संरक्षणमंत्र्यांचे भुजमध्ये शस्त्रपूजन, क्रीकच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला खडसावले

0

बुधवारी, विजयादशमीच्या निमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, भूज येथील लष्करी तळावर शस्त्रपूजन केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळवलेल्या विजयाबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले आणि दुसरीकडे, सिर क्रीक भागातील अवैध हालचालींबद्दल पाकिस्तानला थेट इशाराही दिला.

याप्रसंगी बोलताना सिंह म्हणाले की: “लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्या संयुक्त कारवाईमुळे पाकिस्तानच्या अलीकडील कारवायांना आणि भारताच्या संरक्षण क्षेत्रात घुसखोरी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना ‘त्वरित आणि प्रभावी’ प्रत्युत्तर देता आले. “लेह पासून ते सिर क्रीकपर्यंत पाकिस्तानने आपल्या संरक्षणरेषा भेदण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या तिनही सज्ज दलांनी त्यांचे डाव उघड पाडले आणि ‘भारत कुठेही, कधीही आणि कोणत्याही परिस्थित शत्रूला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो’ हे दाखवून दिले,” असेही ते म्हणाले.

सिर क्रीक प्रांतामध्ये, गेल्या अनेक वर्षांपासून सीमावादाचा प्रश्न कायम आहे. याचाच फायदा घेत, या भागात आपल्या लष्करी पायाभूत सुविधा वाढवण्याचा पाकिस्तानचा ‘दुष्ट हेतू’ असल्याचा आरोप, सिंह यांनी यावेळी केला. “पाकिस्तानने सिर क्रीक भागात जर काही चुकीच्या हालचाली करण्याचे धाडस केले, तर भारत त्याला इतके कठोर उत्तर देईल, की त्यामुळे त्यांचा इतिहास-भूगोलच बदलून जाईल. 1965 मध्ये भारतीय लष्कर लाहोरपर्यंत पोहोचले होते, आता 2025 मध्ये कराचीला जाणारा मार्ग ही क्रीकमधूनच जातो, हे पाकिस्तानने विसरता कामा नये,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “ऑपरेशन सिंदूर हे क्रूरता दर्शवण्यासाठी किंवा वाद भडकवण्यासाठी नव्हे, तर दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राबवण्यात आले होते. ऑपरेशनमधील सर्व लष्करी उद्दिष्टे, तिनही सेवादलांमधील उत्तम समन्वयामुळे यशस्वीरित्या पार पडली.” अलीकडेच पार पडलेला त्रिसेवा युद्धसराव ‘वरुणास्त्र’चे उदाहरण देत, सिंह यांनी भारतीय लष्कराची सुसज्जता आणि तयारी अधोरेखित केली.

शस्त्रपूजेचा प्रतिकात्मक अर्थ सांगताना सिंह म्हणाले: “भारतीय परंपरेत शस्त्रे ही केवळ आक्रमणाची साधने नसून, ती न्याय आणि धर्माच्या रक्षणाची साधने आहेत. ज्ञानाशिवाय ताकद असुरक्षित असते आणि ताकदीशिवाय ज्ञान अराजकता निर्माण करते. शास्त्र (ज्ञान) आणि शस्त्र (शक्ती) यांच्यातील समतोल, आपल्या संस्कृतीला सशक्त आणि अजेय ठेवतो.”

देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे वाढते महत्व अधोरेखित करत, सिंह यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेअंतर्गत आजवर झालेल्या प्रगतीचा थोडक्यात लेखाजोखा मांडला. टभारत आता एक प्रमुख संरक्षण उत्पादक आणि निर्यातदार म्हणून उदयाला येत आहे,’ असे त्यांनी सांगितले. “सद्य परिस्थितीत, राष्ट्रीय सुरक्षेबाबतची आव्हाने ही केवळ बाह्य आक्रमण किंवा दहशतवादापुरती मर्यादित राहिलेली नसून, आता ती सायबर आणि माहिती युद्धापर्यंत पोहोचली आहेत,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सिंह यांनी याप्रसंगी, सिर क्रीक भागातील ‘टायडल इंडिपेंडंट बर्थिंग फॅसिलिटी‘ आणि ‘संयुक्त नियंत्रण केंद्र‘ यांचे आभासी उद्घाटन केले. या दोन्ही सुविधांमुळे किनारपट्टीवरील संयुक्त कार्यवाही आणि जलद प्रतिसाद क्षमतेत वाढ होणार आहे.

या विशेष कार्यक्रमासाठी, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, दक्षिण लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल आदित्य विक्रम सिंह राठी, आणि एअर कमोडोर के. पी. एस. धाम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleतैपईने अमेरिकन गुंतवणुकीसाठी ‘तैवान मॉडेल’चा पर्याय सुचवला
Next articleभारताचा नवा ग्राहक: महिलांची आघाडी ते नव्या मध्यमवर्गाचा उदय, तज्ज्ञांचे मत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here