उत्तर कोरियाने गुरुवारी दक्षिण कोरियाच्या पूर्व समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. अर्थात हा मारा अयशस्वी ठरला असला तरी दक्षिण कोरियाने याचा तीव्र निषेध केला आहे. त्याआधी उत्तर कोरियाने लष्करी हेरगिरी उपग्रह प्रक्षेपित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले.
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने सांगितले की, उत्तर कोरियाने त्याची राजधानी प्योंगयांगजवळील भागातून समुद्राच्या दिशेने किमान 10 कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे त्यांना आढळले आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या लष्कराने या भागावर आपली टेहळणी आणि दक्षता वाढवली आहे. याशिवाय अमेरिका आणि जपान यांनाही ते यासंदर्भातील माहिती देत असल्याचे त्यात म्हटले आहे.
जपानच्या संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत, जपानच्या तटरक्षकांनी सागरी सुरक्षा इशारा जारी केला असून उत्तर कोरियाने संभाव्य बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याचे त्यात सांगितले आहे. तटरक्षक दलाने हा इशारा दिल्यानंतर काही मिनिटांनंतर सांगितले की संशयित क्षेपणास्त्र आधीच पाण्यात पडले आहे असे मानले जाते. पण या परिसरात असणाऱ्या जहाजांना काही पडलेल्या वस्तू आढळल्यास त्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. तत्काळ नुकसानीचे कोणतेही वृत्त हाती आलेले नाही.
उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्रांच्या चाचणीचा वेग तर दुसरीकडे अमेरिका आणि जपानसोबत दक्षिण कोरियाचा झालेला संयुक्त लष्करी सराव यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत कोरियन द्वीपकल्पावरील तणाव वाढला आहे.
सीमेपलीकडे उत्तर कोरियाच्या विरोधी प्रचार पत्रके उडवणाऱ्या दक्षिण कोरियाच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने मंगळवारी रात्रीपासून कचरा वाहून नेणारे शेकडो फुगे दक्षिणेकडे उडवल्यानंतर गुरुवारी हे प्रक्षेपण झाले. उत्तर कोरियाने आपला दुसरा लष्करी हेरगिरी उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आंतर कोरियन सीमेजवळ दक्षिण कोरियाने 20 लढाऊ विमानांचा समावेश असलेला हवाई सराव केला. त्यामुळे उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यानेही दक्षिण कोरियाविरुद्ध “जबरदस्त कारवाई” करण्याचा इशारा दिला आहे.
उड्डाणानंतर लगेचच क्षेपणास्त्राचा स्फोट झाल्यामुळे प्रक्षेपण अयशस्वी झाले. परंतु किमने आपल्या लष्करी शास्त्रज्ञांना या अपयशावर मात करण्याचे आणि अंतराळ-आधारित हेरगिरी क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करी कारवायांचा प्रतिकार करण्यासाठी या क्षमता महत्त्वपूर्ण असल्याचे त्याने म्हटले आहे.
गुरुवारी उत्तर कोरियाने त्याच्या अयशस्वी उपग्रह प्रक्षेपणाच्या आंतरराष्ट्रीय निषेधालाही प्रत्युत्तर दिले. या प्रक्षेपणावर संयुक्त राष्ट्रे आणि इतर देशांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता.
उत्तर कोरियाने नोव्हेंबरमध्ये आपला पहिला लष्करी गुप्तहेर उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. मात्र सोमवारी मिळालेल्या अपयशामुळे 2024 मध्ये आणखी तीन लष्करी गुप्तहेर उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या किमच्या संभाव्य योजनांना मोठा धक्का बसला आहे.
उत्तर कोरियाने या वर्षी विविध क्रूझ क्षेपणास्त्रे आणि तोफखाना प्रणालींची चाचणी केली आहे. हायपरसॉनिक वॉरहेड क्षमतेसह घन-इंधन मध्यवर्ती श्रेणी क्षेपणास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची उड्डाण-चाचणी केली. तज्ज्ञांच्या मते गुआमच्या लष्करी केंद्रासह प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या दुर्गम लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
आराधना जोशी
(रॉयटर्स)