पाकिस्तान–लिबियामध्ये 4 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचा शस्त्रास्त्र करार

0

पाकिस्तानने ‘लिबियन नॅशनल आर्मी’ (LNA) सोबत, 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीचा शस्त्रास्त्र करार केला आहे. उत्तर आफ्रिकन देशावर (लिबिया) संयुक्त राष्ट्रांचे दीर्घकालीन शस्त्र निर्बंध असतानाही करण्यात आलेला हा करार, इस्लामाबादच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संरक्षण निर्यात करारांपैकी एक आहे, असे वृत्त रॉयटर्सने पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

गेल्या आठवड्यात, पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि एलएनएचे उप-कमांडर-इन-चीफ सद्दाम खलिफा हफ्तार यांच्यामध्ये बेंगाझी येथे झालेल्या भेटीनंतर या कराराला अंतिम रूप देण्यात आले, अशी माहिती चार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली. हे सर्व अधिकारी संरक्षण विषयांशी संबंधित असून, कराराच्या संवेदनशीलतेमुळे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि लष्कराने यावर भाष्य करण्याच्या विनंतीला प्रतिसाद दिला नसल्याचे, अहवालात म्हटले आहे.

कराराला अंतिम स्वरुप मिळण्यापूर्वी रॉयटर्सने पाहिलेल्या त्याच्या प्रतीनुसार, या व्यवहारात पाकिस्तान आणि चीनने संयुक्तपणे विकसित केलेल्या 16 ‘JF-17’ मल्टी-रोल फायटर जेट्सचा आणि वैमानिकांच्या मूलभूत प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या 12 ‘सुपर मुशाक’ विमानांच्या विक्रीचा समावेश आहे. एका अधिकाऱ्याने या यादीच्या अचूकतेची पुष्टी केली, तर या यादीत नमूद केलेली उपकरणे अंतिम कराराचा भाग आहेत, परंतु त्यांची नेमकी संख्या अजूनही बदलू शकते, असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या पॅकेजमध्ये जमीन, समुद्र आणि हवाई दलासाठीच्या उपकरणांचा देखील समावेश आहे, ज्यांचा पुरवठा पुढील अडीच वर्षांच्या कालावधीत जाईल. दोन अधिकाऱ्यांनी या कराराचे मूल्य 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे सांगितले, तर अन्य दोघांनी हा आकडा 4.6 अब्ज डॉलर्सच्या आसपास असल्याचे नमूद केले.

एलएनएच्या अधिकृत माध्यम संस्थेने रविवारी जाहीर केले की, त्यांनी पाकिस्तानसोबत संरक्षण सहकार्य करार केला आहे, ज्यामध्ये शस्त्रास्त्रांची विक्री, संयुक्त प्रशिक्षण आणि लष्करी उत्पादनाचा समावेश आहे. मात्र, त्यांनी याविषयी कोणतीही आर्थिक किंवा तांत्रिक माहिती दिली नाही, असे वृत्त रॉयटर्सने दिले.

“आम्ही पाकिस्तानसोबत धोरणात्मक लष्करी सहकार्याच्या नवीन टप्प्याची घोषणा करत आहोत,” असे हफ्तार यांनी अल-हदाथ टेलिव्हिजनद्वारे प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बेंगाझी येथील अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

2011 मध्ये, दीर्घकाळ सत्तेवर असलेले मुअम्मर गडाफी यांची सत्ता उलथवून टाकणाऱ्या नाटो (NATO) समर्थित उठावापासून, लिबिया खोलवर विभागला गेला आहे. पंतप्रधान अब्दुलहमीद दबेबाह यांच्या नेतृत्वाखालील, संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली ‘गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल युनिटी’ (GNU) पश्चिम लिबियाच्या मोठ्या भागावर नियंत्रण ठेवते, तर हफ्तार यांची ‘एलएनए’ पूर्व आणि दक्षिण भागावर वर्चस्व गाजवते, ज्यामध्ये प्रमुख तेलक्षेत्रांचा समावेश आहे. हा गट त्रिपोलीस्थित प्रशासनाचा अधिकार मान्य करत नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्र निर्बंधांबाबत चिंता

2011 पासून लिबियावर संयुक्त राष्ट्रांचे शस्त्र निर्बंध लागू झाले आहेत, ज्यानुसार शस्त्रे आणि लष्करी उपकरणांच्या सर्व हस्तांतरणासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र तज्ज्ञांच्या समितीने, डिसेंबर 2024 च्या अहवालात असे म्हटले आहे की, हे निर्बंध ‘अकार्यक्षम’ आहेत. तसेच, लिबियातील संघर्षात दोन्ही बाजूंना प्रशिक्षण आणि लष्करी मदत देण्याबाबत परदेशी राष्ट्रे अधिकाधिक उघडपणे भूमिका घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाकिस्तान किंवा एलएनएने या निर्बंधांमधून सवलत मागितली होती की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. ‘या करारामुळे संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांचे उल्लंघन होत नाही,’ असे तीन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले. त्यापैकी एकाने सांगितले की, लिबियन घटकांशी संबंध ठेवणारा पाकिस्तान हा एकमेव देश नाही, तर दुसऱ्याने नमूद केले की हफ्तार यांच्यावर वैयक्तिकरित्या कोणतेही निर्बंध नाहीत. तिसऱ्या अधिकाऱ्याने, वाढत्या इंधन निर्यातीमुळे पूर्व लिबियन अधिकारी आणि पाश्चात्य सरकारांमधील सुधारत असलेल्या संबंधांकडे लक्ष वेधले.

पाकिस्तानचा संरक्षण निर्यातीवर भर

अनेक दशकांपासूनचा बंडखोरीविरोधातील अनुभव आणि विमान निर्मिती, चिलखती वाहने, दारूगोळा आणि नौदल बांधणी क्षेत्रात वाढत असलेली देशांतर्गत संरक्षण बाजारपेठ यांचा फायदा घेत, इस्लामाबाद आपल्या संरक्षण निर्यातीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानने सक्रियपणे ‘JF-17’ ची जाहिरात, पाश्चात्य लढाऊ विमानांसाठी कमी खर्चाचा पर्याय अशी केली आहे. यामध्ये पारंपारिक पाश्चात्य पुरवठा साखळीच्या बाहेर राहून प्रशिक्षण आणि देखभालीचा समावेश असलेली अनेक पॅकेजेसही दिली जात आहेत.

“भारतासोबतच्या आमच्या अलीकडील युद्धाने आमची प्रगत क्षमता जगाला दाखवून दिली आहे,” असे मुनीर यांनी अल-हदाथवर प्रसारित झालेल्या भाषणात म्हटले.

पाकिस्तानने आखाती देशांसोबतचे सुरक्षा सहकार्यही वाढवले आहे. तसेच सप्टेंबर 2025 मध्ये, सौदी अरेबियासोबत ‘स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स एग्रीमेंट’वर स्वाक्षरी केली असून, कतारसोबत उच्चस्तरीय संरक्षण चर्चा देखील केली आहे.

लिबियाच्या विखुरलेल्या सुरक्षा संस्था आणि तेल-आधारित अर्थव्यवस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक शक्तींमध्ये स्पर्धा सुरू असताना, लिबियासोबतच्या या करारामुळे उत्तर आफ्रिकेतील पाकिस्तानचा संरक्षण प्रभाव लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous article2025 मध्ये ट्रम्प टॅरिफमुळे जागतिक व्यापारात उलथापालथ, अनिश्चितता कायम
Next articleपाकिस्तानमध्ये बॉम्बहल्ला आणि गोळीबारात पाच पोलीस ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here