तटरक्षकदलाचीही सिद्धता: किनारपट्टीवर गस्त सुरु
दि. २६ मे: बंगालच्या उपसागरात बांगलादेशनजीक सुरु झालेले रेमल हे चक्रीवादळ आज, रविवारी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची चिन्हे असून, त्याच्या संभाव्य परिणामांच्या मुकाबल्यासाठी नौदल आणि तटरक्षकदलाने सिद्धता केली आहे. या काळात तशी १५० किलोमीटरच्या वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, मुसळधार पावसाचा अंदाजही वेधशाळेने वर्तविला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आला असून, सुमारे चारशे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
रेमल चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाने त्वरित विश्वासार्ह मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासाठी यंत्रणा सिद्ध ठेवली आहे. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. नौदल मुख्यालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नौदलाच्या पूर्व विभाग मुख्यालयाकडून प्रारंभिक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तटरक्षकदलानेही यंत्रणा सिद्ध केली आहे. किनारपट्टीवर तटरक्षकदलाकडून गस्त सुरु करण्यात आली असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि ओडीशाच्या किनारपट्टीवर ही गस्त सुरु आहे. त्याचबरोबर या भागात पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. तटरक्षकदलाकडून या परिसराची हवाई टेहेळणीही करण्यात येत आहे.
#CycloneRemal#IndianNavy prepared to mount credible Humanitarian Assistance & Disaster Relief response
– ships with #HADR & med supplies, & helos/aircraft ready for immediate deployment
– specialised diving teams & Flood Relief Teams standby in Kolkata, Visakhapatnam & Chilka… pic.twitter.com/KvYLTZxldk
— SpokespersonNavy (@indiannavy) May 26, 2024
रेमल चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, त्याच्या परिणाम स्वरूप सागर बेट, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या खेपूपारा किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलानं बाधित लोकसंख्येच्या सुरक्षा आणि मदतीच्या हेतूने मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासह त्वरित वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करता यावा या दृष्टीने दोन नौका सज्ज ठेवल्या आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाची महत्वपूर्ण ‘सी किंग’ आणि चेतक हेलिकॉप्टर व टेहेळणीसाठी व बचाव आणि त्वरित प्रतिसादासाठी डॉर्नियर विमानेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच, कोलकात्यात विशेष पाणबुडी पथके आवश्यक उपकरणांसह सज्ज ठेवण्यात आली आहेत. आवश्यकता भासल्यास मदत आणि बचावकार्यात तैनात करण्यासाठी विशाखापट्टणम इथेही काही पाणबुडी पथके सज्ज आहेत. दोन पूर निवारण सहाय्य्यता पथके (एफआरटी) मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासाठी वैद्यकीय सामग्रीसह कोलकात्यात तैनात करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त विशाखापट्टणम आणि चिल्का येथील दोन पूर निवारण सहाय्य्यता पथके त्वरित प्रतिसादासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)