अमेरिकी दुतावासाचा इशारा: अमेरिकी नागरिकांना मॉस्कोत न येण्याचा सल्ला
दि. ०८ मार्च: मूलतत्त्ववाद्यांकडून रशियाची राजधानी मॉस्कोवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे, असा इशारा मॉस्कोतील अमेरिकी दुतावासाने दिला आहे. ही शक्यता लक्षात घेता येत्या ४८ तासांत मॉस्कोतील अमेरिकी नागरिकांनी सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशी सूचनाही रशियातील अमेरिकेच्या दुतावासाने आपल्या नागरिकांना केली आहे. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १५ ते १७ मार्चदरम्यान मतदान होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्त्वाचा मनाला जात आहे.
मॉस्कोमधील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी येत्या ४८ तासात मूलतत्त्ववाद्यांकडून विविध ठिकाणी साखळी हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकी नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे असे, अमेरिकेच्या दुतावासाने म्हटल्याचे ‘द मॉस्को टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, हे मूलतत्त्ववादी कोण आहेत, अथवा त्यांचे उद्दिष्ट काय आहे, याची माहिती दुतावासाने दिलेली नाही असेही या वृत्तात स्पष्ट केले आहे. अमेरिकी दूतावासाच्या या दाव्याबाबत रशियाकडून अद्याप कोणतेही मत व्यक्त करण्यात आले आहे. ‘न्यू अरब’ या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, रशियाची गुप्तचर संस्था ‘एफएसबी’ने ‘इस्लामिक स्टेट’च्या (आयएस) काही दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन त्यांना ठार केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’कडून हे कृत्य करण्यात येण्याची शक्यता आहे. ‘इस्लामिक स्टेट’चे दहशतवादी मॉस्कोच्या नैऋत्येला असलेल्या कालुगा या तळावरून रशियात हल्ले करण्याची योजना आखत होते. मास्कोमधील ज्यूंच्या प्रार्थनास्थळावरही हल्ल्या करण्याचा त्यांचा डाव होता, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या ‘एफएसबी’च्या पथकावर त्यांनी हल्ला केल्यामुळे दहशतवाद्यांना ठार करावे लागले, असे ‘तास’ या रशियाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
वाद विकोपाला
रशियातील अमेरिकी दूतावास व रशियाचे सरकार यांच्यातील वाद सध्या विकोपाला गेला असून, अमेरिकेच्या रशियातील राजदूत लेन ट्रेसी यांना नुकतेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केले होते. ‘रशियाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप होईल, अशी कोणतीही कृत्ये अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी करू नयेत,’ असा इशाराही परराष्ट्र मंत्रालयाने ट्रेसी यांना दिला होता. अश्या कोणत्याही कृत्त्यात अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल व त्यांचे राजनैतिक संरक्षण काढून घेण्यात येईल,असेही रशियाच्या परराष्ट्र मंत्रायालाने म्हटले आहे. अमेरिकी दूतावासाकडून युक्रेन युद्धाबाबत जगभरात रशियाविरोधात चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहे. यात तीन गैरसरकारी संघटना गुंतल्या आहेत, त्याची माहितीही अमेरिकी राजदूतांना दिली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकी दुतावासाने मात्र अद्याप या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
अश्विन अहमद