संरक्षण मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरु केलेल्या इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) अर्थात नवोन्मेषी संरक्षण उत्कृष्टता उपक्रम, आयडेक्सने 25 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे ऐतिहासिक 350 व्या करारावर स्वाक्षरी केली. ‘इलेक्ट्रो-ऑप्टिकल, इन्फ्रारेड, सिंथेटिक अपर्चर रडार आणि 150 किलोग्रॅम पर्यंत हायपरस्पेक्ट्रल पेलोड्स वाहून नेण्यासाठी सक्षम असलेल्या लघु उपग्रहाच्या डिझाइन आणि विकासासाठी स्पेसपिक्सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सोबत हा करार करण्यात आला आहे. आयडेक्सने डिसेंबर 2022 मध्ये 150 व्या करारावर स्वाक्षरी केली होती आणि अवघ्या 18 महिन्यांच्या कालावधीत 350 व्या करारावर स्वाक्षरी केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव आणि संरक्षण नवोन्मेषी (इनोव्हेशन) संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग बाजपेयी आणि स्पेसपिक्सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अवैस अहमद नदीम अल्दुरी यांच्यात, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि संरक्षण मंत्रालयाचे लष्करी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कराराची देवाणघेवाण झाली. पृथ्वीवरील निरीक्षणाबद्दल विस्तृत माहिती- डेटा पाठवू शकतील अशा प्रकारचे उच्च-रिझोल्यूशन हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहांची निर्मिती आणि प्रक्षेपण या क्षेत्रात, स्पेसपिक्सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कार्यरत आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आयडेक्सच्या या 350व्या करारामुळे अंतराळसंबंधित स्पेस इलेक्ट्रॉनिक्समध्ये अधिकाधिक नवोन्मेषाला चालना मिळत आहे. म्हणजे याआधी मोठ्या उपग्रहांद्वारे पाठवण्यात येणाऱ्या अनेक पेलोड्सचा आकार आता कमी केला जात आहे. यामुळे आता मॉड्युलर छोटा उपग्रह आवश्यकतेनुसार अनेक लघु पेलोड्स एकत्रित करू शकेल जेणेकरून ते जलद आणि किफायतशीरपणे तैनात केले जातील तसेच उत्पादन सुलभता, कार्यक्षमता, अनुकूलता आणि पर्यावरणावर पडणारा कमी प्रभाव यासारखे लाभ देखील होऊ शकतील.
संरक्षण सचिवांनी आपल्या भाषणात राष्ट्र संरक्षणार्थ तंत्रज्ञानाच्या सीमा अधिक विस्तारण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषकांच्या अतूट वचनबद्धतेचे कौतुक केले. स्वदेशी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांची सांगड घालण्याचे महत्व विशद करून ते म्हणाले की देशांतर्गत क्षमता विकास आणि नवनवीन प्रयोगांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून एका भक्कम पायाची उभारणी करत असतात. नवोन्मेषामुळे नवीन तंत्रज्ञान उदयास येऊन स्वदेशीकरणाला चालना मिळते असे सांगून नवोदितांना प्रत्येक टप्प्यावर शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वर्ष 2021 मध्ये नवोन्मेष श्रेणीत सार्वजनिक धोरणासाठी प्रतिष्ठित असा पंतप्रधान पुरस्कार प्राप्त करणारी आयडेक्स, हा उपक्रम संरक्षण परिसंस्थेमध्ये एक निर्णायक टप्पा म्हणून उदयास आला आहे. संरक्षण उत्पादन विभागांतर्गत डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण नवोन्मेषी संघटने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या, आयडेक्सने डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज (DISC) च्या 11 आवृत्त्या लाँच केल्या आहेत आणि अलीकडेच संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील जटिल आणि धोरणात्मक नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयडेक्स (ADITI) योजनेसह अनेक अभिनव तंत्रज्ञान विकास प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. अगदी अल्पावधीतच आयडेक्सने संरक्षण क्षेत्रात अतिशय यशस्वीरीत्या स्टार्टअप्स चा वाढत्या समुदायाला प्रोत्साहन देण्यात आघाडी घेतली आहे. आयडेक्स सध्या 400 हून अधिक स्टार्ट-अप्स आणि एम एस एम ई क्षेत्रात कार्यरत आहे. आतापर्यंत, 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 35 वस्तूंच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.याशिवाय आयडेक्सने रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण केल्या आहेत आणि संरक्षण परिसंस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
टीम भारतशक्ती