श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांचे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली येथे आगमन झाले असून सप्टेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आमंत्रणावरून सुरू होणाऱ्या या दौऱ्यामुळे प्रादेशिक समस्यांवर चर्चा घडून येत असताना दोन्ही देशांमधील संबंध दृढ होतील अशी अपेक्षा आहे.
या दौऱ्याची वेळ महत्त्वपूर्ण आहे कारण दोन्ही देश या प्रदेशात विकसित होत असलेल्या भू-राजकीय गतिमानतेशी जुळवून घेत आहेत. ‘Neighborhood First‘ धोरण आणि ‘SAGAR’ (प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास) उपक्रमांतर्गत श्रीलंकेला एक महत्त्वपूर्ण सागरी सहकारी म्हणून स्थान देण्याची भारताची बांधिलकी दाखवून देते.
राष्ट्रपती दिसानायके यांचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा आणि हिंद महासागर क्षेत्राचे अतिरिक्त सचिव पुनीत अग्रवाल यांच्यासह इतर वरिष्ठ राजनैतिक आणि इतर अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
नवी दिल्लीच्या रस्त्यांवर झळकत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत श्रीलंकेच्या नेत्याची छायाचित्रे असलेले प्रमुख जाहिरात फलक याप्रसंगी श्रीलंकेच्या नेत्याचे महत्त्व अधोरेखित करणारे होते.
या दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष दिसानायके हे भारताच्या राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेणार असून नंतर पंतप्रधान मोदींसोबत मुख्य चर्चा करणार आहेत. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि सागरी सुरक्षेसह विविध विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल. हिंद महासागराचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता, या संवादात संरक्षण आणि प्रादेशिक स्थिरतेवर मोठ्या प्रमाणात भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता आहे.
हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या उपस्थितीबद्दल सध्या सुरू असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. 2022 मध्ये हम्बनटोटा बंदरावर चिनी क्षेपणास्त्र-मागोवा घेणारे जहाज युआन 5 आणि 2023 मध्ये कोलंबो बंदरावर चिनी युद्धनौकेचे डॉकिंग यासारख्या घटनांमुळे भारत अस्वस्थ झाला आहे. भारताने या प्रदेशातील संभाव्य लष्करीकरणाबाबत आपल्या चिंतेचा पुनरुच्चार केला आहे आणि श्रीलंकेशी आपले संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत.
भारताने श्रीलंकेच्या संरक्षण क्षमतेच्या आधुनिकीकरणाला पाठिंबा दिला आहे, ज्यात देशांतर्गत निर्मित किनाऱ्यावरील गस्त जहाजांच्या तरतुदीचा समावेश आहे. सागरी सुरक्षेतील सहकार्य वाढवणे हा या भेटीचा महत्त्वपूर्ण पैलू असेल अशी अपेक्षा आहे.
दोन्ही देशांमधील गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने अध्यक्ष दिसानायके एका business forumमध्ये सहभागी होतील. श्रीलंकेतील एक प्रमुख गुंतवणूकदार असलेला भारत आपली आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. या दौऱ्यादरम्यान, अक्षय ऊर्जा, आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश असलेल्या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होणे अपेक्षित आहे.
या भेटीच्या सांस्कृतिक पैलू अंतर्गत राष्ट्रपती दिसानायके बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या बोधगयाला भेट देतील. हा दौरा भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामायिक सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा अधोरेखित करणारा आहे. बौद्ध तीर्थयात्रा आणि रामायणाचा पगडा पर्यटकांना सतत आकर्षित करत असल्याने आणि लोकांमधील परस्पर संबंध मजबूत करत असल्याने भारत श्रीलंकेसाठी पर्यटकांचा सर्वोच्च स्रोत आहे.
राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांच्या निवडणुकीतील विजयानंतर लगेचच श्रीलंकेला भेट देणारे भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या भेटीच्या फलनिष्पत्ती बाबत विश्वास व्यक्त केला.
“त्यांच्या पहिल्याच भारत दौऱ्याच्या प्रारंभी राष्ट्रपतींना भेटून आनंद झाला. भारताच्या ‘Neighborhood First’ धोरण आणि ‘SAGAR’ उपक्रम या दोन्हींमध्ये श्रीलंकेची महत्त्वाची भूमिका आहे. उद्या पंतप्रधानांबरोबरच्या चर्चेमुळे या संबंधांना अधिक विश्वास आणि सखोल सहकार्य मिळेल असा विश्वास आहे,” असे डॉ. जयशंकर यांनी दिसानायके यांचे नवी दिल्लीत आगमन झाल्यावर लगेचच त्यांची भेट घेतल्यानंतर एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.
रामानंद सेनगुप्ता