ट्रम्प यांचा विरोध न जुमानता पुतीन युक्रेनचा भाग गिळंकृत करणार

0
पुतीन
पाश्चिमात्य देशांकडून शांततेसाठी जोपर्यंत आपल्या अटी पूर्ण होत नाहीत तोवर युक्रेनमध्ये लढाई सुरूच ठेवण्याचा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा मानस आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्बंधांच्या धमक्यांमुळे ते अजिबात घाबरलेले नसून रशियन सैन्य आगेकूच करत असताना त्यांच्या प्रदेश बळकावण्याच्या मागण्या वाढू शकतात, असे क्रेमलिनच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. 

रशियाची अर्थव्यवस्था आणि त्याचे सैन्य कोणत्याही अतिरिक्त पाश्चात्य निर्बंधांना तोंड देण्याइतके मजबूत आहे, असे पुतीन यांना वाटते, असेही सूत्रांनी सांगितले.

युद्धबंदीवर सहमती दर्शविण्यास पुतीन यांनी नकार दिल्याबद्दल सोमवारी ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली आणि युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा करण्याची घोषणा केली, ज्यामध्ये पॅट्रियट या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश आहे. 50 दिवसांच्या आत शांतता करार झाला नाही तर रशियावर आणखी निर्बंध लादण्याची धमकीही त्यांनी दिली.

क्रेमलिन राष्ट्राध्यक्षांच्या विचारसरणीशी परिचित असलेल्या तीन रशियन सूत्रांनी सांगितले की, पुतीन पश्चिमेकडून येणाऱ्या दबावाखाली युद्ध थांबवणार नाहीत आणि त्यांचा असा विश्वास आहे की रशिया – जो पश्चिमेकडून लादलेल्या सर्वात कठोर निर्बंधांपासून अजूनही स्वतःचे संरक्षण करू शकला आहे – रशियन तेल खरेदीदारांना लक्ष्य करणाऱ्या अमेरिकेच्या शुल्काच्या धमकीसह – यापुढेही आर्थिक निर्बंध सहन करू शकेल.

“पुतीन यांना वाटते की युक्रेनमध्ये शांतता नांदावी यादृष्टीने आवश्यक तपशीलांवर कोणीही त्यांच्याशी गंभीरपणे चर्चा केलेली नाही – अमेरिकन लोकांसह – म्हणून ते त्यांना हवे ते मिळेपर्यंत युद्ध सुरूच ठेवतील,” असे परिस्थितीच्या संवेदनशीलतेमुळे नाव न सांगण्याच्या अटीवर एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले.

ट्रम्प आणि पुतीन यांच्यात अनेकदा दूरध्वनी संभाषणे झाली आहेत. शिवाय अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या नियमित रशिया भेटीनंतरही, शांतता योजनेच्या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली नाही असे रशियन नेते मानतात, असे सूत्राने सांगितले.

“पुतीन ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांना महत्त्व देतात आणि विटकॉफ यांच्यासोबत त्यांची चांगली चर्चा झाली, परंतु रशियाचे हित सर्वांपेक्षा वरचढ आहे,” असे त्या व्यक्तीने पुढे म्हटले.

रॉयटर्सच्या वृत्तावर टिप्पणी विचारताच, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अ‍ॅना केली यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या प्रशासनात युद्ध भडकू दिल्याबद्दल दोषी ठरवले.

“बायडेन यांच्या अगदी विरुद्ध, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नरसंहार थांबवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि जर पुतीन युद्धबंदीवर सहमत झाले नाहीत तर त्यांच्यावर कठोर निर्बंध आणि कर आकारले जातील,” असे त्या म्हणाल्या.

पुतीन यांच्या शांततेसाठीच्या कायदेशीररित्या बंधनकारक अटींमध्ये नाटो पूर्वेकडे विस्तार करणार नाही, युक्रेनियन तटस्थता आणि त्यांच्या सशस्त्र दलांवर मर्यादा, तेथे राहणाऱ्या रशियन भाषिकांचे संरक्षण आणि रशियाला प्रादेशिक लाभ होण्याबाबतची स्वीकृती यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ते युक्रेनला प्रमुख शक्तींसह सुरक्षा हमी देण्याबाबत चर्चा करण्यास देखील तयार आहेत, अर्थात त्याचे कार्य नेमके कसे चालेल हे अद्याप स्पष्ट नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की युक्रेन कधीही रशियाच्या जिंकलेल्या प्रदेशांवरील सार्वभौमत्वाला मान्यता देणार नाही आणि कीवकडे नाटोमध्ये सामील व्हायचे की नाही हे ठरवण्याचा सार्वभौम अधिकार आहे. या एकंदर प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी करण्यात आलेल्या विनंतीला त्यांच्या कार्यालयाने प्रतिसाद दिला नाही.

क्रेमलिनच्या विचारसरणीशी परिचित असलेल्या दुसऱ्या सूत्राने सांगितले की पुतीन यांनी मॉस्कोची उद्दिष्टे पाश्चात्य दबावामुळे होणाऱ्या कोणत्याही संभाव्य आर्थिक नुकसानापेक्षा खूप महत्त्वाची मानली आणि रशियन तेल खरेदी करण्यासाठी चीन आणि भारतावर टॅरिफ लादण्याच्या अमेरिकेच्या धमक्यांबद्दल त्यांना चिंता नव्हती.

