नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार इस्रायलच्या ताब्यातून स्वतंत्र होऊन राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी सशस्त्र संघर्ष करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी हमास हा सर्वोत्तम पर्याय असल्याने पॅलेस्टिनींकडून त्यांना पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत पॅलेस्टिनींकडून हमासला मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ झाली आहे.
पॅलेस्टिनी सेंटर फॉर पॉलिसी अँड सर्व्हे रिसर्चकडून (पीएसआर) हे सर्वेक्षण करण्यात आले. वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमधील सर्वेक्षणात सशस्त्र संघर्षाला मिळालेल्या पाठिंब्यात 8 टक्क्यांची वाढ होऊन तो आता 54 टक्के झाला. हमासला असलेला पाठिंबा 6 टक्क्यांनी वाढून 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या नेतृत्वाखालील फताहला 20 टक्के जनतेचा पाठिंबा आहे.
गाझा युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे आठ महिन्यांनी हे मतदान घेण्यात आले.
दोन तृतीयांश नागरिकांच्या मते 7 ऑक्टोबरचा हल्ला हा योग्य निर्णय होता, असे या सर्वेक्षणात आढळले आहे. मागील मतदानाच्या तुलनेत यात 14 टक्क्यांची घसरण झाली आहे. गाझामध्ये मार्चमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात 71 टक्के नागरिकांनी हल्ल्याचा निर्णय बरोबर होता असे मत नोंदवले होते. यावेळी त्यात घसरण होऊन केवळ 57 टक्के नागरिकांनी तो निर्णय योग्य असल्याचे सांगितले.
याशिवाय गाझामधील सुमारे 80 टक्के पॅलेस्टिनी नागरिकांनी या युद्धात आपले नातेवाईक गमावले आहेत किंवा जखमी झाले आहेत असेही या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
पीएसआरमधील सर्वेक्षण संशोधन विभागाचे प्रमुख वालिद लदादवेह यांच्या मते, हमासला मिळालेला पाठिंबा हा गाझामध्ये इस्रायलने सुरू केलेला विध्वंस आणि हत्या यांना विरोध करण्यासाठी दिला गेलेला प्रतिसाद आहे.
अब्बास यांच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी प्राधिकरणाबाबत निर्माण झालेला असंतोष या सर्वेक्षणातून दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. अब्बास यांनी बऱ्याच काळापासून इस्रायलच्या बाजूने पॅलेस्टाईन राज्याच्या निर्मितीसाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला असून सशस्त्र संघर्षाला विरोध दर्शवला आहे.
पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील शांतता प्रक्रिया अनेक वर्षांपासून ठप्प झाली आहे. खरंतर या प्रक्रियेमुळे गाझा पट्टी आणि वेस्ट बँकेच्या पूर्वेस असणाऱ्या राजधानी जेरुसलेमसह पॅलेस्टाईन हे राज्य आपल्याला मिळेल अशी पॅलेस्टिनींना आशा होती. 1967 च्या मध्य पूर्व युद्धात इस्रायलने ताब्यात घेतलेले हे प्रदेश आहेत. इस्रायलने मात्र वेस्ट बँकमध्ये आपला सत्ताविस्तार करत पॅलेस्टिनी राज्याला विरोध केला आहे.
अश्विन अहमद
(रॉयटर्स इनपुट्ससह)