्या अमेरिकन प्रतिनिधी इल्हान ओमर मिनेसोटामधील अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) अधिकाऱ्यांच्या कृतींचा मंगळवारी मिनियापोलिसमध्ये निषेध करत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर दुर्गंधीयुक्त द्रव्य फवारले. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजकीय टीकेचे वारंवार लक्ष्य बनणाऱ्या ओमर यांना कोणतीही इजा झाली नाही. रॉयटर्सच्या एका प्रत्यक्षदर्शीनुसार आणि टाऊन हॉल कार्यक्रमाच्या व्हिडिओनुसार, एका सुरक्षा रक्षकाने तात्काळ त्या व्यक्तीला पकडून जमिनीवर पाडले.

पोलिसांनी सांगितले की, त्यांनी त्या व्यक्तीला तिसऱ्या श्रेणीच्या हल्ल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

आपल्या भाषणात, ओमर ICE आणि डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या सचिव क्रिस्टी नोएम यांच्यावर टीका करत होत्या. ट्रम्प यांच्या स्थलांतरण अंमलबजावणीच्या मोहिमेदरम्यान मिनियापोलिसमध्ये दोन अमेरिकन नागरिकांच्या झालेल्या गोळीबारातील मृत्यूनंतर नोएम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्या करत होत्या.

“ICE मध्ये सुधारणा होऊ शकत नाही, त्याचे पुनर्वसन होऊ शकत नाही, आपण ICE कायमचे रद्द केले पाहिजे आणि डीएचएस सचिव क्रिस्टी नोएम यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना महाभियोगाला सामोरे जावे लागेल,” असे ओमर टाळ्यांच्या गजरात म्हणाल्या.

इल्हान ओमर यांच्यावर हल्ला

भाषण सुरू झाल्यानंतर काही क्षणांनी, पहिल्या रांगेत बसलेली एक व्यक्ती त्यांच्या दिशेने पुढे झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार एका सिरिंजमधील द्रव्य त्या व्यक्तीने ओमर यांच्यावर फवारले, आणि  “तुम्हीच राजीनामा दिला पाहिजे,” असे तो ओमर यांना म्हणाला.

या व्यक्तीला ताब्यात घेतला जाण्यापूर्वी, ओमर यांनी आव्हानात्मकपणे हात वर करून त्याच्या दिशेने काही पावले टाकली.

हा प्रकार घडल्यानंतर थोडी विश्रांती घेत त्यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले. वैद्यकीय मदत घेण्याचा सहकाऱ्यांचा आग्रह त्यांनी धुडकावून लावला आणि आपल्याला फक्त एखादा रुमाल द्यावा असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करून त्या ठीक असल्याचे सांगितले.

मिनियापोलिस पोलिसांनी एका निवेदनात सांगितले की, न्यायवैद्यक कर्मचारी घटनास्थळी पुरावे गोळा करत होते.

रॉयटर्सच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्या द्रव्याला अमोनियासारखा वास येत होता आणि त्यामुळे घशात किरकोळ जळजळ झाली.

कार्यक्रमाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ओमर श्रोत्यांना म्हणाल्या, “मी लहान वयातच शिकले आहे की, धमक्यांना बळी पडायचे नसते. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचे आणि खंबीरपणे उभे राहायचे.”

ट्रम्प यांची वक्तव्ये

ट्रम्प यांनी सार्वजनिक वक्तव्ये आणि सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे ओमर यांना वारंवार लक्ष्य केले आहे, तसेच त्यांच्या सोमाली राष्ट्रीयत्वावरही निशाणा साधला आहे.

“इल्हान ओमर कचरा आहे,” असे ट्रम्प यांनी डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटले होते. “त्या कचरा आहे. त्यांचे मित्रही कचरा आहेत.”

43 वर्षीय ओमर 12 वर्षांच्या असताना अमेरिकेत आल्या आणि 2000 साली अमेरिकेच्या नागरिक बनल्या.

मंगळवारी, यू.एस. कॅपिटल पोलिसांनी सांगितले की, 2025 मध्ये त्यांना मिळणाऱ्या धमक्यांचे मूल्यांकन केले तर त्यात सलग तिसऱ्या वर्षी वाढ झाली आहे, जी 2024 च्या तुलनेत जवळपास 58 टक्क्यांनी वाढली आहेत.

2025 मध्ये, त्यांनी काँग्रेस सदस्यांविरुद्ध, त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध, कर्मचाऱ्यांविरुद्ध आणि कॅपिटल कॉम्प्लेक्सविरुद्ध निर्देशित केलेली विधाने, वर्तन आणि संवादांच्या 14 हजार 938 प्रकरणांची चौकशी केली, असेही त्यात नमूद केले आहे, जी 2024 मधील 9 हजार 474 प्रकरणांपेक्षा जास्त आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleव्हेनेझुएला: हंगामी अध्यक्षांबाबत अमेरिका साशंक; मच्याडो यांचा विचार सुरू?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here