अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन दक्षिण कोरियाच्या भेटीवर असताना उत्तर कोरियाने कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.
“उत्तर कोरियाने पूर्वेकडील समुद्राकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडले आहे. मात्र ते नेमके कोणते याबद्दल अद्याप पुरेशी माहिती मिळालेली नाही,” असे अमेरिकन सरकारने जाहीर केले आहे. उत्तर कोरियाने पूर्व किनाऱ्यावर तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असल्याची पुष्टी जपानच्या संरक्षण मंत्रालयानेही केली आहे.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने नुकताच आपला संयुक्त लष्करी सराव पार पाडला. दक्षिण कोरियामध्ये तैनात असलेल्या सुमारे 27,000 अमेरिकी सैनिकांनी या सरावात भाग घेतला. त्यानंतर काही दिवसांनी हे क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. उत्तर कोरियाने या सरावांना “आक्रमणाची पूर्वतयारी” असे संबोधले होते.
उत्तर कोरियाने या वर्षी केलेल्या शस्त्रास्त्र प्रात्यक्षिकांच्या मालिकेतील ही नवी चाचणी असून गेल्या दोन महिन्यांत उत्तर कोरियाकडून झालेली ही पहिलीच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी आहे.
गेल्या काही महिन्यांत, उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन याने दक्षिण कोरियाला आपल्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवण्याच्या उद्देशाने आणखी क्षेपणास्त्र चाचण्या करणे, प्योंगयांगमधील जनतेच्या दृष्टीने एकीकरणाच्या आशेचे प्रतीक असणारे एक स्मारक पाडणे अशा उपक्रमांद्वारे दक्षिण कोरियाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
8 फेब्रुवारी रोजी उत्तर कोरियाचा सेना दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी सैन्याला संबोधताना, आपल्याला दक्षिण कोरियाचा नाश करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याची वल्गना किम जोंग उनने केली होती. याशिवाय दक्षिण कोरियाबरोबर आपण कोणताही संवाद किंवा वाटाघाटी करणार नसल्याचेही घोषित केले आहे कारण उत्तर कोरिया लष्करी शक्तीस्थान बनेल तेव्हाच या प्रदेशात शेवटची शांतता प्रस्थापित होईल असे किम जोंग उन याचे मत आहे.
योन सुक येओल यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण कोरियाच्या सरकारचा असा विश्वास आहे की या वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी कम्युनिस्ट राज्य आपले स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करेल.
अमेरिकेबरोबर लष्करी सहकार्य आणि उत्तर कोरियाबाबत कठोर भूमिका घेण्याला प्रोत्साहन देणारा योनचा पुराणमतवादी पीपल्स पॉवर पक्ष विरोधी पक्ष असणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाविरुद्ध जिंकण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. तज्ज्ञांच्या मते किम दक्षिण कोरियाला आपल्या मार्गातून बाहेर काढण्याचा आणि अमेरिकेला आपल्याशी थेट वाटाघाटी करण्यास भाग पाडत आहे.
पिनाकी चक्रवर्ती