पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यातील प्रमुख बैठकीत सीमा शांततेवर भर

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सीमाप्रश्नाच्या “न्याय्य, वाजवी आणि परस्पर स्वीकारार्ह” निराकरणासाठी वचनबद्ध असताना, द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी पाया म्हणून सीमेवर शांतता राखण्याची गरज अधोरेखित केली.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद 2025 च्या आधी दोन्ही नेत्यांची तियानजिन शहरात भेट झाली. या निमित्ताने मोदींचा सात वर्षांतील हा पहिलाच चीन दौरा होता तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) प्रदीर्घ तणाव संपवण्यासाठी गेल्या ऑक्टोबरमध्ये दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्यानंतर दोन्ही नेत्यांची झालेली ही  दुसरी बैठक होती. एप्रिल-मे 2020 मध्ये सुरू झालेल्या सीमेवरील संघर्षामुळे 1962 च्या युद्धानंतरचे संबंध नीचांकी पातळीवर पोहोचले होते.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी कझान येथे झालेल्या त्यांच्या आधीच्या बैठकीनंतर संबंधांमधील “सकारात्मक गती आणि स्थिर प्रगती” चे स्वागत केले. तसेच त्यांनी भारत आणि चीन हे “विकासाचे भागीदार आहेत, प्रतिस्पर्धी नाहीत आणि मतभेद विवादात बदलू नयेत” यावर भर दिला. त्यांची ही चर्चा सुमारे एक तास चालली.

सीमा समस्येने एकंदर संबंध परिभाषित करू नयेत‌ असे शी जिनपिंग यांनी सुचवले तर मोदी यांनी पुनरुच्चार केला की “द्विपक्षीय संबंधांच्या निरंतर विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे.” 2024 मध्ये सैन्याची माघार आणि तेव्हापासून शांतता राखल्याबद्दल नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

“आपल्या विशेष प्रतिनिधींनी सीमा व्यवस्थापनाबाबत एक करार केला आहे. माघार घेतल्यानंतर शांतता आणि स्थैर्याचे वातावरण निर्माण होते. परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर आपले संबंध पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे मोदी म्हणाले.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सीमेवरील शांततेचे वर्णन संबंधांसाठी “इन्शुरन्स पॉलिसी” असे केले आणि नमूद केले की “सीमेवरील परिस्थितीचा परिणाम एकूण संबंधांमध्ये परिवर्तित झालेला दिसून येईल. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांना हे स्पष्टपणे कळवले होते.”

यावर्षी राजनैतिक संबंधांच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त शी जिनपिंग यांनी चीन आणि भारत हे प्रतिस्पर्धी नसून सहकार्याचे भागीदार आहेत आणि दोन्ही देशांनी एकमेकांकडे “धोक्यांऐवजी विकासाच्या संधी” म्हणून पाहिले पाहिजे यावर भर दिला. त्यांनी मजबूत धोरणात्मक संवाद, सखोल परस्पर विश्वास आणि समान हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.

“ड्रॅगन आणि हत्ती (चीन आणि भारत) यांनी परस्पर सहकार्याने ‘पास डी ड्यूक्स’ (फ्रेंच भाषेतील वाक्प्रचार असून पुरुष आणि महिला यांच्या जोडीने सादर केलेले नृत्य असा त्याचा अर्थ आहे) मध्ये गुंतले पाहिजे. चीन आणि भारत हे चांगले शेजारी तसेच एकमेकांना यशस्वी होण्यास मदत करणारे भागीदार असले पाहिजेत,” असे शी जिनपिंग म्हणाले, दोन्ही बाजूंनी सीमाप्रश्नावरून व्यापक संबंधांवर पडदा पडू देऊ नये.

शी जिनपिंग म्हणाले, “दोन्ही आशियाई शेजारी देशांनी त्यांच्या सीमावर्ती भागात शांतता राखण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे आणि सीमेचा मुद्दा एकंदर चीन-भारत संबंधांना परिभाषित करू देऊ नये.”

परस्पर विश्वास दृढ करण्यासाठी, देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी, धोरणात्मक संवाद मजबूत करण्यासाठी, सौहार्दपूर्ण सहअस्तित्वासाठी एकमेकांच्या चिंतांकडे लक्ष देण्यासाठी आणि समान हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांना आवाहन केले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articlePM Modi, Xi Jinping Stress Border Peace In Key Meet
Next articleआशियाई शतक भारत-चीन सहकार्यावर अवलंबूनः विक्रम मिस्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here