रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढत असताना मोदी कीव दौऱ्यावर

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील कीव येथील महात्मा गांधींच्या स्मारकाला भेट दिली. (रॉयटर्स/व्हॅलेंटिन ओगिरेन्को)

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेण्यासाठी युद्धग्रस्त कीव येथे पोहोचले. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर कीव्हला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांचा युक्रेनचा हा पहिलाच दौरा आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला आता लागलेल्या महत्त्वाच्या वळणावर मोदींचा कीव दौरा होत आहे. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्यानंतर युक्रेनचे सैन्य अजूनही रशियाच्या कुर्स्क भागात आहे. तर दुसरीकडे, रशियन सैन्य देखील युक्रेनच्या पूर्वेला सावकाशपणे पण स्थिरपणे पुढे सरकत आहे.

जुलैमधील मॉस्को दौऱ्यानंतर महिनाभरातच मोदींचा कीव दौरा होत आहे. पाश्चिमात्य शक्तींव्यतिरिक्त ग्लोबल साउथबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या विचारात असलेल्या युक्रेनसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे.

कीव येथे पोहोचल्यानंतर मोदी म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणावरील  दृष्टीकोन सांगण्यासाठी ते उत्सुक आहेत.

भारताने या युद्धात निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल जाहीरपणे टीका केली आहे. तर दुसरीकडे त्याने पारंपरिकपणे रशियाशी असणारे आर्थिक आणि संरक्षणविषयक संबंध कायम ठेवले आहेत.

पूर्वी क्वचितच रशियाकडून तेल खरेदी करणारे भारतीय तेलशुद्धीकरण कारखाने, मॉस्कोने देऊ केलेल्या सवलतींचा फायदा घेत सागरी तेलाचे रशियाचे सर्वोच्च ग्राहक म्हणून ओळखले जातात. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून या घडामोडी घडल्या आहेत. सध्या भारतातील कच्च्या तेलाच्या आयातीपैकी दोन पंचमांश हिस्सा रशियन तेलाचा आहे.

शांततावादी दृष्टीकोन

या वर्षाच्या अखेरीस दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन केले जाण्याची आणि रशियाच्या प्रतिनिधींना त्यात सहभागी करून घेतले जाईल अशी आशा युक्रेनने व्यक्त केली.

जूनमध्ये स्वित्झर्लंडमधील पहिल्या शिखर परिषदेतून रशियाला पूर्णपणे वगळण्यात आले होते. शिवाय जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनलाही त्यात सहभागी करण्यात आले नव्हते. मात्र भारताचा या परिषदेत समावेश करण्यात आला.

दोन्ही पक्षांना मान्य असलेल्या पर्यायांद्वारेच कायमस्वरूपी शांतता प्राप्त होऊ शकते. आणि केवळ वाटाघाटीतूनच तोडगा निघू शकतो, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) तन्मय लाल यांनी पत्रकारांना सांगितले.

कीव येथील राजकीय विश्लेषक व्होलोदिमिर फेसेन्को म्हणाले की, मोदींच्या दौऱ्यादरम्यान युद्ध संपवण्यासाठी कोणताही महत्त्वपूर्ण प्रस्ताव येणार नाही अशी त्यांना अपेक्षा आहे.

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleदीर्घकालीन रेल्वे संपामुळे कॅनडाची अर्थव्यवस्था रुळावरून घसरण्याची शक्यता
Next articleDefence, Security, and Trade at the Heart of India-Poland Strategic Partnership

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here