चिनी लष्कराच्या अधिकृत वृत्तपत्राने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याप्रती अतूट निष्ठा जाहीर करत त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. बीजिंगकडून दोन माजी संरक्षण मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा झाल्यानंतर ही निष्ठा जाहीर करण्यात आली आहे. द पीएलए डेली या वृत्तपत्राने कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविण्यासाठी एकत्र येण्याचे, कॉमरेड शी जिनपिंग यांच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवण्याचे, आणि चिनी नेत्यांकडून मांडल्या गेलेल्या राजकीय सिद्धांतांवर प्रभुत्व मिळवण्याचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे लष्कराला आवाहन केले आहे.
याव्यतिरिक्त, वृत्तपत्राने पक्ष शाखेत दिले जाणारे शिक्षण अधिक तीव्र करण्याचे, सर्वसमावेशक स्व-सुधारणेच्या भावनेला प्रोत्साहन देण्याचे आणि भ्रष्टाचाराला चालना देणारी मूळ कारणे, परिस्थिती नष्ट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे वचन दिले आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या 103व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी हा संदेश प्रकाशित करण्यात आला.
दोन माजी संरक्षण मंत्री, वेई फेंघे आणि त्यांचे उत्तराधिकारी ली शांगफू यांची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू असल्याचे पॉलिटब्युरोने गेल्या आठवड्यात जाहीर केले. या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्यावर फौजदारी खटला चालवला जाणार आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये ली यांना अचानक त्यांच्या पदावरून कोणतेही स्पष्टीकरण न देता काढून टाकण्यात आले होते. पीएलए डेलीच्या एका संपादकीय लेखात म्हटले आहे की, “पक्ष नेतृत्वाचे लष्करावर असणारे नियंत्रण हा पिपल्स आर्मीचा आणि सैन्य उभारणी मजबूत करण्याचा पाया आहे.”
पक्ष नेतृत्वाने “संपूर्ण सैन्याला चिनी वैशिष्ट्ये लक्षात घेऊन एक मजबूत सैन्य तयार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नवीन युगात पिपल्स आर्मीचे पुनरुज्जीवन, पुनर्रचना आणि विकास केला आहे,” असेही या लेखात म्हटले आहे.
प्रमुख लष्करी अधिकारी आणि राजकीय कमिशनरसोबत गेल्या महिन्यात झालेल्या केंद्रीय लष्करी आयोगाच्या (सीएमसी) राजकीय कार्य परिषदेतील शी जिनपिंग यांच्या वक्तव्यांचा हा पुनरुच्चार आहे.
एक दशकाहून अधिक काळ माओ त्से तुंगचे मुख्यालय असलेल्या शांक्सी प्रांतातील यान या शहरात झालेल्या बैठकीत शी जिनपिंग यांनी संपूर्ण एकनिष्ठेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की पीपल्स लिबरेशन आर्मीने “भ्रष्टाचाराला जन्म देणाऱी परिस्थिती” दूर केली पाहिजे. सीएमसीचे अध्यक्ष असलेले शी यांनी जोर देऊन सांगितले की, “जे पक्षाप्रती निष्ठावान आणि विश्वासू आहेत, त्यांच्या हातात नेहमीच बंदुका असायला हव्यात. आणि आपण हे स्पष्ट केले पाहिजे की लष्करात कोणत्याही भ्रष्ट घटकांना स्थान नाही.”
पीएलए डेलीने म्हटले आहे की नेतृत्वाने “कठीण आणि गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीला आणि एकामागून एक येणाऱ्या तातडीच्या जोखीम आणि आव्हानांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी पक्ष, सशस्त्र सेना आणि लोकांची एकजूट करून त्यांचे नेतृत्व केले आहे.” “नवीन युगाच्या महान बदलांसाठी” “वैज्ञानिक मार्गदर्शन पुरविणाऱ्या शी यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या राजकीय सिद्धांताची त्यांनी प्रशंसा केली, ज्यामुळे त्यांच्या राजकीय योगदानाबद्दल आदर आणि कौतुकाची भावना निर्माण झाली असल्याचेही लेखात नमूद करण्यात आले आहे.
टीम भारतशक्ती