संपूर्ण देशात रविवारी गुरु पौर्णिमा साजरी होत असताना, आयएनएस ब्रह्मपुत्रेसाठी तो दिवस फारसा अनुकूल नव्हता. 21 जुलैच्या संध्याकाळी स्वदेशी बनावटीच्या ब्रह्मपुत्रा या बहुउद्देशीय युद्धनौकेवर आग लागल्याची माहिती नौदलाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिली. मुंबईतील प्रमुख नेव्हल डॉकयार्ड येथे जहाजाची नियमित दुरुस्ती सुरू असताना ही आग लागली.
22 जुलैच्या सकाळपर्यंत बंदरातील डॉकयार्ड आणि इतर जहाजांच्या मदतीने ब्रह्मपुत्रेवरील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. नियमित प्रक्रियेचा एक भाग म्हणून, आगीनंतरच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी सॅनिटायझेशन तपासणीसह फॉलो-ऑन कृतींचे पालन करण्यात आले. एकामागोमाग एक दुःखद घटना घडत असतानाच, दुपारी जहाज गंभीर ‘लिस्टिंग’ किंवा सामान्य भाषेत एका बाजूने पाण्याच्या दिशेने काहीसे कलंडले. संध्याकाळपर्यंत बहुतेक वृत्तवाहिन्यांनी जहाजाबद्दलची बातमी छायाचित्रांसह द्यायला सुरुवात केली. तर दुसरीकडे जहाजाची कलंडलेली बाजू आणखी खाली जायला सुरूवात झाली.
भारतीय नौदलाचे जहाज कलंडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. योगायोगाने, आठ वर्षांपूर्वी, डिसेंबर 2026 मध्ये, त्याच वर्गाचे आणखी एक जहाज, आयएनएस बेतवा देखील पूर्ववत होत असताना अचानक कलंडले होते. शांतता काळात भारतीय नौदलाला अनेक अपघातांना सामोरे जावे लागले आहे. या घटनांबद्दल काय मत व्यक्त करावे? ब्रह्मपुत्रेच्या संदर्भात घडलेली गोष्ट पूर्ण झाली का आणि तिचा शेवट चांगला झाला आहे का? विशेषतः भारतीय नौदलाच्या दृष्टीने गोदीतील कामाची संस्कृती ही चिंतेची बाब आहे का? नौदलाने भूतकाळातून धडे घेतले नाहीत का? असे प्रश्न अपेक्षित आहेत यात काहीच शंका नाही. पण हे खरोखरच केवळ भारतीय नौदलाच्या बाबतीतच घडते आहे का? सर्व अत्याधुनिक युद्धनौकांसाठी निधी पुरविणारे सामान्य नागरिक आणि करदाते म्हणून, आपण या सर्व घटनांकडे कसे बघतो?
बंदरात उभ्या असलेल्या आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना, अलीकडच्या काळातील सर्वात मोठा नौदल अपघात यूएसएस बोनहोम रिचर्डचा होता. जुलै 2020 मध्ये सॅन डिएगोच्या बंदरात जहाजाची दुरुस्ती सुरू असताना, अत्याधुनिक 41हजार टन वजनाच्या वास्प-श्रेणीच्या या जहाजाला आग लागली आणि हे जहाज पूर्णपणे जळून खाक झाले. आग एवढी भयंकर होती की तिच्यावर चार दिवसांनंतरही नियंत्रण मिळवता आले नव्हते. आग लागली तोपर्यंत जहाजाचे एकंदर आयुष्यातील केवळ एक तृतीयांश आयुष्य पूर्ण झाले होते. मात्र दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याचा अंदाज असल्याने अखेरीस जहाज मोडीत काढावे लागले. गेल्या आठवड्यातच, इराणी नौदलाचे सहंद हे विध्वंसक जहाज बंदर अब्बासच्या किनाऱ्यावर सुरू असणाऱ्या दुरुस्तीच्या वेळी अपघातग्रस्त झाले आणि परिणामी ते एका बाजूला कलंडले. नवीन विमानवाहू जहाजांपैकी दुसरे अशी ओळख असणाऱ्या ब्रिटनच्या सर्वात महागड्या युद्धनौका एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सवर कामगिरीपेक्षा सुरूअसलेल्या दुरुस्तीसाठीच जास्त वेळ आणि पैसा खर्च केला गेला. शेवटी तिला बंदरातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला.
खरेतर, जहाज दुरुस्ती हा एक प्रचंड गुंतागुंतीचा टप्पा आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणातील सुधारणांबरोबरच व्यापक दुरुस्तीचाही समावेश असतो. जगभरात, युद्धनौकांच्या सुधारणा या कधीही सोप्या नव्हत्या. अशा सुधारणांमध्ये जुनी उपकरणे काढून टाकणे याचा समावेश असते. याशिवाय या उपकरणांची तपासणी, दुरुस्ती, परत चाचणी करणे, परत ती उपकरणे योग्य जागी लावणे आणि पुन्हा चाचणी करणे अशा प्रक्रियाही समाविष्ट असतात. त्याच वेळी, जुन्या युद्धनौका नव्या कामगिरीसाठी सज्ज ठेवण्याच्या बरोबरीनेच त्यात नवीन, अद्ययावत उपकरणे बसवली जातात. वेल्डिंगचे काम आणि त्यामुळे होणारा धूर, नवीन केबलिंग करणे, जुने काढून टाकणे आणि पेंटवर्क यासारख्या दुरुस्तीच्या कामांच्या स्वरूपामुळे बहुतेक वेळा तिथे पुरेसे वायूविजन नसते. जहाजावरील सर्वच कामे, प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा शोषून घेणारी असतात. दुरुस्तीच्या काळातही, जहाजाचे कर्मचारी स्वयं-प्रशिक्षण, नवीन उपकरणे बसविण्याच्या किंवा जुन्या उपकरणांची डागडुजी करून ती परत बसवणे, त्यांच्या चाचण्या घेणे आणि इतरअसंख्य व्यावसायिक कमांमध्ये गुंतलेले असतात.
