युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल एक खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते रशियन नेत्याची बिघडलेली प्रकृती त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.
बुधवारी एका मुलाखतीत, झेलेन्स्की यांनी अमेरिकेला युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी शांतता वाटाघाटी सुरू असताना रशियाला जागतिक राजकीय क्षेत्रात पुन्हा समाविष्ट न करण्याचे आवाहन केले.
‘पुतीन यांचा लवकरच मृत्यू’
ते लवकरच मरणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे आणि सर्व काही संपेल, असे झेलेन्स्की यांनी पॅरिसमधील युरोविझन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याचे कीव इंडिपेंडंटने केलेल्या अंशतः अनुवादात म्हटले आहे.
झेलेन्स्की यांनी असेही नमूद केले की पुतीन यांचे “त्यांच्या मृत्यूपर्यंत सत्तेत राहण्याचे” उद्दिष्ट आहे आणि ते सक्रियपणे “पाश्चिमात्य देशांशी थेट संघर्ष” करू इच्छितात. मात्र, त्यांनी 72 वर्षीय पुतीन यांची प्रकृती खालावत आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी कोणतीही ठोस कारणे दिली नाहीत.
पुतीन यांच्या प्रकृतीबद्दल अफवा
रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून पुतीन यांच्या बिघडलेल्या प्रकृतीबद्दल सतत अफवा पसरत असल्याने, अनेक वर्षांपासून पुतीन यांच्या आरोग्याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
असे असूनही, क्रेमलिनने असे दावे वारंवार फेटाळून लावले आहेत, पुतीन यांच्या आरोग्याच्या कोणत्याही गंभीर समस्यांशी संबंधित वृत्त नाकारली आहेत आणि या वृत्तांचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नाही असे ठामपणे सांगितलं आहे.
ऑक्टोबरमध्ये, सैनिकांसोबतच्या बैठकीदरम्यान पुतीन यांच्या हातांवर IV लावण्याच्या खुणा दिसत असल्याचे छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते. त्यामुळे ते कर्करोगावर उपचार घेत आहेत असा अंदाज बांधला गेला.
मात्र, खुणांमागचे नेमके कारण अद्याप अज्ञात आहे. याव्यतिरिक्त, अनेक इतर वृत्तांनुसार पुतीन स्ट्रोक किंवा पार्किन्सन रोगानेग्रस्त असू शकतात अशी चर्चा सुरू आहे.
काळ्या समुद्रातील युद्धविराम
सौदी अरेबियामधील ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काळ्या समुद्रातील ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि युद्ध थांबावे याच्या करारावर पोहोचलेल्या रशियन आणि युक्रेनियन प्रतिनिधींच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांचे हे वक्तव्य आले आहे.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, क्रेमलिनने म्हटले आहे की रशियाच्या रोसेलखोझबँक या कृषी क्षेत्राची सेवा करणाऱ्या संस्थेवरील पाश्चात्य निर्बंध हटवले गेले आणि रशियाने आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीमध्ये पुन्हा प्रवेश मिळवला तरच काळ्या समुद्रातील युद्धविराम शक्य होईल.
मुलाखतीदरम्यान, झेलेन्स्की यांनी सुरू असलेल्या वाटाघाटीदरम्यान मॉस्कोच्या मागण्यांना बळी न पडण्याची विनंती अमेरिकेला केली आहे.
अमेरिकेने जागतिक बाजारपेठांमध्ये रशियाच्या प्रवेशाचा विस्तार करण्यास आधीच सहमती दर्शविली आहे, ज्याला झेलेन्स्की यांनी तीव्र विरोध केला.
“या वेळी जागतिक एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेने पुतीन यांना मदत न करणे महत्त्वाचे आहे,” असा इशारा त्यांनी दिला. “मला वाटते की हे अत्यंत धोकादायक आहे-आपल्याला भेडसावणाऱ्या सर्वात धोकादायक क्षणांपैकी एक.”
झेलेन्स्की-मॅक्रॉन बैठक
गुरुवारी, पॅरिसमध्ये सुमारे 30 देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या शिखर परिषदेपूर्वी झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली.
चर्चा युक्रेनची लष्करी स्थिती बळकट करण्यावर केंद्रित होती कारण ते रशियाबरोबर युद्धविरामाची मागणी करत होते, ज्यामध्ये कोणत्याही शांतता करारासह युरोपियन सैन्य तैनात करण्याच्या प्रस्तावांवर विचार केला जात होता.
2000 ते 2008 या कार्यकाळानंतर पुतीन यांनी 2012 पासून रशियाचे अध्यक्षपद भूषवले आहे. केजीबीचे माजी गुप्तचर अधिकारी असलेल्या त्यांनी 1999 ते 2000 आणि पुन्हा 2008 ते 2012 या काळात रशियाचे पंतप्रधान म्हणूनही काम केले.
टीम स्ट्रॅटन्यूज