मानवविरहित हवाई वाहन (यूएव्ही) तंत्रज्ञानातील क्षमता विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा भारताने गाठला आहे. ऑटोनॉमस फ्लाइंग-विंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाची यशस्वी उड्डाण चाचणी अलीकडेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर घेतली. स्वदेशी हाय-स्पीड यूएव्ही स्टेल्थ ड्रोन विकसित करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या ऑटोनॉमस स्टिल्थ यूएव्हीचे यशस्वी प्रात्यक्षिक केल्याने तंत्रज्ञान सज्जतेमध्ये आपण सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे सांगून संरक्षण मंत्रालयाने देशाच्या तांत्रिक कौशल्याबद्दल आपण समाधानी असल्याचे स्पष्ट केले आहे. टेललेस कॉन्फिगरेशनमध्ये नियंत्रित उड्डाणाचे ध्येय साध्य झाल्यामुळे ज्या देशांनी फ्लाइंग विंग तंत्रज्ञानामध्ये प्रभुत्व मिळवले आहे, अशांच्या गटात आता भारतही सामील झाला आहे.
डीआरडीओच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (एडीई) डिझाइन करून विकसित केलेल्या या एक टनापेक्षा जास्त वजनाच्या हाय-स्पीड फ्लाइंग-विंग UAV मुळे, येत्या काही वर्षांत रिमोटली-पायलटेड स्ट्राइक एअरक्राफ्ट (RPSA) हा महत्त्वपूर्ण प्रकल्प विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानाचे प्रारंभिक उड्डाण जुलै 2022मध्ये झाले, त्यानंतर विविध विकासात्मक टप्प्यांवर ज्या सहा अतिरिक्त उड्डाण चाचण्या करण्यात आल्या, त्यात कंपनीने तयार केलेल्या दोन मूळ ढाच्यांचा वापरही करण्यात आला होता. या चाचण्यांमुळे एरोडायनॅमिक ॲण्ड कंट्रोल सिस्टम डेव्हलपमेंट, रिअल-टाइम इंटिग्रेशन, हार्डवेअर-इन-लूप सिम्युलेशन तसेच अत्याधुनिक ग्राऊंड कंट्रोल स्टेशन्सची स्थापना यामध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती साधली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
देशांतर्गत विकसित केलेल्या वजनाने हलक्या कार्बन प्रीप्रेग कंपोझिट मटेरियलचा वापर करत काळजीपूर्वक डिझाइन केले आणि मग अत्याधुनिक ॲरोहेड विंग प्लॅटफॉर्म हे वैशिष्ट्य असलेल्या या विमानाची बांधणी केली आहे. या विमानाची निर्मिती धोरणात्मक पद्धतीने झाली असून संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पायलटशिवाय उड्डाण करू शकते एवढेच नाही तर, टेकऑफपासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामे कोणाच्याही मदतीशिवाय (जमिनीवर असलेले रडार, उड्डाणासाठी आवश्यक सूचना) स्वत: हाताळू शकणार आहे. ऑनबोर्ड सेन्सर डेटा फ्यूजन आणि स्वदेशी उपग्रह-आधारित ऑग्मेंटेशन आणि GPS वर आधारित GEO-Augmented navigation (GAGAN) रिसीव्हर्सचा वापर केल्याने GPS नेव्हिगेशनची अचूकता आणि अखंडता वाढवता येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)