अखंड प्रहार सरावानंतर, रुद्र एकात्मिक सर्व शस्त्र ब्रिगेड पूर्णपणे कार्यान्वित

0

भारतीय लष्कराच्या नुकत्याच स्थापन झालेल्या ‘रुद्र एकात्मिक सर्व शस्त्र ब्रिगेड’ने, अखंड प्रहार या महत्वपूर्ण सरावादरम्यान, आपले पूर्ण परिचालन प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले, अशी माहिती दक्षिण कमांडने गुरुवारी दिली. याद्वारे, रुद्र ब्रिगेडची बहु-डोमेन आणि उच्च गतीच्या ऑपरेशन्ससाठी असलेली सज्जता सिद्ध होते.

‘त्रिशूल’ या त्रि-सेवा सरावाचा भाग म्हणून, वाळवंटी क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘अखंड प्रहार’ या सरावात, यांत्रिकी आणि पायदळ कसरतींपासून ते विशेष हेलिबॉर्न ऑपरेशन्स आणि सैन्य हवाई दलाच्या समन्वित हल्ला-हेलिकॉप्टर मोहिमेपर्यंत, सर्व शस्त्रप्रणाली आणि सेवांच्या एकात्मिक वापराची चाचणी घेण्यात आली. सरावात भूदलांना जवळून समर्थन देण्यासाठी फायटर-ग्राउंड-अटॅक मोहिमा देखील पार पडल्या, ज्यामुळे भारतीय भूदल आणि भारतीय वायुसेनेमधील संयुक्त कार्यक्षमतेचे महत्त्व अधोरेखित झाले.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड) यांनी या सरावादरम्यान, कोणार्क कॉर्प्सच्या परिचालन सज्जतेचा आढावा घेतला आणि सहभागी तुकड्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली. ते म्हणाले की, “रुद्र ब्रिगेडने आपली सज्जता आणि परिचालन परिणामकारकता सिद्ध केली आहे, यातून दिसून येते की भविष्यातील ऑपरेशन्समध्ये बहु-डोमेन कार्ये हाताळण्यासाठी ती पूर्णपणे सक्षम आहे.”

पायदळ, चिलखती दल, यांत्रिकी पायदळ, तोफखाना, हवाई संरक्षण तोफखाना आणि इंजिनिअर्स यांना एकाच तुकडीखाली एकत्रित करण्यासाठी संरचित केलेली रुद्र ब्रिगेड, युद्धभूमीवर जलद आणि समन्वित परिणाम साधण्यासाठी डिझाईन केलेली आहे. दक्षिण कमांडने सांगितले की, ‘ब्रिगेडच्या प्रमाणीकरणाने तिची जलद आणि कठोर प्रहार करण्याची तसेच, उच्च समन्वय आणि परिणामकारकतेसह संयुक्त ऑपरेशन्स करण्याची क्षमता दर्शविली आहे.

या सरावाने पुढील पिढीच्या स्वदेशी तंत्रज्ञानासाठी, सद्य स्थितीतील चाचणी स्थळ  म्हणूनही कार्य केले. देशांतर्गत विकसित केलेले ड्रोन्स, मानवरहित प्रणाली, ड्रोन विरोधी प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक-वॉरफेअर ग्रीडचा वापर करत, कमांडने भारताच्या वाढत्या तांत्रिक क्षमता आणि संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टाशी असलेल्या सुसंगततेचा पुरावा सादर केला.

लेफ्टनंट जनरल सेठ यांनी नमूद केले की, या तुकडीच्या क्षमता सैद्धांतिक बदल दर्शवतात. ते म्हणाले की, “पूर्वी कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन नावाची एक संकल्पना होती, मात्र आता रुद्र ब्रिगेडच्या माध्यमातून कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीनचे रूपांतर कोल्ड स्ट्राइक डॉक्ट्रीनमध्ये  रूपांतर करण्याची वेळ आली आहे.” ते पुढे म्हणाले की, “ही तुकडी पूर्ण क्षमतेने आणि निर्णायक परिणामासह नेमून दिलेली कार्ये पार पाडण्यासाठी नेहमी सज्ज राहील.”

संरक्षण विश्लेषक आणि लष्कराने उद्धृत केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ‘कोल्ड स्ट्राइक’ संकल्पनेचे वर्णन बहु-डोमेन प्रतिबंधक भूमिका असे केले आहे. ही भूमिका, मोठ्या प्रमाणातील आक्रमणाऐवजी, वास्तव-वेळेतील गुप्तचर माहिती, माहितीवरील वर्चस्व आणि केंद्रित अडथळा यावर भर देते. लेफ्टनंट जनरल ए. बी. शिवणे यांनी ‘कोल्ड स्ट्राइक’चे वर्णन करताना म्हटले आहे की, “भारताचे पूर्वनियोजित, बहु-डोमेन प्रतिबंधक तत्त्वज्ञान…युद्ध म्हणजे विनाश नव्हे, तर प्रतिबंध आहे; आक्रमकता नव्हे, तर दृढता आहे.”

दक्षिण कमांडने सांगितले की, ‘अखंड प्रहार’ सराद्वारे, कोणार्क कॉर्प्सचे भविष्यकालीन संघर्षांसाठी सज्ज असलेल्या आधुनिक, चपळ आणि नेटवर्क-केंद्रित अशा दलात झालेले रूपांतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यांनी सहभागी युनिट्सच्या व्यावसायिकता, नवोपक्रम आणि संयुक्त परिचालन उत्कृष्टतेची प्रशंसा केली.

भारतीय लष्कराने या सरावाचे वर्णन. ‘परिचालन उत्कृष्टता, संयुक्त दलाचे एकत्रीकरण आणि अचूक युद्धाप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचे प्रदर्शन’ असे केले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleढाक्यातील तणाव वाढताच युनूस यांची दुहेरी मतदानाची घोषणा
Next article737 मॅक्स अपघातातील मृतांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याचे बोईंगला आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here