युक्रेनच्या जवळजवळ एक पंचमांश भूभागावर आधीच नियंत्रण असलेल्या रशियाने गेल्या तीन महिन्यांत सुमारे 1 हजार 415 चौरस किमी (546 चौरस मैल) प्रगती केली आहे, असे डीपस्टेटमॅप या संघर्षाच्या ओपन-सोर्स इंटेलिजेंस मॅपमधील डेटानुसार, असे म्हटले आहे.

“भूक ही खाण्यासोबत येते”, असे म्हणत पहिल्या सूत्राने सांगितले, याचा अर्थ असा की युद्ध थांबवले नाही तर पुतीन अधिक प्रदेशांवर कब्जा करू शकतात. इतर दोन सूत्रांनीही स्वतंत्रपणे याची पुष्टी केली.

रशिया सध्या क्रिमियावर नियंत्रण ठेवून आहे, जो त्याने 2014 मध्ये जिंकला होता, तसेच लुहान्स्कचा संपूर्ण पूर्वेकडील प्रदेश, डोनेत्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसन प्रदेशांचा 70 टक्क्यांपेक्षा जास्त भाग आणि खार्किव, सुमी आणि निप्रोपेट्रोव्हस्क प्रदेशांचे तुकडे यावरही रशियाचे नियंत्रण आहे. पुतीन यांची सार्वजनिक भूमिका अशी आहे की ते पहिले पाच प्रदेश – क्रिमिया आणि पूर्व युक्रेनचे चार प्रदेश – आता रशियाचा भाग आहेत आणि शांतता प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कीवने माघार घ्यावी.

पुतीन युक्रेनचे संरक्षण पूर्णपणे उद्ध्वस्त होईपर्यंत लढत राहू शकतात. याखेरीज युक्रेनचा अधिकाधिक भाग रशियात समाविष्ट करण्यासाठी त्यांच्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षा वाढवू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

“युक्रेनच्या कमकुवतपणावर आधारित कारवाई रशिया करेल,” असे तिसऱ्या सूत्राने सांगितले, जर त्याला तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला तर मॉस्को युक्रेनच्या चार पूर्वेकडील प्रदेश जिंकल्यानंतर त्याचे आक्रमण थांबवू शकते. “पण जर ते निष्प्रभ ठरले तर निप्रोपेट्रोव्हस्क, सुमी आणि खार्किव्ह देखील रशियाच्या नियंत्रणाखाली जाऊ शकतात.”

झेलेन्स्की यांच्या मते रशियन सैन्याचे उन्हाळी आक्रमण मॉस्कोच्या अपेक्षेइतके यशस्वी होताना दिसत नाही. रशियन सैन्याची संख्या युक्रेनपेक्षा जास्त आहे हे मान्य करणारे त्यांचे वरिष्ठ नेते म्हणतात की कीवचे सैन्य आपली भूमिका कायम ठेवत आहे आणि रशियाला त्याच्या फायद्यांसाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षा अचानक वेगळी भूमिका घेत, ट्रम्प प्रशासनाने युद्धाला रशिया आणि अमेरिकेतील प्राणघातक प्रॉक्सी संघर्ष म्हणून पाहिले आहे, युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यासाठी दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे आणि रशियाने क्रिमियावर कब्जा केला आहे हे मान्य करण्याची कल्पना मांडली आहे.

पुतीन हे युद्ध मॉस्कोचे पश्चिमी देशांशी असलेल्या संबंधांबाबत एक निर्णायक क्षण म्हणून कायम दाखवत आले आहेय, 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर नाटोचा विस्तार करून आणि युक्रेन तसेच जॉर्जियासह मॉस्कोच्या प्रभावक्षेत्रावर अतिक्रमण करून रशियाचा अपमान केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पुतीन यांनी अद्याप ट्रम्प यांचा बिनशर्त युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, ज्याला कीवने लगेचच मान्यता दिली आहे.

दुसरीकडे मंगळवारी प्रसारित झालेल्या बीबीसी मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की पुतीन यांच्याशी असणारे संबंध संपलेले नाहीत आणि युक्रेन करार अद्यापही बाकी आहे.

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, ट्रम्प रशियन वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा तसेच त्यांची निर्यात करणाऱ्या इतर देशांवर दुय्यम निर्बंधांचा विचार करत आहेत जेणेकरून मॉस्कोला वाटाघाटीच्या टेबलावर आणता येईल. सध्या चीन आणि भारत हे रशियाकडून येणाऱ्या कच्च्या तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत.

सध्याचे निर्बंध असूनही, रशियाच्या 2 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेने रशिया किंवा पश्चिमेकडील अनेकांच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली आहे. 2025 मध्ये गेल्या वर्षीच्या 4.3 टक्क्यांवरून 2.5 टक्के वार्षिक वाढ होण्याची शक्यता अर्थ मंत्रालयाने वर्तवली आहे.

“पुतीन यांना समजते की ट्रम्प हे अत्यंत लहरी व्यक्तिमत्व आहे, जे अप्रिय गोष्टी करू शकतात परंतु ट्रम्प यांना जास्त त्रास वाटू नये म्हणून पुतीन विविध क्लृप्त्याही काढत आहेत,” असे सूत्रांनी सांगितले.

भविष्याचा विचार करता, एका सूत्राने सांगितले की येत्या काही महिन्यांत हे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि जगातील दोन सर्वात मोठ्या आण्विक शक्तींमधील तणावाचे धोकेही उघड होतील. यशिवाय त्याच्या अंदाजानुसार, युद्ध यानंतरही सुरूच राहील.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous article100% Made-in-India AK-203 Rifle Still A Few Steps Away
Next articleभारताचा ऑस्ट्रेलियातील Talisman Sabre बहुराष्ट्रीय लष्करी सरावात सहभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here