पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज, 16 डिसेंबर रोजी नौदलात दाखल होणार

0
डायव्हिंग सपोर्ट
भारतीय नौदल 16 डिसेंबर रोजी, डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट (DSC)- A20 लाँच करणार आहे.

भारतीय नौदल 16 डिसेंबर रोजी कोची येथे, स्वदेशी बनावटीच्या नवीन डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट (DSC) मालिकेतील पहिले जहाज DSC-A20 आपल्या सेवेत दाखल करणार आहे. या जहाजाची संरचना आणि निर्मिती दोन्ही भारतातच करण्यात आली आहे. सदर्न नेव्हल कमांडच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अनावरण समारंभाचे अध्यक्षस्थान, सदर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस अ‍ॅडमिरल समीर सक्सेना भूषवणार आहेत.

DSC-A20 जहाजाचा समावेश, नौदलाच्या विशेष डायव्हिंग आणि पाण्याखालील मोहिमांच्याक्षमतेतील लक्षणीय वाढ दर्शवतो. हे जहाज विशेषत: किनारपट्टी भागातील विविध प्रकारच्या अंडरवॉटर मोहिमांसाठी तयार करण्यात आले असून, ते जागतिक दर्जाची सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या मानकांवर आधारित अत्याधुनिक डायव्हिंग प्रणालींनी सुसज्ज आहे.

DSC A20 हे पाच जहाजांच्या मालिकेतील मुख्य जहाज आहे आणि ते कॅटामरान हल फॉर्म प्रणालीने सुसज्ज आहे, जी उत्कृष्ट स्थिरता, वाढीव डेक क्षेत्रफळ आणि सुधारित सागरी कार्यक्षमता प्रदान करते. 390 टन वजनाच्या या स्वदेशी जहाजाची संरचना आणि निर्मिती, इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगच्या (IRS) नौदल नियम आणि विनियमांनुसार करण्यात आली आहे. याची हायड्रोडायनॅमिक रचना विशाखापट्टणम येथील नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी (NSTL) मध्ये, विस्तृत मॉडेल चाचण्यांद्वारे प्रमाणित करण्यात आली.

नौदलाच्या सेवेत दाखल होणारे हे अत्याधुनिक जहाज, ‘आत्मनिर्भरतेच्या’ दिशेने भारताची प्रगती अधोरेखित करते आणि सागरी क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या वाढत्या यशाचे प्रतिबिंब दर्शवते. हा प्रकल्प भारतीय नौदल, देशांतर्गत जहाजबांधणी कंपन्या आणि राष्ट्रीय संशोधन संस्था यांच्यातील, तंत्रज्ञानावर आधारित आणि मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म वितरीत करण्याच्या प्रभावी सहकार्याचे प्रतीक आहे.

नौदलात कार्यान्वित झाल्यानंतर, DSC-A20 जहाज कोची येथे तैनात असेल आणि सदर्न नेव्हल कमांडद्वारे ते संचालित केले जाईल. या जहाजाच्या समावेशामुळे डायव्हिंग सहकार्य, पाण्याखालील चाचपणी, बचाव सहाय्य आणि किनारपट्टीवरील कार्यात्मक तैनातीमध्ये नौदलाच्या क्षमतांची लक्षणीयरित्या वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleUS Clears $686 Million Military Aid to Pakistan as Modi-Trump Hold ‘Warm’ Call
Next articleChina’s Arms Sales Slump Even as Global Demand Hits Record High: SIPRI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here