युरोपियन युनियनच्या (EU) Schengen मुक्त-प्रवास क्षेत्राचे पूर्ण सदस्य होण्यासाठी रोमानिया आणि बल्गेरियाने बुधवारी आपापल्या सीमांवरील नियंत्रणे रद्द केली. हे दोन्ही देश अशा देशांच्या विस्तारित गटामध्ये सामील झाले ज्यांचे रहिवासी पारपत्र (passport) तपासणीशिवाय प्रवास करू शकतात. पूर्व युरोपीय देशांनी ईयुमध्ये सामील होण्यासाठीच्या सुरू असणाऱ्या अनेक वर्षांच्या वाटाघाटी यामुळे संपुष्टात आल्या.
ऐतिहासिक क्षण
मध्यरात्रीच्या ठोक्याला बल्गेरियाच्या सीमावर्ती शहर रुझ जवळील एका क्रॉसिंगवर फटाक्यांनी आकाश उजळून निघाले. त्याचवेळी बल्गेरिया आणि रोमानियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी डॅन्यूब नदीवर पसरलेल्या फ्रेंडशिप ब्रिजवर उभारण्यात आलेले अडथळे प्रतीकात्मकपणे दूर केले. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हा transit point (संक्रमण ठिकाण) असून तिथे उभारण्यात आलेले अडथळे सामान्य आहेत.
बल्गेरियाचे पंतप्रधान दिमितर ग्लाव्चेव्ह म्हणाले, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे.” “दक्षिणेकडील ग्रीसमधून उत्तरेला फिनलंडपर्यंत आणि पश्चिमेकडे पोर्तुगालपर्यंत-तुम्ही सीमांच्या बंधनाशिवाय प्रवास करू शकता.”
बल्गेरिया आणि रोमानियाहून हवाई आणि सागरी प्रवासाशी संबंधित तपासणी मार्च 2024 मध्ये मागे घेण्यात आली होती. मात्र अनियमित स्थलांतर रोखण्यासाठी तपासणी आवश्यक आहे या कारणास्तव ऑस्ट्रियाने गेल्या महिन्यापर्यंत कायम ठेवलेला नकाराधिकार काढून घेईपर्यंत जमिनीवरील प्रवासाशी संबंधित तपासणी सुरू होती.
शेंगेन व्हिसा
फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि लक्झेंबर्ग यांच्या सीमांवरील तपासण्या 1985 मध्ये पहिल्यांदा बंद करण्यात आल्या. शेंगेन क्षेत्रामध्ये आता युरोपियन युनियनच्या 27 पैकी 25 सदस्य देश, तसेच आइसलँड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे.
आयर्लंड आणि सायप्रस हे शेंगेन क्षेत्राचे सदस्य नाहीत.
युरोपियन आयोगाने नमूद केले आहे की शेंगेन क्षेत्र 425 दशलक्षाहून अधिक ईयु नागरिकांना, तसेच गटामध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या ईयुचा भाग नसलेल्या देशांच्या नागरिकांना मुक्त प्रवास करण्याची मुभा देते.
हे गटातील नागरिकांना विशेष औपचारिकतांची आवश्यकता न ठेवता प्रवास, काम आणि राहण्याची परवानगी देखील देते. जागतिक स्तरावर सर्वात मोठे मुक्त हालचाल क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे शेंगेन क्षेत्र कधीकधी सुरक्षा आणि स्थलांतर यासारख्या मुद्द्यांवरून सदस्य देशांमध्ये तणाव निर्माण करते.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)