भारतीय रिझर्व्ह बँकेने सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी बँक इंडोनेशियाशी सामंजस्य करार केल्याचे आरबीआयच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि बँक इंडोनेशियाचे गव्हर्नर पेरी वार्जियो यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. सामंजस्य कराराचे उद्दिष्ट भारतीय रुपया (INR) आणि इंडोनेशियन रुपियाच्या (IDR) वापरास द्विपक्षीयपणे प्रोत्साहन देणे आहे,” असे आरबीआयने म्हटले आहे.
या सामंजस्य करारामध्ये दोन्ही देशांनी मान्य केल्याप्रमाणे चालू खात्यातील सर्व व्यवहार, परवानगीयोग्य भांडवली खात्यातील व्यवहार आणि इतर कोणतेही वित्तीय आणि आर्थिक व्यवहार समाविष्ट आहेत. हे फ्रेमवर्क निर्यातदार आणि आयातदारांना त्यांच्या संबंधित देशांमधील चलनांमध्ये पैसे भरणे आणि पेमेंट करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे रुपया आणि रुपिया यांचा परकीय चलन बाजारात विकास करणे शक्य होईल. स्थानिक चलनांचा वापर केल्यामुळे अशा व्यवहारांसाठी होणारा खर्च आणि सेटलमेंटसाठी लागणारा वेळ या दोन्हीची बचत होईल.
भारताने दुसऱ्या देशासोबत स्वाक्षऱ्या केलेला हा दुसरा सामंजस्य करार आहे. या आधीचा पहिला करार संयुक्त अरब अमिरातीबरोबरचा होता. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आरबीआयने सीमापार व्यवहारांसाठी यूएईच्या सेंट्रल बँकेसोबत गेल्या वर्षी 15 जुलै रोजी दोन सामंजस्य करार केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या उपस्थितीत अबू धाबी येथे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सेंट्रल बँक ऑफ यूएईचे गव्हर्नर खालिद मोहम्मद बलामा यांच्यात या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यावेळी पंतप्रधान मोदीं संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकृत दौऱ्यावर होते.
अश्विन अहमद