गेल्या 40 वर्षात ऑस्ट्रियाला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान

0
नरेंद्र
व्हिएन्ना विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत झाले (फोटो - मोदी यांच्या एक्स अकाउंटवरून)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मॉस्कोहून ऑस्ट्रियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी व्हिएन्ना येथे पोहोचले. या भेटीत दोन्ही देश त्यांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि अनेक भू-राजकीय आव्हानांवर एकत्रितपणे कसं काम करता येईल यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. तिथे पोहोचल्यावर पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर आपल्या भावना पोस्ट केल्या.

40 वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाचा केलेला हा पहिलाच दौरा आहे, याआधी 1983 साली इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रियाचा दौरा केला होता.

पंतप्रधान मोदी बुधवारी ऑस्ट्रिया प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डर बेलन यांची भेट घेतील तर ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमर यांच्याशी चर्चा करतील.
पंतप्रधान आणि चॅन्सेलर भारत आणि ऑस्ट्रियामधील उद्योगपतींनाही संबोधित करणार आहेत.

ऑस्ट्रियाच्या दौऱ्यापूर्वी मोदी यांनी रविवारी सांगितले की, लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य ही सामायिक मूल्ये आधारस्तंभ आहेत ज्यावर दोन्ही देश नेहमीच जवळची भागीदारी निर्माण करतील.

त्याच्या एक दिवस आधी ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर नेहमर यांनी आपल्या भावना ‘एक्स’वर पोस्ट केल्या होत्या, “जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील आठवड्यात व्हिएन्नामध्ये स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” “हा दौरा एक विशेष सन्मान आहे कारण 40 वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे आणि भारताशी राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करत असताना हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असं ते म्हणाले.

ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर म्हणाले, “आम्हाला आमचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत आणि अनेक भू-राजकीय आव्हानांवर अधिक सहकार्य करण्याबाबत बोलण्याची संधी मिळेल.”

नेहमर यांना उत्तर देताना मोदी म्हणाले, “चॅन्सेलर कार्ल नेहमर, धन्यवाद. हा ऐतिहासिक प्रसंग साजरा करण्यासाठी ऑस्ट्रियाला भेट देणे हा खरोखरच एक सन्मान आहे. आपल्या देशांमधील बंध मजबूत करण्यासाठी आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी होणाऱ्या आपल्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे.” लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य ही सामायिक मूल्ये आधारस्तंभ आहेत, ज्यावर आपण अधिकाधिक घनिष्ठ भागीदारी निर्माण करू, असंही पंतप्रधान म्हणाले.

व्हिएन्ना विमानतळावरील भव्य स्वागतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हॉटेल रिट्झ-कार्लटन येथे पोहोचले. तेथे ऑस्ट्रियाच्या कलाकारांनी ‘वंदे मातरम्’ गात त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांनी तिथे स्थाईक झालेल्या भारतीय चमूचेही स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रिया प्रजासत्ताकाचे फेडरल चॅन्सेलर कार्ल नेहमर यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीसाठी पोहोचले.

आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleRussia Agrees To Speed Up Delivery Of Military Spare Parts, Encourage Joint Manufacturing In India
Next articleNavy’s Frigate INS Tabar Visits Morocco To Bolster Naval Ties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here