अमेरिकी हवाईदलाच्यावतीने आयोजित बहुपक्षीय हवाई युद्धसराव
दि. १७ जून: अमेरिकेच्या हवाईदलाच्यावातीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रेड फ्लॅग-२०२४’ या हवाई युद्धसरावात भारतीय हवाईदलाच्या चमूने पुन्हा एकदा अव्वल कामगिरी करीत आपली क्षमता सिद्ध केली. अमेरिकी हवाईदलाच्या अलास्का इथल्या आइल्सन हवाईतळावर नुकताच ४ जून ते १४ जून दरम्यान या बहुपक्षीय हवाई युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. या सरावात भारतीय हवाईदलाच्या चमूने देखील भाग घेतला होता.
#IAF team deinducts today after participation in Exercise Red Flag 2024 at @EielsonAirForce, Alaska, USA. On the way back, the IAF team participates in Air Force exercise with AF elements of Greece and Egypt before landing in India on 24 June 24. pic.twitter.com/31EVMrVxUT
— Indian Air Force (@IAF_MCC) June 16, 2024
‘एक्स रेड फ्लॅग-२०२४’चे हे दुसरे सत्र होते. अमेरिकेच्या हवाईदलाकडून आयोजित केला जाणारा हा युद्धसराव एक प्रगत लढाऊ हवाई प्रशिक्षण सराव असून, वर्षातून चार वेळा हा सराव आयोजित केला जातो. या सरावात भारतीय हवाई दलासह रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्स, ब्रिटनचे रॉयल एअर फोर्स, रॉयल नेदरलँड्स एअर फोर्स, जर्मन लुफ्तवाफ्फे आणि अमेरिकी हवाईदल सहभागी झाले होते. या सरावात भारतीय हवाई दलाच्या तुकडीत राफेल विमानांच्या ताफ्यासह हवाई कर्मचाऱ्यांचे पथक, तंत्रज्ञ, अभियंते, नियंत्रक आणि हवाई दलाशी संबंधित विषय तज्ञांचा समावेश होता. ‘रेड फ्लॅग’ या हवाई युद्धसरावात भारतीय हवाई दलातील राफेल विमानांचा हा पहिलाच सहभाग होता. यावेळी या विमानांनी सिंगापूर तसेच अमेरिकी हवाई दलांच्या एफ-१६ आणि एफ-१५, तसेच अमेरिकी हवाई दलाच्या ए-१० या लढाऊ विमांनांसोबत उड्डाण करीत युद्धसराव केला. सरावात सहभागी झालेल्या भारतीयहवाई दलाच्या पथकाने युद्ध सरावातील मोहिमांच्या आखणी आणि नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवला, याशिवाय त्यांनी सरावादरम्यान त्यांच्यावर सोपवलेल्या विशिष्ट मोहिमांचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही पार पाडली.
या सरावाच्या काळातील हवामानविषयक परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. शिवाय, बहुतांश काळ तापमानाच शून्यापेक्षा खाली गेले होते. अशा स्थितीतही सरावाच्या संपूर्ण कालावधीत सर्व विमानांची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी आणि या विमानांवर सोपवलेल्या सर्व मोहिमा विनाअडथळा पार पडाव्यात यासाठी, भारतीय हवाई दलाच्या देखभाल पथकाने परिश्रमपूर्वक आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या परिश्रमांमुळेच सरावाच्या संपूर्ण कालावधीत शंभर पेक्षा जास्त उड्डाणे करणे शक्य झाले. या हवाई युद्धसरावादरम्यान मिळालेल्या समृद्ध अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवाईदलही ‘तरंगशक्ती-२०२४’ या बहुपक्षीय हवाई युद्ध सरावाचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे. ‘तरंगशक्ती-२०२४’ हा हवाई युद्धसराव भारताच्या वतीने आयोजित पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्धसराव आहे. चालू वर्षाच्या अखेरीला हा हवाई युद्धसराव आयोजित करण्यात आला आहे.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)