युद्धनौका असोत किंवा व्यावसायिक जहाजे, दुरुस्तीच्या वेळी जहाजांवर लागणाऱ्या आगी जगभरात सामान्य मानल्या जातात. वेल्डिंग, कटिंग, हाय व्होल्टेज इलेक्ट्रॉनिक उपकरणे काढून टाकणे आणि नवीन उपकरणे बसवणे हे कदाचित सामान्यांच्या दृष्टीने धक्कादायक असू शकेल. त्यावेळी उडणाऱ्या ठिणग्यांचे मोठ्या आगीत रूपांतर होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, अगदी भारतीय नौदलातही. उलटपक्षी नौदलाने सुरू केलेल्या सुधारणा आणि आधुनिकीकरणाचा वेग या आव्हानांनी कायम भरलेला असतो. दुरुस्तीच्या वेळी लागलेली आग विझवणे हे सोपे काम नाही. पाईपलाईन्स आणि केबल्स असलेले,धुराने भरलेले आणि प्रकाश नसलेले छोटे, अरूंद मार्ग, अग्निशमन दलासाठी अगदी सर्वात अनुभवी अग्निशमन दलासाठी देखील एक प्रचंड आव्हान बनतात. ब्रह्मपुत्रेसारख्या घडलेल्या घटनेचा अंदाज लावणे आणि तिचे अतिसुलभीकरण करणे हे चुकीचे धडे शिकण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
भारतीय नौदलासारख्या व्यावसायिक नौदलांसाठी दुरुस्तीच्या कालमर्यादा अनेकदा कठोरपणे पाळाव्या लागतात. त्यामुळे अतिशय आव्हानात्मक भौतिक वातावरणात काम करणे हे जहाजावरील आणि डॉकयार्डमधील कर्मचारी या दोघांसाठीही एक कठीण काम असते. भारतीय नौदलाच्या कार्यरत तुकड्या, पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर, प्रामुख्याने नोव्हेंबर/डिसेंबर 2023 पासून वाढवण्यात आल्या आहेत. समुद्री चाच्यांपासून समुद्राची सुरक्षा सुनिश्चित करणे, एडन/लाल समुद्राच्या आखातात सागरी सुरक्षा मोहिमा हाती घेणे आणि इतर देखरेख तसेच मुत्सद्देगिरीची भूमिका पार पाडण्यासाठी पश्चिम हिंद महासागर प्रदेशात आणि त्यापलीकडे भारतीय नौदल मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे.
अशा व्यापक देखरेखीच्या कामांमुळे, समुद्रात दुरुस्तीचे काम करण्यासाठी प्लॅटफॉर्म कायम तैनात केलेले असतील याची खात्री करावी लागते. त्यामुळे डॉकयार्ड एजन्सींवर दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यासाठी किती दबाव असेल याची आपण कल्पना करू शकते. अर्थात, अशा अपघातासाठी असणारे कोणतेही कारण समर्थनीय असूच शकत नाही. तरीसुद्धा, जहाजे आणि डॉकयार्डमधील कर्मचाऱ्यांवर काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रचंड दबाव आणणारी परिस्थिती ओळखणे आवश्यक आहे. तसेच, अपघात ही अशी घटना असते जिचा प्राथमिक हेतू अपघात होणे असा कधीच नसतो.
उच्च पातळीची परिपक्वता आणि सचोटीचा अभिमान बाळगणारे, व्यावसायिकदृष्ट्या आत्मनिरीक्षण करणारे आणि आक्रमक असणारे भारतीय नौदल, संघटनात्मक कमतरता आणि ब्रह्मपुत्रा अपघातास कारणीभूत ठरलेल्या सुप्त परिस्थितीची सखोल चौकशी करेल याची खात्री आहे. शिवाय, पूर्वीची उदाहरणे लक्षात घेऊन भारतीय नौदलाला परत एकदा आपला जलवा दाखवणे बंधनकारक आहे. याआधी आयएनएस बेतवावर आग लागली होती, तेव्हा इंटरनेटवरील तिच्या फोटोंमुळे बेतवावर ऑनलाइन शोकसंदेश लिहिले गेले. (ती आता परत कोणतेही काम करण्यास असमर्थ असल्याचे त्यात म्हटले गेले होते.) पण तरीही, त्या नौकेने आपला 20वा वर्धापनदिन उत्साहाने साजरा केला आणि दैनंदिन कामगिरीत ती कायम आघाडीवर राहिली आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्राही तिच्या उग्र आणि भक्कम अशा गेंड्यांच्या शक्तीने परत एकदा कार्यरत होईल यात काहीच शंका नाही.
पश्चिम हिंद महासागर क्षेत्रात असामान्य कामगिरीत सातत्य राखत नौदलाला आपले स्थान परत एकदा बळकट करता येईल यात काहीच शंका नाही.
कमांडर अशोक बिजलवान (निवृत्त)