मेम्फिस, टेनेसी येथे जहाजे आणि पाणबुड्यांसाठी अमेरिकी नौदलाच्या आधुनिक चाचणी सुविधेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिली. विल्यम बी मॉर्गन लार्ज कॅविटेशन चॅनल (LCC) म्हणून ओळखली जाणारी ही सुविधा नेव्हल सरफेस वॉरफेअर सेंटरचा (NSWC) भाग आहे. पाणबुडी, टॉर्पेडो, नौदलाच्या पृष्ठभागावरील जहाजे आणि प्रोपेलरची चाचणी घेण्यासाठी ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रगत जल बोगदा सुविधा आहे. भारत स्थानिक पातळीवर उत्पादित प्लॅटफॉर्मच्या चाचणीसाठी समान सुविधा स्थापन करण्याचा प्रयत्न करत असताना ही भेट आली आहे. भेटीदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संरक्षणमंत्र्यांना या सुविधेची माहिती दिली.
यावेळी राजनाथ सिंह यांच्यासोबत अमेरिकेतील भारताचे राजदूत, भारतीय नौदलाचे नौदल संचालन महासंचालक तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) तंत्रज्ञानविषयक सल्लागार आणि इतर महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या.यावेळी अमेरिकेच्या नौदल धोरणाचे उप-अवर सचिव यांनी राजनाथ सिंह यांचे स्वागत केले, तर नौदल पृष्ठीय युद्ध केंद्राचे (Naval Surface Warfare Centre – NSWC) कमांडर आणि तंत्रज्ञानविषयक संचालकांनी या जलबोगद्याच्या सुविधेविषयीची माहिती सिंह यांना दिली.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारतात स्वदेशी रचना आणि विकासासाठी अशाच प्रकारच्या सुविधेच्या स्थापनेच्या सुरू असलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देणे या चर्चेचा हेतू होता.”
1991 पासून कार्यरत असलेले एलसीसी हे नेव्हल सरफेस वॉरफेअर सेंटर कार्डरॉक डिव्हिजनचा एक भाग आहे, जे महत्त्वपूर्ण जहाज आणि पाणबुडीच्या रचनेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अमेरिकन नौदलाच्या अग्रगण्य संशोधन आणि विकास सुविधांपैकी एक आहे. अमेरिकन नौदलाच्या म्हणण्यानुसार, एलसीसी नियंत्रित वातावरणात प्रगत जहाज आणि पाणबुडी प्रणाली रचना आणि पूर्ण-प्रमाणात टॉरपीडोच्या मोठ्या प्रमाणावरील मॉडेल्सच्या चाचणीसाठी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत करते. या सुविधेमुळे अमेरिकी नौदलाला नियंत्रित परंतु वास्तववादी वातावरणात मॉडेल्सचा वापर करून पाणबुड्या आणि पृष्ठभागावरील जहाजांची शक्ती, कार्यक्षमता आणि प्रोपेलरचा आवाज मोजता येतो. या सुविधेचा व्यावसायिक वापरही आहे.
“या सुविधेतील पथदर्शी प्रयोग पाहिले. भारत आणि अमेरिका एकत्र काम करण्यासाठी आणि एकमेकांच्या अनुभवांचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत,” असे सिंह यांनी एक्सवर लिहिले.
वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट घेतल्यानंतर सिंह यांनी मेम्फिसला भेट दिली. त्यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये जनरल ॲटोमिक्स आणि जीईसारख्या विविध अमेरिकन संरक्षण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी सिंह यांनी चर्चा केली होती. त्यांनी भारतातील सह-विकास आणि सह-उत्पादनाच्या उदयोन्मुख संधींची रूपरेषा यावेळी मांडली. परदेशी मूळ उपकरणे उत्पादकांसाठी भारत हे एक महत्त्वाचे ठिकाण आणि पर्यायी निर्यात केंद्र बनवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या सुधारणांवर त्यांनी प्रकाश टाकला.