ऑस्ट्रेलिया, आयर्लंडमध्ये भारतीयांवर वर्णद्वेषी हल्ले; जगभरात संतापाची लाट

0

भारतीय नागरिकांवर परदेशात दोन क्रूर वर्णद्वेषी हल्ले झाले, ज्यातील एक ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेडमध्ये आणि दुसरा आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये. यामुळे जागतिक स्तरावर संताप उसळला असून, भारतीय प्रवासी समुदायामध्ये वर्णद्वेष आणि स्थलांतरितांच्या सुरक्षेबाबत भीती वाढली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या दोन्ही हल्ल्यांची वर्णद्वेषी गुन्हा म्हणून नोंद करत, चौकशी सुरू केली आहे.

अ‍ॅडलेड येथील हल्ला

ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड शहरात, 23 वर्षांचा भारतीय विद्यार्थी- चरणप्रीत सिंग याच्यावर वर्णद्वेषातून झालेल्या या हल्ल्यात निर्घृणपणे मारहाण करण्यात आली.

19 जुलैच्या रात्री सिंग आणि त्याची पत्नी, Illuminate लाईट शो पाहण्यासाठी Kintore Avenue जवळ वाहन पार्क करून गेले होते.

शांतपणे सुरू झालेला हा कार्यक्रम अचानक हिंसक वळणावर गेला, जेव्हा एक वाहन त्यांच्या जवळ आले आणि त्यातील 5 शस्त्रधारी पुरुषांनी सिंगला घेरले.

‘f*** off, Indian’ अशा अश्लाघ्य भाषेचा वापर करत त्यांनी मला मारहाण सुरू केली,” असे सिंगने हॉस्पिटलमधून 9News या वाहिनीला सांगितले.

त्या अज्ञात व्यक्तींनी सिंगला गाडीच्या खिडकीतून त्याला मारहाण केली, त्याला बाहेर खेचून जमिनीवर टाकले आणि त्याच्यावर लाथांचा वर्षाव करत राहिले.

हल्ल्यादरम्यान चरणप्रीत सिंगची शुद्ध हरपली. त्याला तत्काळ Royal Adelaide Hospital मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याला मेंदूच्या दुखापतीसह चेहऱ्यावरचे अनेक हाड मोडणे, नाकाची फ्रॅक्चर आणि डोळ्यांच्या दुखापती असे गंभीर जखमा झाल्याचे निदान झाले.

त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, तो अजूनही वैद्यकीय निगराणीखाली आहे.

याप्रकरणी साऊथ ऑस्ट्रेलिया पोलीसांनी, 20 वर्षांचा Enfield येथील युवकाला अटक केली असून, त्याच्यावर “assault causing harm” चा गुन्हा दाखल केला आहे.

तुर्तास त्याला जामिनावर सोडण्यात आले असून, उर्वरित चार संशयितांचा शोध सुरू आहे. परिसरातील CCTV फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे.

या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि अस्वस्थता वाढली आहे.

सिंगने आपली मानसिक वेदना व्यक्त करत सांगितले की: “अशा गोष्टी घडल्यावर वाटते की परत मायदेशी निघून जावे, शरीरात अनेक बदल करता येतात, पण दुर्देवाने रंगाचं काही करता येत नाही.”

साऊथ ऑस्ट्रेलियाचे मुख्यमंत्री Peter Malinauskas यांनी, या हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्याला “अत्यंत गंभीर आणि आमच्या राज्यात अशोभनीय” म्हटले.

त्यांनी आश्वासन दिले की या घटनेची चौकशी तातडीने केली जात आहे.

डब्लिनमधील भीषण हल्ला

अ‍ॅडलेडमधील घटनेच्या काही तास आधीच, आयर्लंडमधील डब्लिन शहरात आणखी एक धक्कादायक वर्णद्वेषी हल्ला झाला.

वयवर्ष 40 च्या आसपासचे एक भारतीय नागरिक, जे काही आठवड्यांपूर्वी आयर्लंडमध्ये आले होते, त्यांना Tallaght या उपनगरात काही अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यावर फेकले, त्यांचे कपडे फाडून त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आणि त्यांना त्याच अवस्थेत सोडून निघून गेले. पीडित व्यक्ती Amazon कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.

