रशियाचे युक्रेनवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले, ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान

0

रशियाने बुधवारी रात्री, युक्रेनमधील विविध शहरांवर शेकडो ड्रोन्स आणि एक क्षेपणास्त्र डागत तीव्र हल्ले केले, ज्यामध्ये प्रामुख्याने ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आणि किमान 15 लोक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, “रशियाने सुमारे 400 ड्रोन्स आणि एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले, ज्याच्या टार्गेटवर खार्कीव, क्रिव्ही रिह आणि व्हिनित्सिया ही तीन भिन्न भागांतील शहरे होती.”

“या व्यापक आणि दीर्घकाळ चाललेल्या हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य- ऊर्जा पायाभूत सुविधा होते,” असे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी X द्वारे सांगितले.

युक्रेनमधील सर्वात मोठी खासगी ऊर्जा कंपनी- DTEK ने, Telegram अ‍ॅपद्वारे सांगितले की, “या हल्ल्यांमुळे क्रिव्ही रिह आणि ड्निप्रोपेट्रोव्ह्स्क प्रदेशातल्या इतर भागांतील 80,000 कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.”

हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, “त्यांनी रशियाचे बहुतेक ड्रोन्स पाडले, मात्र तरीही 57 ड्रोन्स आणि एका क्षेपणास्त्राच्या माध्यमातून 12 ठिकाणांवर हल्ला केला गेला.”

रशियाचे हल्ले तीव्र

गेल्या काही महिन्यांपासून, रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर सातत्याने तीव्र हल्ले केले आहेत. शेकडो ड्रोन्स आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे एकत्र वापरून नियमितपणे हे हल्ले होत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युक्रेनसाठी अधिक शस्त्रे, विशेषतः हवाई संरक्षण प्रणाली मंजूर केल्यामुळे हे हल्ले अधिक तीव्र झाले आहेत.

“रशिया आपली रणनीती बदलत नाही. या दहशतीला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यासाठी, आपल्याला हवाई संरक्षण प्रणाली, अधिक इंटरसेप्टर ड्रोन आणि दृढ संकल्पाची गरज आहे, जेणेकरून रशियाला आपण चोख प्रत्युत्तर देऊ शकू,” असे झेलेन्स्की म्हणाले.

काल रात्रीच्या हल्ल्यांत, व्हिनित्सिया आणि आसपासच्या भागात आठ लोक जखमी झाल्याचे, युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सांगितले.

पोलंडचे परराष्ट्रमंत्री राडोसलाव सिकॉर्स्की यांनी X वर सांगितले की, ‘व्हिनित्सियामधील पोलिश लाकडी फरशी उत्पादक Barlinek Group च्या एका कारखान्यावर ड्रोनने हल्ला केला.’

“कारखान्याच्या व्यवस्थापकाने मला नुकतेच सांगितले की, हा हल्ला जाणूनबूजून तीन दिशांनी करण्यात आला. पुतिन यांचे गुन्हेगारी युद्ध आपल्या सीमेच्या आणखी जवळ येत आहे,” असे ते म्हणाले.

क्रिव्ही रिह येथील लष्करी प्रशासन प्रमुख- ओलेक्झांद्र विलकुल यांनी सांगितले की, “रशियन फौजांनी एक क्षेपणास्त्र आणि 28 ड्रोनसह दीर्घ हल्ला केला. काही भागांमध्ये पाणीपुरवठाही खंडित झाला आहे.”

जखमींची नोंद

विलकुल यांनी सांगितले की, “एका 17 वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली असून, त्याचे रुग्णालयात जीवनासाठी संघर्ष सुरू आहे.”

रशियन हल्ल्यांचे वारंवार लक्ष्य असलेल्या खार्कीवचे, प्रादेशिक राज्यपाल ओलेह सिनीहुबोव यांनी सांगितले की, “20 मिनिटांच्या ड्रोन हल्ल्यात किमान 17 स्फोट झाले आणि त्यात तीन लोक जखमी झाले.”

तर, कीवचे महापौर विताली क्लिट्स्को यांनी सांगितले की, “राजधानीत काही काळ हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती, पण तिथे कोणतीही जखम अथवा नुकसान झालेले नाही.”

रशियाने मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या आक्रमणात, युक्रेनमधील हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे. मॉस्कोने सांगितले आहे की, “नागरी ऊर्जा पायाभूत सुविधा या कायदेशीर टार्गेट आहेत, कारण त्या युक्रेनच्या युद्ध प्रयत्नांना बळकटी देण्याचे काम करतात. युक्रेनही रशियातील आपल्या टार्गेट्सवर दीर्घ पल्ल्याचे हल्ले करत असतो, पण त्याचे प्रमाण खूपच मर्यादित असते.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleस्वदेशी बनावटीची AK-203 रायफल अजूनही दृष्टीपथात नाही
Next articleजर्मनी आणि ब्रिटन नवीन ‘मैत्री करारावर’ स्वाक्षरी करण्यास सज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here