Georgia मधील ‘गुदौरी स्की’ नामक रिसॉर्टमध्ये असलेल्या एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये मोठी दुर्घटना घडली. या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गॅस विषबाधेमुळे तेथील 11 भारतीय नागरिकांना तर एका जॉर्जियन नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान हे प्रकरण ‘कार्बन मोनोऑक्साइड’ विषबाधाचे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
जॉर्जियच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने केलेल्या नोंदीनुसार, गुदौरी स्की रिसॉर्टमधील ‘हवेली’ नामक भारतीय रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावर हा गॅस गळतीचा प्रकार घडला. तपासणीच्यावेळी तिथे असलेल्या क्वार्टर्समधील सर्वजण मृतावस्थेत आढळून आले. मृत पावलेले सर्वजण हे त्या रेस्टॉरंटचे कर्मचारी असल्याचे समजते.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासणीदरम्यान याप्रकरणी बाह्य हल्ल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, की वीज खंडित होण्याच्या वेळी जनरेटरचा वापर केल्यामुळे हा गॅसगळतीचा अपघात झाला ज्यामध्ये १२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तपासणीच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे जॉर्जियाच्या गृह मंत्रालयाने असे सांगितले की, अपघाताच्या एक दिवस आधी पॉवर जनरेटर बेडरूमजवळ बंद जागेत ठेवण्यात आले होते.
दुसरीकडे Tbilisi येथील भारतीय दूतावासाचे असे म्हणणे आहे की, मृत झालेल्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांचे पार्थिव त्वरित भारतात परत आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलून त्या दृष्टीने पुढील काम सुरु आहे.
दरम्यान घटनास्थळी दाखल झालेले फॉरेन्सिक तज्ज्ञ, अवशेषांची तसेच अपघात स्थळाची सखोल तपासणी करत आहेत.
जॉर्जियाच्या अंतर्गत मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या अपघाताप्रकरणी Mtskheta-Mtianeti पोलिसांनी जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम 116 नुसार फौजदारी खटला सुरू केला आहे. ज्यात निष्काळजीपणे झालेल्या मनुष्यवधाची चौकशी केली जाईल.
“अपघाताची तपासणी सक्रियपणे सुरू असून, फॉरेन्सिक आणि गुन्हेगारी पथकांची टीम घटनास्थळी कार्यरत आहे तसेच या प्रकरणाशी संबंधित अन्य लोकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत,” असे अंतर्गत मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान तिथल्या भारतीय दूतावासाने याप्रकरणी मृत पावलेल्या अकरा भारतीय नागरिकांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभुती प्रकट केली आहे.
जॉर्जियामध्ये भारतीयांचा सहभाग:
जॉर्जियामध्ये सुमारे 9 हजार भारतीय स्थायिक आहेत, ज्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जॉर्जियातील बहुतेक भारतीय नागरिक हे उत्तर भारत व पंजाबकडील राज्यांमधील आहेत.
इथल्या विविध वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या, भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 11 हजार इतकी आहे.
युक्रेनमधील काही वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही जॉर्जियातील वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहेत.
अलिकडच्या काही वर्षांत, अनेक भारतीयांनी आखाती देशांमधून जॉर्जियात बऱ्यापैकी गुंतवणूक आणली असून, त्यांनी इथे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, रिसॉर्टसारखे मध्यम स्वरुपाचे व्यवसाय सुरू केले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून जॉर्जियामध्ये भारतीय पर्यटकांचा ओघही हळूहळू वाढू लागला असल्याचे, आकडेवारी वरुन सिद्ध झाले आहे.