Gardaí (आयरिश पोलीस) यांच्यानुसार, हा हल्ला शनिवार, 19 July रोजी, संध्याकाळी संध्याकाळी 6 च्या सुमारास पार्कहिल रोडवर झाला.

जखमीला Tallaght University Hospital मध्ये दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला घरी सोडण्यात आले.

अहवालानुसार, पीडित भारतीय नागरिक, हा लहान मुलांभोवती संशयास्पदरित्या वावरत असल्याच्या आरोपावरुन, काही युवकांनी त्याला मारहाण केली. मात्र ही अफवा उजव्या विचारसरणीच्या आणि स्थलांतरविरोधी गटांनी सोशल मीडियावर पसरवली होती.

“कट्टर वर्णद्वेष”

स्थानिक रहिवासी आणि हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी जेनिफर मरीने सांगितले की, “हा हल्ला म्हणजे ‘कट्टर वर्णद्वेष’ होता.”

तिने सांगितले की, “काही तरूणांनी पीडित व्यक्तीच्या डोक्यात घाव घातले, त्यानंतर त्याला फरफटत नेले आणि वारंवार त्याचे डोके दिव्याच्या खांबावर आपटले. त्यानंतर त्याचे शूज, पँट, अंडरवेअर काढून त्याचा मोबाईल आणि पैसे चोरुन ते पसार झाले.”

“त्यांनी अक्षरशः त्याला मृतावस्थेत सोडून दिले,” असे तिने The Journal वृत्तसंस्थेला सांगितले. त्याच्या दोन्ही भुवयांवर खोल जखमा होत्या आणि तो पूर्णतः गोंधळलेला होता.

आयरलंडमधील भारताचे राजदूत Akhilesh Mishra यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ही घटना “भीषण” असल्याचे म्हणत, त्यांनी भारतीय समुदायावर वाढणाऱ्या वर्णद्वेषी हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली.

राजदूत मिश्रा यांनी सांगितले की, “भारतीय दूतावास आयरिश अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि पीडिताला मदत दिली जात आहे.” सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं Twitter) वर त्यांनी त्या व्यक्तीच्या जखमेचा एक स्पष्ट फोटो पोस्ट करत म्हटले की, “असंवेदनशीलता आणि दिशाभूल पाहून सुन्न झालो आहोत… गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, हीच अपेक्षा.”

स्थानिक राजकारणी आणि आयर्लंडचे पहिले भारतीय वंशाचे महापौर Baby Pereppadan यांनी, पीडिताची भेट घेतली आणि तो अजूनही मानसिक धक्क्यात असल्याचे सांगितले.

“आयरलंडमधील बहुतांश भारतीय कामासाठी किंवा विद्यार्थी व्हिसावर आलेले असून, ते आरोग्यसेवा आणि IT क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देत आहेत. अशाप्रकारच्या हिंसक घटना अजिबात खपवून घेतल्या जाऊ शकत नाहीत,” असे त्यांनी Irish Independent ला सांगितले.

डब्लिनमधील या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चौकशी सुरू आहे आणि हे प्रकरणही द्वेषप्रेरित गुन्हा म्हणून तपासले जात आहे.

वाढत चाललेला वर्णद्वेष?

या दोन सलग घटनांमुळे, दोन्ही देशांतील स्थलांतरित समुदायांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आयर्लंडमध्ये उजव्या विचारसरणीच्या गटांनी स्थलांतरविरोधी भावना चिघळवल्या असून, एका व्हायरल पोस्टमध्ये 2020 नंतर भारतीय स्थलांतरितांची वाढ “अस्वीकार्य” असल्याचे म्हटले गेले आहे.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियामध्ये विशेषतः दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता सतत व्यक्त केली जात आहे.

दोन्ही देशांतील भारतीय राजदूतांनी संयम राखण्याचे आवाहन केले असून, तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्थलांतरित समुदायांवर होणाऱ्या लक्षित हिंसेपासून त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia, Israel to Deepen Defence Ties; Tel Aviv Condemns Pahalgam Terror Attack
Next articleMaritime Security in Focus as Philippines President Marcos Jr. Heads to India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here