ऊर्जा, व्यापार आणि गतिशीलतेच्या प्रमुख करारांसह, पुतिन यांचा दौरा समाप्त

0
पुतिन
5 डिसेंबर रोजी, नवी दिल्ली येथे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत-रशिया व्यापार मंचाच्या सत्राचे सहअध्यक्षपद भूषवले.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, यांच्या दोन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्याची शुक्रवारी समाप्ती झाली. या महत्वपूर्ण दौऱ्यादरम्यान, भारत आणि रशियाने ऊर्जा सुरक्षा, व्यापार, औद्योगिक सहकार्य, गतिशीलता, सागरी संपर्क आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील करारांच्या विस्तृत मालिकेची घोषणा केली.

गेल्या चार वर्षांतील पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा होता. नवी दिल्लीवर मॉस्कोसोबतचे ऊर्जा संबंध कमी करण्यासाठी पश्चिमी देशांकडून दबाव वाढत असताना, हा दौरा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हैदराबाद हाऊसमध्ये बोलताना, पुतिन यांनी रशियाचे वर्णन ‘भारताच्या विकासातील, विशेषत: ऊर्जा क्षेत्रातील, एक स्थिर आणि दीर्घकालीन भागीदार’ असे केले.

ते म्हणाले की, “रशिया तेल, वायू, कोळसा आणि भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकाटा एक विश्वसनीय पुरवठादार आहे. आम्ही भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी इंधनाचा अखंड पुरवठा सुरू ठेवण्यास तयार आहोत.”

भारत-रशिया भागीदारी “स्थिर आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहे,” असे सांगत, पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “गेल्या अडीच दशकांपासून, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दूरदृष्टी आणि पूर्ण समर्पणाने या संबंधांची जपणूक केली आहे. जागतिक अस्थिरतेच्या दशकांमध्ये आमची मैत्री ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ राहिली आहे.”

दोन्ही नेत्यांनी, स्थलांतर आणि गतिशीलतेवरील नव्या चौकटी, वैद्यकीय विज्ञानातील सहकार्य, अन्न सुरक्षा, तसेच सागरी आणि बंदर सहकार्यावरील सामंजस्य करार, यांसह अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होताना पाहिले.

प्रमुख औद्योगिक घोषणांपैकी एक म्हणजे, रशियामध्ये युरिया उत्पादन प्रकल्प स्थापित करण्यासाठी भारतीय कंपन्या आणि रशियाच्या यूराल्केम यांच्यातील भागीदारी. या प्रकल्पाचे उद्दिष्ट, भारतासाठी अंदाजित आणि दीर्घकालीन खत पुरवठा सुरक्षित करणे आहे, ज्यामुळे कृषी-उत्पादनांसाठी लागणाऱ्या वस्तूंचे अस्थिर जागतिक बाजारांपासून संरक्षण होण्यास मदत होईल.

हे विकास कार्य, 2023 पर्यंतच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमाचा भाग आहेत, ज्याचे वर्णन दोन्ही देशांनी, ‘द्विपक्षीय व्यापारात विविधता आणण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठीचा रोडमॅप’ असे केले. पंतप्रधान मोदींनी, युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत मुक्त व्यापार कराराच्या (FTA) जलद निष्कर्षासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले.

पर्यटन आणि परस्पर नागरी संबंधांमध्ये नवीन उपाययोजना जाहीर करण्यात आल्या, पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, “भारत लवकरच रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा विनामूल्य ई-टूरिस्ट व्हिसा आणि 30 दिवसांचा ग्रुप पर्यटक व्हिसा सुरू करणार आहे.”

‘ऊर्जा आणि नागरी आण्विक सहकार्य’ देखील द्विपक्षीय चर्चेतील एक महत्त्वाचा विषय होता. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, एका प्रमुख भारतीय आण्विक प्रकल्पावर सुरू असलेल्या कामाची नोंद घेतली, जिथे तीन अणुभट्ट्या आधीच ग्रीडला जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी यावेळी सांगितले की, “द्विपक्षीय व्यापारापैकी 96 टक्के व्यापार, आता राष्ट्रीय चलनांमध्ये केला जातो आणि येत्या वर्षांत एकूण व्यापार100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.” त्यांनी इराणमार्गे भारत आणि रशियाला जोडणाऱ्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरसह, आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि लॉजिस्टिक्स मार्गांच्या प्रगतीवरही प्रकाश टाकला.

जागतिक मुद्द्यांवर बोलताना, मोदी यांनी ‘युक्रेनमधील संघर्ष संवादातून सोडवला जावा’ या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “भारताने सुरुवातीपासूनच शांततेची बाजू घेतली आहे. आम्ही शांततापूर्ण आणि चिरस्थायी तोडग्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे स्वागत करतो आणि त्यासाठी आमचे कायमच योगदान असेल.”

मोदींनी सामायिक सुरक्षा चिंतेवरही भर देत सांगितले की, “दहशतवादाविरुद्ध भारत आणि रशिया खांद्याला खांदा लावून उभे आहेत, दोन्ही देशांतील अलीकडील हल्ले या समन्वित कारवाईची गरज अधोरेखित करतात.”

पुतिन यांनी रचनात्मक मध्यस्थीबद्दल भारताचे आभार मानले आणि आजची ही चर्चा “माहितीपूर्ण आणि उपयुक्त” असल्याचे नमूद केले.

राष्ट्रपती भवनातील औपचारिक स्वागत, राजघाटावर वाहिलेली आदरांजली, भारत-रशिया बिझनेस फोरममध्ये सहभाग आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेली बैठक, जिथे मोदींनी पुतिन यांना भगवतगीतेची एक प्रत भेट दिली, अशा अनेक उच्च-स्तरीय राजनैतिक कार्यक्रमांनी हा दौरा वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

पुतिन यांनी, संध्याकाळी उशिरा मायदेशी रवाना होण्यापूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या राजकीय भोजनाला हजेरी लावली.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleHAL Receives Fifth GE F404 Engine for Tejas Mk1A, Boosting Production Momentum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here