परस्परविरोधी गोळीबारात हजारो रोहिंग्या मुस्लीम फसल्याची शक्यता
दि. १७ जून: लष्करी प्रशासन आणि बंडखोर जनजाती समूहांत सुरु असलेल्या संघर्षाने म्यानमारमध्ये आता निकराचे स्वरूप घेतले असून, दोन्ही बाजूनी सुरु असेल्या गोळीबारात हजारो रोहिंग्या अल्पसंख्य मुस्लीम फसले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
म्यानमारमधील लष्करी प्रशासन आणि विविध जनजातींचे ताकदवान सशस्त्र समूह यांच्यातील संघर्षाने आता परिसीमा गाठली आहे. या जनाजाती समूहाला देशातील लष्करशाही उलथवून लावायची आहे. त्यासाठी त्यांचा सरकारबरोबर सशस्त्र संघर्ष सुरु आहे. म्यानमारमधील आरकान आर्मी या बंडखोर गटाने राखीने या प्रांताला स्वायत्त प्रांत म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे आणि त्यासाठी त्यांचा सरकारशी संघर्ष चालू आहे. या प्रांतातील मौन्ग्दाव या शहरातील नागरिकांनी सकाळी नऊ वाजेप्र्र्यंत शहर सोडून निघून जावे, असा इशाराही आरकान आर्मीने दिला आहे. या शहरात रोहिंग्या मुस्लीम बहुसंख्य आहेत. त्याचबरोबर बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या किनारपट्टीवरील भागातही संघर्षाने जोर धरला आहे.
म्यानमारमध्ये लष्कराने फेब्रुवारी २०२१ मध्ये सत्ता ताब्यात घेतली होती. तेंव्हापासूनच या जनजाती समूहांचा सरकारशी संघर्ष सुरु आहे. मात्र, देशाच्या बहुतांश भागातील ताबा हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आता लष्करी सरकार कमकुवत झाल्याची चिन्हे म्यानमारमध्ये दिसत आहेत. ‘मौन्ग्दाव शहरातील लष्कराच्या उर्वरीत छावण्यांवर आम्ही हल्ला करणार आहोत त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने शहर सोडून निघून जावे,’ असा इशारा आराकान आर्मीने दिला आहे. या बाबत लष्करी प्रवक्त्याकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या संघर्षामुळे मौन्ग्दाव शहरातील ७० हजार रोहिंग्या मुस्लीम संकटात आले आहेत. त्यांना कोठेही जाण्यासाठी जागा उरली नाही,’ असे म्यानमारच्या प्रतिसरकारमधील मानवाधिकार उपमंत्री ऑंग क्याव यांनी म्हटले आहे.
उभयपक्षी सुरु असलेल्या या संघर्षातून जीव वाचविण्यासाठी हजारो रोहिंग्या बांगलादेशात शरण घेण्यासाठी आले आहेत. त्यांना सामावून घेण्यास बांगलादेश उत्सुक नाही. रोहिंग्यांच्या या पळापळीमुळे मौन्ग्दावपासून २५ किमी अंतरावर असलेल्या बुथिदौंग या शहराला युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. या शहरावर तुंबळ लढाईनंतर बंडखोरांनी ताबा मिळविला आहे. मात्र, त्यांच्याकडून रोहिंग्या मुस्लिमांना मोठ्याप्रमाणात लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. म्यानमारमध्ये गेल्या काही दशकांपासून रोहिंग्या मुस्लिमांचा धार्मिक छळ सुरु आहे. लष्कराने त्यांच्यावर २०१७मध्ये बडगा उगारल्यानंतर रोहिंग्यांनी म्यानमारच्या सीमेवरील कॉक्स बाजार या बांगलादेशच्या शहरात आश्रय घेतला आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)