देशाच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा अपेक्षेप्रमाणेच विजय झाला. सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर पुतीन हे देशातील सर्वात शक्तिशाली नेते मानले जातात.
राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची ही तिसरी वेळ असल्याने, पुतीन रशियावर आपली निरंकुश सत्ता आणखी मजबूत करतील असा अंदाज आहे. विजयानंतर पाश्चिमात्य नेत्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणात पुतीन यांनी युक्रेनबरोबरच्या युद्धात नाटोच्या सहभागामुळे आता तिसरे महायुद्ध होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे.
पुतीन यांनी पाश्चात्य देशांना संभाव्य आण्विक धोक्याबद्दल इशारा देण्याची ही पहिली वेळ नाही. आपल्या भाषणात त्यांनी शांतता चर्चेचे संकेतही दिले आणि म्हटले , “मी हे वारंवार सांगत आलो आहे आणि मी ते पुन्हा सांगेन. आम्ही शांतता चर्चेसाठी तयार आहोत, पण केवळ शत्रूच्या गोळ्या संपल्या आहेत म्हणून नाही.” ते पुढे म्हणाले की, मॅक्रॉन यांनी युक्रेनमधील तणावपूर्ण परिस्थिती वाढवू नये, तर शांततापूर्ण तोडगा काढावा. अलीकडेच, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले की ते युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी सैन्य पाठवण्याची शक्यता आहे.
1962 मध्ये क्यूबा क्षेपणास्त्र संकटानंतर 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशिया – अमेरिका संबंध बिघडले आहेत. रशियन निवडणुकांच्या निकालानंतर, अनेक पाश्चात्य नेत्यांनी या निवडणुका निष्पक्ष किंवा मुक्त वातावरणात झाल्या नसल्याचे म्हटले आहे. पुतीन यांनी अमेरिकेच्या निवडणुकांवर टीका करताना जग अमेरिकेवर हसत असल्याचा दावा केला. “ही केवळ एक आपत्ती आहे – ती लोकशाही नाही – मग हे काय आहे?”
सामान्य रशियन नागरिकांकडून कोणताही विरोध आणि स्वीकृती न घेता पुतीन यांच्या नेतृत्वाखालील एकहाती सत्ता हुकूमशाहीचे पुनरुज्जीवन करू शकते असे संकेत अभ्यासकांनी दिले आहेत. देशात आणखी काही वाईट घडले नाही तरी तो स्टॅलिनवादी हुकूमशाहीकडे परत जाऊ शकतो. जर पुतीन युक्रेनमधील आपली तथाकथित लष्करी कारवाई सुरू ठेवू शकले, तर त्यामुळे रशियाच्या शेजारील देशांना भू – राजकीय आव्हानांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. जर्मनी आणि पोलंड त्यांच्या लष्करी क्षमता बळकट करत आहेत, तर स्वीडन आणि फिनलंड, जे पूर्वी तटस्थ देश होते आता नाटोमध्ये सहभागी झाले आहेत.
71 वर्षीय पुतीन हे केजीबीचे माजी सदस्य असून आता राजकारणी बनले आहेत. प्रथम 1999 ते 2000 आणि नंतर 2008 ते 2012 दरम्यान ते रशियाचे पंतप्रधान झाले. 2012 पासून त्यांनी कोणत्याही विरोधाशिवाय रशियावर राज्य केले आहे. 2020 मध्ये, पुतिन यांनी आपल्याला 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे राहण्याची परवानगी देणारा कायदा केला.
पुतीन यांच्या फेरनिवडीचे भारताच्या दृष्टीने काय महत्त्व आहे?
युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आणि त्यापूर्वीही भारत – रशिया द्विपक्षीय संबंध स्थिर राहिले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली युद्धविरोधी भूमिका कायम ठेवली असली, पाश्चिमात्य जगाने भारताच्या रशिया समर्थक भूमिकेवर टीका केली असली, तरी भारत हा रशियाचा सर्वात मोठा तेल आयातदार बनला. भारतासाठी, चीनला रोखण्यासाठी रशियाला एक विश्वासू द्विपक्षीय भागीदार म्हणून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. दुसरीकडे युक्रेन – रशिया संघर्ष सुरू झाल्यापासून रशिया आर्थिक आणि भू – राजकीय मुद्यांवर चीनच्या अधिक जवळ गेला आहे.
टीम भारतशक्ती