Moscow येथे मंगळवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात, रशियाच्या आण्विक संरक्षण दलाचे प्रभारी असलेल्या- वरिष्ठ रशियन जनरलचा मृत्यू झाला. Russia च्या तपास समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, हा बॉम्ब हा एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लपवण्यात आला होता. रशियन तपास समितीच्या प्रवक्त्या- स्वेतलाना पेट्रेन्को यांनी, TASS वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या घटनेची पुष्टी केली आहे.
या बॉम्बस्फोटात रशियाच्या अणु, जैविक आणि रासायनिक संरक्षण दलाचे प्रमुख असलेल्या- ‘रशियन लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह’ (Igor Kirillov) यांचा मृत्यू झाला. रियाझन्स्की प्रॉस्पेक्ट स्थानकाजवळील एका अपार्टमेंट इमारतीच्या बाहेर झालेल्या स्फोटात ते मारले गेले.
“रशियन फेडरेशनच्या सशस्त्र दलांच्या रेडिएशन, रासायनिक आणि जैविक संरक्षण दलांचे प्रमुख असलेले इगोर किरिलोव्ह यांच्यासोबत या बॉम्बस्फोटात त्यांचे एक सहाय्यक देखील मारले गेल्याचे,” तपास समितीने म्हटले आहे.
दरम्यान पेट्रेन्को यांच्या म्हणण्यानुसार, ‘समितीच्या मॉस्को विभागाने या हल्ल्याची प्राथमिक चौकशी सुरू केली असून याचा तपास वेगाने सुरु आहे’.
बिझनेस स्टँडर्डच्या नोंदीनुसार, रशियन टेलिग्राम नामक चॅनेलवर पोस्ट केलेल्या काही छायाचित्रांमध्ये या बॉम्बस्फोटाचे विदारक दृष्य अधोरेखित झाले आहे. ज्यामध्ये स्फोटानंतर इमारतीच्या प्रवेशद्वाराचे झालेले तुकडे, मातीच्या ढिगाऱ्याने आणि रक्ताने माखलेले बर्फात पडलेले दोन मृतदेह स्पष्टपणे दिसत आहेत.
रशियाचे Radioactive, रासायनिक आणि जैविक संरक्षण दल- ज्यांना ‘RKhBZ’ म्हणून ओळखले जाते, ते या हल्ल्याप्रकरणी कार्यरत झाले आहे. हे विशेष दल किरणोत्सर्गी उत्सर्जन, रासायनिक उत्सर्जन आणि जैविक दूषितेमुळे उद्भवलेल्या अपघातांच्या प्रसंगी काम करतात.
मृत रशियन जनरल यांच्यावर होता गंभीर आरोप
‘कीव इंडिपेंडंट’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 16 डिसेंबर रोजी, युक्रेनच्या सुरक्षा सेवा (SBU) ने, हल्ल्यात मरण पावलेल्या किरिलोव्हल इगोर यांच्यावर युक्रेनमध्ये प्रतिबंधित असलेली रासायनिक शस्त्रे वापरल्याचा आरोप केला होता आणि याप्रकरणी त्यांच्या अनुपस्थितीत शिक्षा देखील सुनावली होती.
एसबीयूने पुढे सांगितले की, “किरिलोव्ह यांच्या आदेशावरुनच, युद्धामध्ये शत्रूकडून रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला गेला होता आणि याप्रकरणी एक-दोन नाही तर तब्बल 4 हजार 800 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे.”
8 ऑक्टोबर रोजी युक्रेनमधील युद्धभूमीवर रासायनिक शस्त्रे वापरल्याबद्दल, किरिलोव्ह आणि त्यांच्या युनिटवर UK ने निर्बंध देखील जारी केले होते.
रशियाच्या संपूर्ण आक्रमण योजनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही अधिकाऱ्यांना, युक्रेनने यापूर्वीच लक्ष्य केले आहे.
युक्रेन विरुद्ध लाँच केल्या गेलल्या क्षेपणास्त्रांच्या आधुनिकीकरण प्रक्रियेत सहभागी असलेले रशियन तज्ञ- मिखाईल शात्स्की (Mikhail Shatsky) यांची, 12 डिसेंबर रोजी मॉस्कोजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, अशी माहिती संरक्षण दलाच्या सूत्राने कीव इंडिपेंडेंट या वृत्तसंस्थेला दिली.
(रॉयटर्स)