ऑपरेशन इंद्रावतीः मोदी की हमी जारी!

0
Operation Indravati, Indian Government
मोदी की गॅरंटी जारी है - एस. जयशंकर

परदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भारत सरकार ठाम आहे. अलीकडच्या एका घडामोडीत, हैतीतून बाहेर काढलेल्या एका भारतीय नागरिकाने भारतात सुरक्षितपणे परतण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

इंद्रावती मोहिमेचा एक भाग म्हणून, गेल्या महिन्यात हैतीमधून 12 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. यासाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी डॉमिनिकन रिपब्लिक सरकारने दिलेल्या पाठिंब्याची कबुली दिली.

 

अजूनही सुमारे 30 भारतीय हैतीमध्ये आहेत. गेल्या दशकभरात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी, परदेशातील भारतीय नागरिकांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी भारत सरकारने संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सुरक्षा दलांना एकत्रित आणून एक सर्वसमावेशक प्रणाली विकसित केली आहे.

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केले की आर्थिकदृष्ट्या वंचित अशा कॅरिबियन देशांमधील अशांतता आणि अस्थिर परिस्थिती लक्षात घेता ऑपरेशन इंद्रावतीची अंमलबजावणी करण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

हैतीमधील संकट

एरियल हेन्री यांच्या अनुपस्थितीत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम सांभाळणारे अर्थमंत्री पॅट्रिक बोईस्वर्ट यांनी जाहीर केल्याप्रमाणे कॅरिबियन राष्ट्रासमोर अलीकडेच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोर्ट-ऑ-प्रिन्स येथे असलेल्या हैतीमधील सर्वात मोठ्या तुरुंगावर सशस्त्र गटांनी हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी निर्माण झाली आहे. जिमी “बार्बेक्यू” चेरीझियर याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यात पोलिस, तुरुंग कर्मचारी मोठ्या संख्येने मारले गेले किंवा जखमी झाले. याशिवाय 3,500 कैदी पळून गेले.

हैती सरकार आणि सध्याचे पंतप्रधान एरियल हेन्री यांना सत्ताभ्रष्ट करणे हे तुरुंग तोडण्यामागचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते.
हैती राजधानीच्या 80 टक्के भागात सध्या सशस्त्र गटांचे नियंत्रण असून आहे. सध्याच्या या संकटाची चाहूल 2021मध्येच लागली होती जेव्हा तत्कालीन पंतप्रधान जोवेनेल मोईस – जे हुकुमशाही पद्धतीने देशाचे नेतृत्व करत होते – यांना वाढत्या आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करावा लागला होता.

यामुळे निर्माण झालेल्या लोकक्षोभातून शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. हैतीमध्ये निर्माण झालेल्या या दीर्घकालीन अस्थिरतेचे मूळ कारण मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सरकारी भ्रष्टाचारात आहे, ज्यामुळे दोन दशकांहून अधिक काळ निर्माण झालेल्या राजकीय अशांततेमध्ये आता हिंसक संघर्षाची भर पडली आहे.

मोईस यांच्या हत्येनंतर, एरियल हेन्री यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पाठिंब्यावर पंतप्रधान म्हणून शपथ घेतली खरी. मात्र त्यांनाही सत्तेवर अद्याप पूर्णपणे पकड घट्ट करता आलेली नाही. कारण हैतीमधील जनतेसमोर गगनाला भिडलेल्या किंमती आणि बिघडलेल्या पायाभूत सुविधा ही आव्हाने जास्त महत्त्वाची आहेत.

जिमी “बार्बेक्यू” चेरिझियर कोण आहे?

Source: Twitter

जिमी “बार्बेक्यू” चेरीझियर, ‘G9’ या टोळीचा आघाडीचा नेता आणि माजी पोलीस अधिकारी असून, 5 मार्च, 2024 रोजी डेलमास 6, पोर्ट-ऑ-प्रिन्स, हैती येथे पत्रकार परिषदेनंतर या टोळीतील इतर सदस्यांसोबत दिसला होता.

सध्या अंदाजे 200 टोळ्या हैतीमध्ये कार्यरत असल्याचे मानले जाते. त्यापैकी 23 मुख्य टोळ्या पोर्ट-ऑ-प्रिन्सच्या महानगर क्षेत्रात सक्रिय आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अलिकडच्या वर्षांत या टोळ्यांनी राजधानीवरील आपली पकड अधिक मजबूत केली असून सुमारे 60 ते 80 टक्के शहरावर यांचेच नियंत्रण आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्या मार्टा हुर्टाडो यांनी सांगितल्याप्रमाणे, हैतीमध्ये वाढलेल्या टोळी हिंसाचारामुळे 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1लाख 60 हजार लोक विस्थापित झाले आहेत.

हैतीमध्ये भारतीय समुदाय तुलनेने लहान आहे. यापैकी बहुतेकजण डॉक्टर, अभियंते, तंत्रज्ञ यासारखे व्यावसायिक तसेच मिशनरी आहेत, तर काहीजण भंगार धातूच्या व्यापारासह खाजगी व्यवसायात गुंतलेले आहेत.

भारत-हैती संबंध

भारत आणि हैतीमधील मैत्रीपूर्ण संबंधांना सप्टेंबर 1996 पासून सुरूवात झाली. उभय देशांमधील परस्परसंवाद जरी मर्यादित असला तरी त्यांचे संबंध बऱ्यापैकी विकसित झाले आहेत.

जानेवारी 2024 मध्ये, हैती प्रजासत्ताकाचे परराष्ट्र व्यवहार आणि संस्कृती मंत्री महामहिम जीन व्हिक्टर गेनियस यांना विश्वासपपत्र सादर करण्यासाठी आणि हैती प्रजासत्ताकाचे पंतप्रधान महामहिम डॉ. एरियल हेन्री यांची भेट घेण्यासाठी भारताच्या राजदूतांनी हैतीला भेट दिली होती. या बैठकांचा उद्देश राजनैतिक संबंध मजबूत करणे आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांवर चर्चा करणे हा होता.

भारत आणि हैती यांच्यात कमी प्रमाणात व्यापार होत असला, तरी जेनेरिक औषधे आणि फार्मास्युटिकल्स या क्षेत्रांमध्ये व्यापार वाढीची कमालीची शक्यता आहे. हैतीला होणाऱ्या भारतीय निर्यातीत प्रामुख्याने औषधी वस्तू, कापड, प्लास्टिक आणि लिनोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायने यांचा समावेश आहे. मात्र हैतीमधील राजकीय अस्थिरता आणि स्थानिक बंडखोरीचा निर्यातीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

हैतीच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी आणि मजबूत आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी भारताने हैतीच्या उत्पादनांवरील शुल्क माफ केले आहे. या निर्णयामुळे केवळ हैतीलाच फायदा होणार नसून भारतासाठी हैतीच्या बाजारपेठेत आपले अस्तित्व वाढवण्याच्या संधीही खुल्या होतील.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleभारताची संरक्षण निर्यात : एका महत्त्वाकांक्षी उंचीवर
Next articleIndian Coast Guard Rescues Nine Fishermen In Bay Of Bengal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here