श्रीलंकेत अभूतपूर्व अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परकीय चलनाची गंगाजळीच आटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेल्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. परिणामी, तिथे राजकीय अस्थिरता असून नागरिकांच्या मनातील असंतोषाचा उद्रेक वारंवार होत आहे. या परिस्थितीतून श्रीलंका बाहेर येईल का, अशी चिंता सर्वांनाच आहे.
वांशिक हिंसाचारामुळे धुमसणारा श्रीलंका हा देश गेल्या सात-आठ वर्षे स्थिरावत होता. या देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत पर्यटन हा होता. पण कोरोना महामारीचा फटका या पर्यटन व्यवसायाला बसला आणि श्रीलंकेची आर्थिक घडी विस्कटली. त्यातच परदेशात स्थिरावलेला श्रीलंकन नागरिक देखील याच काळात नोकरी गमावल्याने मायदेशी परतला आणि त्याचा परिणामही विदेशी गंगाजळीवर झाला. त्याच्या माध्यमातून श्रीलंकेला परकीय चलन उपलब्ध होत असे. याचा परिपाक म्हणजे, विविध प्रकारच्या परकीय कर्जांच्या व्याजाची रक्कम देणेही श्रीलंकेला अवघड होऊन बसले.
परकीय चलनच हाती उपलब्ध नसल्याने इंधन, औषधे तसेच अन्य सामग्रीची आयात श्रीलंकेला बंद करावी लागली. त्यामुळे तिथे अनेक वस्तूंचा प्रचंड तुटवडा भासत आहे. महागाई तब्बल 56 टक्क्यांवर पोहोचली आहे. अशा आर्थिक आणीबाणीमुळे तिथे राजकीय अस्थिरता आहे. महागाईचा आगडोंब उसळल्याने या वर्षाच्या सुरुवातीपासूनच श्रीलंकेचे नागरिक रस्त्यावर उतरले असून हिंसक आंदोलने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आणि विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. ते सर्वमान्य नेते असल्याने त्यांनी पाचव्यांदा देशाचा कारभार आपल्या हाती घेतला.
पण तरीही परिस्थिती नियंत्रणात आली नाही. आर्थिक घडी पुन्हा बसायला काही काळ जाणे आवश्यक होते. परंतु महागाईने पिचलेल्या श्रीलंकन नागरिकांच्या संयमाचा कडेलोट झाला आणि गेल्या शनिवारी, (9 जुलै 2022) त्यांनी थेट राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर चाल केली. मात्र, या उद्रेकाचा आधीच अंदाज आलेल्या राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवन सोडले होते. तसेच, श्रीलंकन नागरिकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाचा ताबा घेण्याबरोबरच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचा खासगी बंगला जाळून टाकला. जनतेच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत, हे ध्यानी येताच राष्ट्रपती राजपक्षे यांनी गुरुवारी पहाटेच हवाई दलाच्या विमानातून श्रीलंकेतून पळ काढला. परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये यासाठी देशात ठिकठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले आहे. रानिल विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. पण राजकीय स्थिरता आल्याशिवाय श्रीलंकेचे आर्थिक प्रश्न सुटणार नाहीत, हे मात्र निश्चित.
श्रीलंकेची ही स्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली? श्रीलंकेतील या स्थितीला चीन कारणीभूत आहे असे म्हटले जाते, यात कितपत तथ्य आहे? श्रीलंकेतील आणीबाणीच्या स्थितीमध्ये भारताची भूमिका काय? भारत तिथे लष्कर पाठवणार का? श्रीलंकेतील आर्थिक गाडी पुन्हा रुळावर येण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत होऊ शकते का?
या प्रश्नांच्या उत्तरासाठी Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलवर पाहा –