पाकिस्तानचा बांगलादेशला JF-17 विमानांचा प्रस्ताव; संरक्षण संबंधांत वाढ

0

द्विपक्षीय संरक्षण सहकार्य विस्तारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पाकिस्तान आणि बांगलादेश ‘JF-17 थंडर’ लढाऊ विमानांच्या संभाव्य विक्रीची चाचपणी करत आहेत. भारत–बांगलादेश संबंधांमध्ये तणावाचे संकेत मिळत असताना, नवी दिल्लीतून या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

पाकिस्तानचे एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू, यांनी मंगळवारी इस्लामाबादमध्ये बांगलादेश हवाई दलाचे (BAF) प्रमुख एअर चीफ मार्शल हसन महमूद खान यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत कार्यात्मक सहकार्य, प्रशिक्षण देवाणघेवाण आणि चीनच्या सहकार्याने विकसित केलेल्या, पाकिस्तानच्या ‘JF-17’ या आघाडीच्या मल्टिरोल फायटर विमानांच्या संभाव्य खरेदीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

पाकिस्तानच्या इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन्सने (ISPR) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी त्यांच्या हवाई दलांमधील “संस्थात्मक समन्वय” वाढवण्यावर चर्चा केली, ज्यामध्ये प्रशिक्षण, विमान देखभाल सहाय्य आणि एरोस्पेस तंत्रज्ञानातील सहकार्याचा समावेश आहे. ISPR च्या मते, पाकिस्तानने बांगलादेशी वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘सुपर मुश्शाक’ प्रशिक्षम विमाने आणि त्याशी संबंधित पायाभूत सुविधा देण्याची ऑफर देखील दिली आहे.

बांगलादेश हवाई दलाच्या प्रमुखांनी त्यांच्या जुन्या होत चाललेल्या ताफ्याला टिकवून ठेवण्यासाठी, तांत्रिक आणि कार्यात्मक मदतीची मागणी केली, तसेच हवाई संरक्षण रडार यंत्रणा एकत्रित करण्याबाबत सहकार्याची चाचपणी केली. भेट देणाऱ्या शिष्टमंडळाने पाकिस्तान हवाई दलाच्या (PAF) अनेक प्रमुख सुविधांना भेटी दिल्या, ज्यात नॅशनल ISR आणि इंटिग्रेटेड एअर ऑपरेशन्स सेंटर, सायबर कमांड आणि नॅशनल एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांचा समावेश होता. हे पाकिस्तानच्या वाढत्या एरोस्पेस परिसंस्थेचे प्रदर्शन करण्याच्या हेतूचे संकेत देते.

JF-17: धोरणात्मक निर्यात प्लॅटफॉर्म

चिनी बनावटीच्या JF-17 फायटर्सनी, पाकिस्तान हवाई दलातील (PAF) जुन्या विमानांची जागा घेतली आहे. मित्र देशांमधील विकसनशील हवाई दलांसाठी हे एक किफायतशीर लढाऊ विमान म्हणून विकले जाते. या फायटर विमानाचा वापर दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये आणि सीमावर्ती संघर्षांमध्ये करण्यात आला आहे. पाकिस्तानचा असा दावा आहे की, 2019 मध्ये भारतासोबत झालेल्या हवाई संघर्षात तसेच त्यानंतरच्या सीमापार मोहिमांमध्ये JF-17 फायटर्सनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती, मात्र नवी दिल्लीने या दाव्यांचे खंडन केले आहे.

2025 च्या उत्तरार्धात, इस्लामाबादने या विमानाची निर्यात वाढवण्याची योजना जाहीर केली आणि लिबियासह एका “मित्र देशासोबत” भविष्यातील विक्रीसाठी सामंजस्य करार (MoU) केल्याचे उघड केले.

हेही वाचा: बांगलादेश हा पाकिस्तानकडून JF-17 ब्लॉक III जेट्स खरेदी करणारा ‘मित्र देश’ आहे का?

ढाकाच्या संरक्षण धोरणात बदल?

ही चर्चा अशावेळी होत आहे, जेव्हा पाकिस्तान-बांगलादेश संबंध लक्षणीयरीत्या सुधारले आहेत, तर दुसरीकडे 2024 च्या राजकीय उलथापालथीनंतर, ज्यावेळी माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता, त्यानंतर ढाकाचे नवी दिल्लीसोबतचे संबंध अधिक अनिश्चिततेच्या टप्प्यात आले आहेत.

हेही वाचा: चीनची J-10C फायटर्स ढाकाकडे झेपावत आहेत, भारताच्या पूर्व सीमेवर नवी चिंता

भारतासाठी बांगलादेश हा बंगालच्या उपसागरात आणि ईशान्येकडील सुरक्षा चौकटीत एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. ढाका आणि इस्लामाबाद यांच्यातील संरक्षण सहकार्यातील कोणतीही वाढ, विशेषतः जर त्यात चिनी बनावटीच्या यंत्रणांचा समावेश असेल, तर नवी दिल्ली त्याकडे भारताच्या शेजारील देशांमध्ये चीन-पाकिस्तानच्या व्यापक धोरणात्मक उपक्रमांचा भाग म्हणून पाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चिनी विमानांच्या संभाव्य विक्रीची चर्चा अजूनही प्राथमिक टप्प्यावर असली, तरी ही विमाने पुरवण्याबाबत पाकिस्तानची वचनबद्धता, तसेच वैमानिक प्रशिक्षण, सर्वसमावेशक देखभाल यंत्रणा आणि इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकॉनिसन्स (ISR) मधील सहकार्य, बांगलादेश हवाई दलाशी (BAF) कार्यात्मक संबंध प्रस्थापित करण्याची दीर्घकालीन रणनीती सूचित करते.

पाकिस्तान-बांगलादेशमध्ये विकसित होत असलेली संरक्षण समीकरणे, नवी दिल्लीसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची राहणार आहेत.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleइराणमधील आंदोलनांत किमान 25 जण ठार; मानवाधिकार संघटनांचा दावा
Next articleलेफ्टनंट जनरल एस.के. सिन्हा: भारताचे डावलले गेलेले लष्करप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here