अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हकडून “ब्राझीलमधील कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सची लवकरच चौकशी केली जाणार आहे,” असे एलन मस्क यांनी बुधवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
एक्सला ‘ब्राझील संसदेचे विद्यमान खासदार आणि अनेक पत्रकारांची खाती निलंबित करण्यास’ सांगण्यात आले होते, असे मस्क यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
यासंदर्भात अमेरिकन हाऊसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. तर एक्सने यावरील प्रतिक्रियेसाठी रॉयटर्सच्या विनंतीला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांनी रविवारी मस्क यांची चौकशी सुरू केल्यानंतर अमेरिकन संसदेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे, कारण न्यायाधीशांनी एक्सवरील जी खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते ती पुन्हा सक्रिय झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते.
जर एक्सने काही खाती ब्लॉक करण्याच्या आदेशाचे पालन केले नाही तर कंपनीला दररोज 19,736.32 अमेरिकन डॉलर्स एवढा दंड आकारला जाईल, असे मोरेस म्हणाले.
ब्राझील आणि मस्क यांच्यातील संघर्ष तेव्हा सुरू झाला जेव्हा एक्सचा मालक आणि स्वयंघोषित निरंकुशवादी मस्क याने काही खाती ब्लॉक करण्याच्या मोरेस यांच्या निर्णयाला आव्हान दिले.
मस्कने म्हटले आहे की एक्स, ज्याला पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जात होते, ते सर्व निर्बंध उठवतील कारण ते असंवैधानिक होते आणि म्हणूनच मस्क यांनी मोरेस यांना राजीनामा देण्याचे आवाहन केले.
मस्क यांनी गेल्या आठवड्यात पोस्ट केले की, “या न्यायाधीशांनी प्रचंड दंड ठोठावला आहे, आमच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्याची धमकी दिली आहे आणि ब्राझीलमध्ये एक्सचा प्रवेश बंद केला आहे”. “परिणामी, आम्हाला कदाचित ब्राझीलमधील सर्व महसूल गमवावा लागेल आणि तिथे आमचे कार्यालय बंद करावे लागेल. पण नफ्यापेक्षा तत्त्वे अधिक महत्त्वाची आहेत.”
बोल्सोनारो अध्यक्ष असताना ब्राझीलमव्ये, मस्कच्या उपग्रह संप्रेषण सेवा स्टारलिंकला परवानगी देण्यात आली होती. 2022 मध्ये, जेव्हा हे दोघजण भेटले होते, मस्ककडून तत्कालीन ट्विटर ताब्यात घेण्याच्या निर्णयाला बोल्सोनारो यांनी पाठिंबा दर्शवला होता. पण काळ बदलला आणि ब्राझीलच्या सरकारमध्येही आमूलाग्र बदल झाले. राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांच्या सरकारने आता न्यायाधीशांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी ऑटर्नी जनरल जॉर्ज मेसियस म्हणालेः देशाचे दळणवळण मंत्री अधिक कठोर झाले आहेत. आता प्रश्न हा आहे की पहिल्यांदा माघार कोण घेणार?
पिनाकी चक्रवर्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)