पाकिस्तानात प्रवासी ट्रेनवर ताबा मिळवल्यानंतर, अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या शेजारी बॉम्ब परिधान केलेले हल्लेखोर (सुसाईड बॉम्बर्स) आढळून आल्याचे, सूत्रांनी बुधवारी सांगितले. यामुळे अपहरणाच्या दुसऱ्याच दिवशी बचाव कार्य अधिक गुंतागुंतीचे झाले असून, बंधकांची सुटका करणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथून, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर येथे जाणाऱ्या ‘जाफर एक्सप्रेसवर’ फुटीरतावादी दहशतवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवून देत गोळीबार केला आणि ट्रेन ताब्यात घेतली.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने आतापर्यंत 155 प्रवाशांची सुटका केली असून, सरकारने सांगितले की, अद्यापही ओलीस ठेवलेल्या डझनभर प्रवाशांना सोडवण्यासाठी सुरक्षा मोहीम राबवली जात आहे. मात्र ओलीस ठेवलेल्यांची निश्चीत संख्या समोर आलेली नाही.
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या सशस्त्र दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आणि जर बलुच राजकीय कैदी, कार्यकर्ते आणि संदेशवाहकांना 48 तासांच्या आत आत मुक्त न केल्यास बंधकांची कत्तल सुरू करण्याची धमकी दिली आहे.
बीएलएने मंगळवारी सांगितले की, त्यांनी 214 लोकांना ओलीस ठेवले आहे आणि एका सुरक्षा सूत्राने रॉयटर्सला सांगितले की, हल्ला झाला तेव्हा ट्रेनमध्ये एकूण 425 प्रवासी होते.
पाकिस्तानमधील ट्रेन अपहरणात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी अजूनही स्पष्ट झाली नाही.
सुरक्षा सूत्रांनी बुधवारी सांगितले की, आतापर्यंत या हल्ल्यांत 27 जण ठार झाले आहेत.
अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तान, या खनिजांनी समृद्ध प्रांतात पाकिस्तान सरकारशी लढणाऱ्या अनेक वांशिक सशस्त्र दहशतवादी गटांपैकी BAL हा सर्वात मोठा गट आहे.
बुधवारी पहाटे, बचाव करण्यात आलेल्या काही प्रवाशांना सुरक्षा दलांच्या पथकाने क्वेटामध्ये आणले, जिथे त्यांचे कुटुंबीय त्यांची वाट पाहत होती.
“ट्रेनमधील लोकांवर हल्ला करण्यात आला…काही प्रवासी जखमी झाले आणि काही प्रवाशांचा मृत्यू झाला,” असे ट्रेनमध्ये असलेले प्रत्यक्षदर्शी मोहम्मद आश्रफ यांनी सांगितले.
Geo News च्या वार्ताहरांना दिलेल्या साक्षीमध्ये, अनेक साक्षीदारांनी सांगितले की, ‘सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार सुरू केल्यावर त्यांना खाली बसण्यास सांगितले गेले.’
ब्रॉडकास्टरकडून प्रसारित झालेल्या दृश्यांमध्ये, बचाव करण्यात आलेले लोक त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांना भेटताना दिसले.
एका महिला जिचा मुलगा अजूनही ट्रेनमध्ये बंधक आहे, तिने प्रांतीय मंत्री मीर जाहूर बुलेदी यांना सांगितले की “जर तुम्ही गाड्या सुरक्षित करू शकत नसाल तर तुम्ही त्या चालवू नका. कृपया माझ्या मुलाला परत आणा”
जोपर्यंत सुरक्षा यंत्रणा हे क्षेत्र सुरक्षित असल्याचे घोषित करत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तान रेल्वेने पंजाब आणि सिंध प्रांतांतील सर्व ऑपरेशन्स बलुचिस्तानमध्ये स्थगित केली आहेत, अशी माहिती स्थानिक मीडियाने बुधवारी दिली.
बुलेदी यांनी माध्यमांना सांगितले की, ‘पाकिस्तान सरकार या क्षेत्रातील सुरक्षा स्थिती सुधारण्यासाठी काम करत आहे.’
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)