रशियातील एकमेव स्वतंत्र पोलिंग एजन्सी लेवाडा सेंटरने केलेल्या सर्वेक्षणात राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना 86 टक्के जनतेने मान्यता दिल्याचे दिसून आले.
रशियामध्ये 15 मार्चपासून अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली असून पुतीन पाचव्यांदा सहजपणे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याची अपेक्षा आहे. 17 मार्च रोजी मतदान संपणार आहे.
पुतीन 2000 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. यंदाची निवडणूकही पुतीनच जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी सहा वर्षे ते सत्तेत राहतील.
पहिल्या दिवशी देशभरात 35 टक्के मतदान झाल्याचे रशियन अधिकाऱ्यांकडून जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र रशियाच्या सीमावर्ती भागात सुरू असलेले हल्ले आणि देशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करून निवडणुका खराब करण्याच्या युक्रेनच्या प्रयत्नांबद्दल अध्यक्ष पुतीन संतप्त असल्याचेही त्यात म्हटले आहे.
युक्रेनकडून रशियाच्या सीमेवर हल्ले सुरूच असून, पुतीन यांना सत्तेवरून हटवण्यासाठी ते सातत्याने लढत आहेत.
“शत्रूच्या या हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाईल” असा इशारा पुतीन यांनी रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दिल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे.
पुतीन यांच्या लोकप्रियतेची तुलना युक्रेन युद्धादरम्यानच्या काळाशी करताना लेवाडा सेंटरला असे आढळले की युक्रेन युद्धाच्या पूर्वसंध्येला म्हणजे फेब्रुवारी 2022 रोजी पुतीन यांची रशियन लोकप्रियता 71टक्के होती. फेब्रुवारी 2023मध्ये ती 83 टक्क्यांपर्यंत वाढली आणि यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती 86 टक्के झाली.
मात्र या लोकप्रियतेच्या मानांकनात फेरफार झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
रशियाने युक्रेनचे जे प्रांत ताब्यात घेतले आहेत- ज्याला मॉस्कोने आपले ” नवीन प्रदेश ” म्हटले आहे – तिथे होत असलेल्या निवडणुकांबाबतही वाद निर्माण झाला आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करून या निवडणुकांना “बेकायदेशीर ” म्हटले आहे.
काही मतदारांनी मतपेट्या पेटवून आपला असंतोष दाखवून दिला. रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा एला पाम्फिलोवा यांनी अशा लोकांना ‘बदमाश’ असे संबोधले असून असे कृत्य केल्यामुळे त्यांना पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल,असेही सांगितले. वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, तिने चिंता देखील उद्धृत केली की निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी पहिल्या दिवशी सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला गेला होता.
मतदानाच्या पहिल्या दिवशी सायबर हल्ल्याव्दारे निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नात झाला असा दावा एला पाम्फिलोवा यांनी केल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
अश्विन अहमद